मुंबई, पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीला पंजाबमधील आम आदमी सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे. भगवंत मान यांच्या सरकारने भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ आणि भारतीय हवामान खात्याने वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या इशार्याकडे दुर्लक्ष करताना, राजकारण करण्यातच धन्यता मानल्याचा आरोप प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे.
सध्या सातत्याने मुसळधार कोसळणार्या पावसामुळे पंजाबमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पंजाबला या पूराचा आर्थिक फटकादेखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. यावर पंजाबच्या विधानसभा अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी भगवंत मान सरकारवर टीका केली. एप्रिल महिन्यापासून भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने आणि भारतीय हवामान खात्याने सातत्याने धरणातील पाणी पातळी आणि अधिकच्या पावसाच्या धोक्याबाबत सरकारला सूचना केल्या होत्या. त्याचवेळी धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करण्याऐवजी मान सरकारने राजकारणाला प्राधान्य देत धरणाजवळ पोलीस उभे केले. त्यामुळे आज हा धोका निर्माण आहे. आज भाक्रामधून ६५ हजार युसेक आणि पोंगमधून ८० हजार युसेक विसर्ग सोडणे अपरिहार्य झाल्याने, पंजाब राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची टीका बाजवा यांनी केली.
यावेळी मान्सूनपूर्व तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याचेही पंजाबमधील सरकारी अधिकार्यांनी स्पष्ट केले. पंजाबमधील २३ जिल्ह्यांमधील २,८०० किमी बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नाल्यांच्या साफसफाईसाठी सरकारने ११७ कोटी रुपये घोषित केले होते. मात्र, हा निधी प्रत्यक्ष हाती येण्यास एक महिन्याचा अवधी लागत असल्याने ती घोषणा आधी करणे आवश्यक असल्याचेही अधिकार्यांनी म्हटले आहे.
सध्या पंजाबमधील रावी, सतलज, बियास आणि घग्गर या चारही नद्या दुथडी भरून वाहात असल्याने, पंजाबमधील जवळपास १२ हजार नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. तसेच १९०० गावे पाण्याखाली गेली असून, या पुरामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या आधीही पंजाब पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागल्याने आप सरकारने धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न विचारत सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे.
नुकसान मोठे, केंद्र सरकार पंजाबच्या जनतेच्या पाठीशी!केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंजाबमधील पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. पंजाबमध्ये झालेले नुकसान मोठे असून, केंद्र सरकार पंजाबच्या जनतेच्या पाठीशी भक्कम उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची गरज असून, पूर ओसरल्यानंतर पसरणार्या रोगराईचा अंदाज घेत त्यावरही काम करणे आवश्यक असल्यचेही त्यांनी म्हटले. तसेच या भेटीचा तपशीलवार अहवाल ते पंतप्रधानांना देणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.