काँग्रेसच्या ‘बीडी’ ट्विटवरून बिहारच्या राजकारणात नवा वाद

05 Sep 2025 16:57:19

नवी दिल्ली : राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना उद्देशून अपशब्द वापरल्याचा वाद अजून थंडावलेला नाही. तोच काँग्रेसला ‘बीडी ट्विट’ वादाचा नवा फटका बसला आहे. केरळ काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये बिहारची तुलना बीडीशी करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि जदयुने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून राजदचे तेजस्वी यादव यांनाही “चूक झाली असेल तर माफी मागावी,” असे म्हटले आहे,

केरळ काँग्रेसच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते “बीडी आणि बिहार दोन्ही ‘बी’ पासून सुरू होतात. आता त्यांना पाप मानले जाऊ शकत नाही.” या ट्विटसोबत एक चार्टही शेअर करण्यात आला होता. त्यात दाखवण्यात आले की, जीएसटी परिषदेनं तंबाखूवरील कर २८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर नेला आहे, सिगारेट–सिगारवरील करही वाढवण्यात आला आहे; मात्र बीडीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला आहे. या पोस्टवर संताप व्यक्त होताच काँग्रेसने ते डिलिट केले, पण त्यापूर्वीच या ट्विटने बिहारच्या राजकारणात धुमाकूळ घातला.

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. “काँग्रेसने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केला आणि आता संपूर्ण बिहारचा. हेच काँग्रेसचे खरे रूप आहे, जे पुन्हा पुन्हा देशासमोर उघड होत आहे. बिहारची जनता हे कधीच माफ करणार नाही, असे चौधरी म्हणाले. जदयुचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनीही केरळ काँग्रेसच्या या कृतीला लज्जास्पद असे संबोधले.

Powered By Sangraha 9.0