भारतात टेस्लाच्या पहिल्या शोरूममध्ये कार विक्रीचा श्रीगणेशा - देशातील पहिली टेस्ला परिवहन मंत्री सरनाईकांच्या दारी

05 Sep 2025 20:39:14

मुंबई, मुंबईतील बीकेसी येथे भारतातील टेस्लाचे शोरुम लॉन्च करण्यात आले. दि.१५ जुलै २०२५ रौजी दिमाखात टेस्ला कार दाखल झाली. यानंतर शुक्रवार,दि.५ सप्टेंबर रोजी टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली. दरम्यान, देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रताप सरनाईकांनी टेस्लाची पहिली कार खरेदी केली.

दरम्यान, जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते. टेस्लाची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या ५.६ सेकंदात शून्य ते १०० इतका वेग गाठू शकते. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ६२२ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते. तर टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते. नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत. मॉडेल वाय ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.

कोणत्या रंगासाठी किती पैसे?

टेस्लाच्या मॉडेल वायच्या आरडब्ल्यूडी व्हर्जनची किंमत रु.६१.०७ लाख असून, एलआर आरडब्ल्यूडी व्हर्जनसाठी ही किंमत रु.६९.१५ लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

स्टेल्थ ग्रे

पर्ल व्हाइट मल्टी-कोट - ₹95,000 अतिरिक्त

डायमंड ब्लॅक - ₹95,000 अतिरिक्त

ग्लेशियर ब्लू - ₹1,25,000 अतिरिक्त

क्विक सिल्व्हर - ₹1,85,000 अतिरिक्त

अल्ट्रा रेड - ₹1,85,000 अतिरिक्त

मंत्री सरनाईकांचा नातू टेस्लाने जाणार शाळेत

भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. महत्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काऊंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे. टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे. कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल.

- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री


Powered By Sangraha 9.0