भूपेनदा (डॉ. भूपेन हजारिका) यांना आदरांजली

    07-Sep-2025
Total Views |

भारताची कलात्मक अभिव्यक्ती आणि समाजजागृती यामध्ये मोलाचे योगदान असलेल्या डॉ. भूपेन हजारिका यांचे जन्मशताब्दी दि. ८ सप्टेंबर रोजीवर्ष सुरु होत आहे. भूमेनदांनी त्यांच्या संगीत सेवेने देशातील जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या रचना आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या जनशताब्दी वर्षारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेल्या भावना.

भारतीय संस्कृती आणि संगीतावर प्रेम करणार्‍या सर्वांसाठीच, दि. ८ सप्टेंबर रोजीचा हा आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. विशेषतः आसाममधील माझ्या बांधवांसाठी या दिवसाचे महत्त्व अधिक आहे. कारण, आज भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय, अप्रतिम आणि गगनभेदी आवाजाचे धनी असलेले डॉ. भूपेन हजारिका यांची जयंती आहे. आपण सर्व जाणताच की, यंदा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. हा सोहळा म्हणजे, भारताची कलात्मक अभिव्यक्ती आणि समाजजागृतीत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्याची एक अद्वितीय संधी आहे.

भूपेनदा यांनी आपल्याला जे दिले आहे, ते संगीताहूनही खूप अधिक आहे. त्यांच्या रचनांमध्ये दडलेल्या भावना रागदारीच्या पलीकडे होत्या. त्यांचा स्वर केवळ एक आवाज नव्हता, तर लोकांच्या हृदयाची सुमधूर धडधड होती. अनेक पिढ्या त्यांची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आहेत. त्यांच्या गाण्यांतील प्रत्येक शब्दात करुणा, सामाजिक न्याय, एकता आणि आपुलकीची खोल भावना निनादत राहते.

आसाममधून अशी एक स्वरधारा उमटली, जी मानवतेचा संदेश घेऊन कालातीत नदीसारखी सीमांच्या आणि संस्कृतींच्या पलीकडे वाहत गेली. भूपेनदा यांनी जगभर प्रवास केला, समाजातील अनेक दिग्गजांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले पण, तरीही आसामशी त्यांची नाळ कायम जुळलेली राहिली. आसामच्या ‘लोकधुनी’सारख्या समृद्ध मौखिक परंपरा, लोकसंगीताचा बाज आणि गावकुसाच्या लोकजीवनातील कथाकथनाच्या पद्धती यांनी त्यांचे बालपण घडवले. याच अनुभवांनी त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीची भाषा समृद्ध झाली. आसामची अस्सल ओळख आणि लोकजीवनातील आपुलकी, संस्कार त्यांनी नेहमीच आपल्यासोबत जपले.

भूपेनदांना लहान वयातच असामान्य प्रतिभेची देणगी लाभली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात गायन केले आणि आसामच्या साहित्यक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व लक्ष्मीनाथ बेजबरुआ यांचे लक्ष वेधून घेतले. किशोरवयातच त्यांनी आपले पहिले गाणे ध्वनिमुद्रित केले. मात्र, संगीत हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकमेव पैलू नव्हता. भूपेनदा होते जातिवंत विद्वान, जिज्ञासू, प्रभावी वक्ते आणि जग समजून घेण्याची दुर्दम्य ओढ असलेले प्रतिभावंत! ज्योतीप्रसाद अग्रवाल आणि विष्णुप्रसाद राभा यांसारख्या सांस्कृतिक दिग्गजांनी, त्यांच्या वैचारिक जगतावर खोल ठसा उमटवला आणि त्यांची चौकस वृत्ती आणखी प्रखर केली. हीच शिकण्याची ओढ त्यांना कॉटन कॉलेज, बनारस हिंदू विद्यापीठ आणि पुढे अमेरिकेपर्यंत घेऊन गेली. तिथे त्यांनी त्या काळातील नामवंत विद्वान, विचारवंत आणि संगीतकारांशी संवाद साधला. त्यांनी पॉल रॉब्सन या दिग्गज कलाकार आणि नागरी हक्क चळवळीच्या नेत्यांचीही भेट घेतली. रॉब्सन यांचे ‘ओल मॅन रिव्हर’ हे गीतच भूपेनदांच्या ’बिस्तीर्णो पारोरे’ या प्रसिद्ध गाण्याचे प्रेरणास्थान ठरले. भारतीय लोकसंगीताच्या त्यांच्या कार्यक्रमांसाठी, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी एलेनॉर रूझवेल्ट यांनी त्यांना सुवर्णपदक प्रदान केले.

भूपेनदा यांच्याकडे अमेरिकेतच स्थायिक होण्याचा पर्याय उपलब्ध होता; पण ते मायदेशी परतले आणि संगीतसेवेत रममाण झाले. रेडिओ असो वा नाट्यकला, चित्रपट वा शैक्षणिक माहितीपट प्रत्येक माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते जिथे जिथे गेले, तिथे त्यांनी नवोदित तरुणाईला भरभरून प्रोत्साहन दिले. त्यांच्या कलाकृतींमध्ये गीतात्मक शाब्दिक सौंदर्याबरोबरच सामाजिक संदेशही असत. गरिबांसाठी न्याय, ग्रामविकास, सामान्य नागरिकांची ताकद अशा विषयांना त्यांनी स्पर्श केला. आपल्या गाण्यांमधून त्यांनी नावाडी, चहाच्या मळ्यांमधील कामगार, महिला, शेतकरी यांसारख्या समाजघटकांच्या आकांक्षांना वाचा फोडली. भूपेनदांच्या रचनांमध्ये एकीकडे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा गोडवा होता, तर दुसरीकडे आधुनिकतेकडे पाहण्याची समर्थ दृष्टीही होती. विशेषतः सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना त्यांच्या संगीतामधून आशा आणि बळ मिळाले.

