‘न ऋते त्वत् क्रियते किंचनारे महामर्कम् मघवन्चित्रमर्च’ अर्थात, तुझ्या स्मरणपूजनाशिवाय मनुष्य कोणतेही कर्म करत नाही, असे ऋग्वेदात म्हटले आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना श्रीगणेश स्तवन करणे, ही भारतीय संस्कृती. श्रीगणेश ही प्रथमपूज्य देवता आहे. तेव्हा, आज अनंत चतुर्दशीनिमित्ताने बाप्पाला निरोप देताना, सुबुद्धीसाठी गणेश उपासनेचे महत्त्व विशद करणारा हा लेख...गणपती ही बुद्धिदाता, विद्यादाता, ज्ञानमय असलेली ज्ञानदेवता आहे. ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि.’ ज्ञानमय गणेशाची साधना करणारा गणेशभक्तही गणेश अनुभूतीने ज्ञानमय होत असतो. एखादे कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणेश स्मरण म्हणजे शुद्ध बुद्धीने कार्याला आरंभ करणे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना गणेशवंदनेत ‘देवा तुचि गणेशु, सकलमती प्रकाशु’ अशी केली आहे. समर्थ रामदास स्वामींनी पण दासबोधाच्या आरंभी ‘ॐ नमोजी गणनायका| सर्वसिद्धी फलदायका| अज्ञानभ्रांती छेदका| बोधरूपा॥’ अर्थात, अज्ञानाचा नाश करणारा, सर्व सिद्धींचे फळ देणारा ओंकाररूप गणपती मला ग्रंथ सांगण्याचे सामर्थ्य देवो, अशी प्रार्थना केली आहे.
कोणत्याही कार्यात योग्य निर्णय घेण्यासाठी शुद्ध बुद्धीची गरज असते, जी श्रीगणेश उपासनेने प्राप्त होते. आपण नित्य गणेश प्रार्थनेत ‘अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे’ अशी प्रार्थना करत असतो. ‘मती’ हा शब्द विचारशक्ती, निर्णय क्षमता, सद्बुद्धी अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. मन, बुद्धी, अहंकार, चित्त या सर्वांचा नियंत्रक म्हणजे सद्बुद्धी! मेंदू हे जाणिवांचे केंद्र आहे. ग्रहण, स्मरण, विचार, कल्पना या बुद्धीच्या क्षमता आहेत. यांच्यावरच पुढे संभाषण चातुर्यता, सृजनशीलता, चिंतनशीलता यांचे विकसन होत असते. श्रीगणेश अथर्वशीर्षामध्ये ‘अनेन गणपति मभिषिंचति स वाग्मी भवति’ असा उल्लेख आहे. ‘वाग्मी’ म्हणजे बोलण्यात हुशार, कुशल आणि प्रभावी वक्ता.
श्रीगणेश हा सूक्ष्म शरीरातील मूलाधारचक्राचा अधिपती आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून श्रीगणेशाचे स्थान कुंडलिनीच्या मूलाधार चक्रात मानले गेले आहे. ‘त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं.’ गणेश उपासना मूलाधार चक्र जागृत करण्यास मदत करते. हे मूलाधार जागृत झाले की, मनुष्य उर्ध्वरेता होतो, म्हणजेच त्याची जीवनशक्ती अधःपतन न होता, वरच्या दिशेने प्रवाहित होते. यामुळे तो ओजस्वी, तेजस्वी आणि अध्यात्मदर्शी होतो. श्रीगणेश हे विघ्न निवारण करणारे देव. विघ्नांचे मूळ बरेच वेळेला आपल्या चुकीच्या बोलण्याने, वागण्याने, मत्सर, अहंकार किंवा गैरसमजातून निर्माण झालेल्या शत्रूंमुळे असते आणि हे नकळत आपल्या कार्यात विघ्न निर्माण करत असतात, म्हणूनच त्यांची शत्रू भावना कमी व्हावी व मित्रभाव जागृत व्हावा, यासाठीच श्रीगणेशांकडे ‘शत्रूणां बुद्धि नाशोस्तु मित्राणां उदयं कुरु’ अशी प्रार्थना आहे. शब्द ही प्रचंड शक्ती आहे. परंतु, तिचा योग्य वापर करण्याचे कौशल्य शुद्ध बुद्धीने प्रयत्नपूर्वक संपादन करावयास हवे.
सद्बुद्धी प्राप्ती हे गणेश उपासनेचे फलित आहे. ऋग्वेदातही ‘ब्रह्म जिन्वत मुतजिन्वतं धियो हतं रक्षांसि सेधत ममीवाः’ म्हणजेच ज्ञान प्राप्त करून सद्बुद्धीचे रक्षण करा व समाजातील आसुरी प्रवृत्तींचा नाश करा, असा मंत्र आला आहे. बुद्धी जागृत असेल, तरच आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्षाचे ज्ञान प्राप्त होते आणि त्याद्वारे आपली कर्मे फलद्रूप होत असतात. केवळ मनोमय कोषच नाही, तर पंचकोश गणेश उपासनेने विकसित होत असतात. गणेश उपासना केल्यास आत्मिक चैतन्य वाढून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यास मदत होते.
वेदविभूषण श्री. सिद्धिविनायक उमेश टाकळीकर
गणपती बाप्पा मोरया...