धक्कादायक! गणपती विसर्जनादरम्यान हायटेन्शन वायर कोसळून एकाचा मृत्यू, ५ जण जखमी

07 Sep 2025 14:45:25

मुंबई : महाराष्ट्रभर गणेश विसर्जन सुरू असतानाच शनिवारी दि. ६ सेप्टेंबर रोजी मुंबईतील खैराणी रोडवर विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणपती ट्रॉलीवर हायटेन्शन वायर पडल्याने एकाचा मृत्यू,तर दोन अल्पवयीन मुलांसह पाच जण जखमी झाले असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी)रविवारी दिली आहे. खैराणी रोडवरील गजानन मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली.

साकीनाका पोलिस स्टेशन परिसरातील खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ मिरवणूक पोहोचली, तेव्हा गणपती ट्रॉलीमधून तारा उचलण्याचा प्रयत्न करताना सहा जणांना विजेचा धक्का बसला आणि हा भीषण अपघात घडला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमींपैकी पाच जणांना साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बिनू सुकुमारन (३७) याला अंधेरी (पूर्व) येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.बिनू सुकुमारन हा खैरानी रोडवरील गिल्बर्ट कंपाऊंडमधील रहिवासी होता. सोबतच या अपघातात सापडलेले धर्मराज सुखदेव गुप्ता (४९), आरुष अशोक गुप्ता (६), तुषार दिनेश गुप्ता (२०), शंभू नवनाथ कामी (२०), करण विनोद कनोजिया (१४) अशी जखमींची नावे आहेत.

"दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात आम्ही मनःपूर्वक सहभागी आहोत तसेच जखमींच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारासाठी प्रार्थना करतो. या कठीण काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देत आहोत.आमचे नेटवर्क निर्धारित सुरक्षा निकषांनुसारच व्यवस्थित राखले गेले होते आणि धार्मिक मिरवणुकीच्या सुरक्षित मार्गासाठी सर्व आवश्यक काळजी घेतली होती. सार्वजनिक सुरक्षेला आम्ही सदैव प्राधान्य देतो आणि नागरिकांना विनंती करतो की सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान विद्युत सुविधांपासून सुरक्षित अंतर राखावे", असे टाटा पॉवरने आपल्या निवेदनात म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0