भूपेन हजारिका यांच्या जीवनप्रवासात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना ठळकपणे जाणवते. त्यांच्या कलाकृतींनी भाषेचे आणि प्रांतीयतेचे बंधन ओलांडून, देशभरातील लोकांना एकत्र आणले. त्यांनी आसामी, बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी आसामेतर भारतासमोर, आसाम उभे केले आणि सुश्राव्य बनवले. आसाममधील लोक असोत किंवा जगभर पसरलेले आसामी लोक असोत, आधुनिक आसामची सांस्कृतिक ओळख साकारण्यात भूपेनदांचा वाटा मोठा आहे असे म्हणणे, अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

भूपेनदा राजकारणी नसले, तरी लोकसेवेपासून ते कधीही दूर राहिले नाहीत. १९६७ साली ते आसाममधील नौबोईचा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. यावरून लोकांचा त्यांच्यावर किती गाढ विश्वास होता ते दिसून येते. ते कधीही पूर्णवेळ राजकारणात गेले नाहीत पण, लोकांची सेवा करण्याची त्यांची प्रचंड तळमळ, लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल घडवून आणणारी ठरली.

भूपेनदा यांनी केलेल्या महान कार्याची, त्यांच्या योगदानाची, भारतातील लोकांनी आणि सरकारने वेळोवेळी दखल घेतली, त्याचे मोल जाणले, बूज राखली. त्यांना ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ असे सर्व ‘पद्म पुरस्कार’, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले. २०१९ साली आमच्या कार्यकाळात भूपेनदांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करणे, हा माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या आणि ‘एनडीए’ सरकारसाठीदेखील अभिमानास्पद क्षण होता, आमचे सद्भाग्य होते. भूपेनदांना हा मान मिळाल्याबद्दल जगभरातून आनंद व्यक्त झाला, विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील लोकांनी आनंद व्यक्त केला. निखळ अस्सल संगीत सर्व अडथळे पार करू शकते. एक गाणे लोकांच्या मनातील स्वप्ने, आकांक्षा, भावभावनांचे प्रतिनिधित्व करू शकते, त्यांना शब्द-स्वरांमधून व्यक्त करू शकते आणि जगभरातील हृदयांना भिडू शकते, हेलावून टाकते, ही तत्त्वे भूपेनदा यांनी हृदयाशी कायम जपली. हा सन्मान म्हणजे, त्या तत्त्वांचा गौरव आहे, कीर्ती स्तवन आहे.

मला आठवते, २०११ साली भूपेनदा यांचे निधन झाले. तेव्हा मी दूरदर्शनवर पाहिले, त्यांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर उसळला होता. त्या क्षणी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. आपल्या ख्यातकीर्त कारकिर्दीत जसे त्यांनी लोकांना एकत्र बांधले, तसेच शेवटच्या क्षणीदेखील त्यांनी तीच परंपरा जपली. त्यामुळेच ब्रह्मपुत्रेच्या काठी असलेल्या जलुकबरी टेकडीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणे अत्यंत सुसंगत ठरले.कारण, ही नदी त्यांचे संगीत, रूपके आणि आठवणी यांची कायम साक्षीदार राहिली आहे. ती त्यांची जणू जीवनरेखाच होती. आजच्या तरुण पिढीपर्यंत त्यांच्या जीवनप्रवासाची गाथा पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘भूपेन हजारिका सांस्कृतिक ट्रस्ट’च्या कार्याला आसाम सरकारने पाठबळ दिले, ही आनंदाची बाब आहे.

भूपेन हजारिका यांचे जीवन आपल्याला दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचे, समोरच्याचे ऐकून घेण्याचे आणि समाजाशी नाळ जोडून ठेवण्याचे पाय जमिनीवरच ठेवण्याचे बळ देते. त्यांची गाणी आजही सर्व आबालवृद्धांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या सुरांमधून करुणा आणि धैर्य शिकायला मिळते. ही गाणी आपल्याला आपल्या नद्या, आपले कष्टकरी, चहा-मळ्यातले कामगार, आपली नारीशक्ती आणि युवाशक्ती यांची आठवण करून देतात. तसेच, विविधतेत एकतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतात.

भूपेन हजारिका यांच्यासारखा हिरा लाभणे हे भारताचे अहोभाग्य आहे. त्यांच्या शताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने, त्यांचा संदेश दूर-दूरपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करूया. यातून संगीत, कला आणि संस्कृतीला पाठबळ देण्यासाठी, तरुण प्रतिभावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि भारत ही सर्जनशीलता आणि कलात्मक उत्कृष्टतेसाठीची एक परिपोषक भूमी बनवण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळो.

भारताच्या सर्वांत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या, ढोला आणि सादिया यांना जोडणार्‍या सेतूला, भूपेन हजारिका यांचे नाव असणे अत्यंत योग्य आहे. त्यांच्या गाण्यांनी विविध प्रांतांमधील हृदये एकत्र गुंफत भावनिक एकात्मता सांधली, तद्वतच हा सेतू भूमी आणि लोकांना एकत्र जोडतो.

नरेंद्र मोदी
मा. पंतप्रधान