
नवी दिल्ली : नारायणपूर पोलिस व इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुझमाडमधील एडजूम गावात नवी सुरक्षा व जनसुविधा छावणी स्थापन केली आहे. या छावणीमुळे केवळ सुरक्षाबलांचीची उपस्थितीच बळकट होणार नाही, तर स्थानिक नागरिकांसाठी विकास व सुरक्षिततेची नवी आशा निर्माण झाली आहे.
छावणी सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या हातून मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या बांधवांना आदरांजली वाहिली. आता त्यांना नक्षलवादाच्या भीतीपासून मुक्त होऊन जगता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी गावकऱ्यांनी वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सोयींची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी लवकरच सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन दिले. तसेच "नियद नेल्लानार" योजनेअंतर्गत जनसमस्या निवारण शिबिर आयोजित करण्याची माहितीही देण्यात आली.
ही छावणी नारायणपूर जिल्ह्यातील दुर्गम अबूझमाड परिसरात गेल्या एका वर्षात सुरू झालेली १६ वी सुरक्षा व जनसुविधा छावणी ठरली आहे. पोलिस डीआरजी, बस्तर फायटर तसेच आयटीबीपीच्या ३८ वी, ४० वी व २९ वी वाहिनींच्या संयुक्त मोहिमेतून हे काम पूर्ण करण्यात आले. मुसळधार पाऊस व कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही छावणी उभारण्यात सुरक्षाबळांना यश आले. सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नव्या छावणीमुळे परिसरात रस्ते, पूल, मोबाईल नेटवर्क, आरोग्य व शिक्षण सुविधा जलद गतीने उपलब्ध होतील. नक्षली हिंसेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल व विकासकामे सुरळीतरीत्या पार पाडली जातील.
अबुझमाडमध्ये विकासाला गती
गेल्या एका वर्षात अबूझमाडमध्ये पोलिस छावण्या सुरू झाल्यामुळे व विकासकामांना गती आल्याने नक्षली विचारसरणी ढासळली आहे. या काळात १६४ नक्षलवादी आत्मसमर्पण करीत सुरक्षाबलांच्या ताब्यात आले, तर ९६ नक्षलवादी ठार झाले आणि ७१ जणांना अटक करण्यात आली. एडजूममध्ये छावणीची स्थापना ही नक्षलवादी विरोधातील लढाईतले आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, सुरक्षाबळांच्या मते या सततच्या प्रयत्नांमुळे अबूझमाड लवकरच पूर्णपणे नक्षलमुक्त होऊ शकेल.