मुंबई : भाविकांचा लाडका मुंबईतील मानाचा गणपती लालबागच्या राजाच २७ तासांहून अधिक काल उलतून गेला तरी विसर्जन झालेले नाही. लाखो भाविकांच्या उपस्थितीत लालबागचा राजा सकाळी आठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहचला होता. राजा जवळपास चार तास समुद्रकिनारीच होता, चार तासांनंतर राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली. मात्र समुद्राला भरती आल्यामुळे विसर्जनाचे नियोजन गडबडले आहे.
तब्बल २२ तासांच्या मिरवणुकीनंतर गाजत-वाजत लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला. यंदा बाप्पाच्या विसर्जनासाठी नवीन तराफा सजवण्यात आला आहे. निरोपाची तयारी पूर्ण झालेली असतानाच भरतीच्या बदललेल्या वेगामुळे विसर्जन लांबले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ५० फूट उंचीची राजाची मूर्ती खास डिझाइन केलेल्या तराफ्यावर ठेवताना अडचणी आल्या. सोबातच लालबागचा राजा घेऊन जाणारी ट्रॉली पाण्यात अडकली, ज्यामुळे विलंबात भर पडली. समुद्राच्या भरतीमुळे तराफा हलला, ज्यामुळे मूर्ती उचलणे असुरक्षित झाले.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार भरती ओसरल्यानंतर आणि परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच लालबागच्या राजाचे विसर्जन सुरू होईल. आता २७ तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे आहे तरी भाविकांची गर्दी काही ओसरलेली नाही. अजूनही हजारो भाविक गिरगाव चौपाटीवर राजाचा निरोप घेण्यासाठी थांबले आहेत.