कॅरेबियन समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय समुद्रस्थळी अमेरिकेने नुकत्याच एका जहाजावर हल्ला केला. त्यात ११ गुन्हेगार ठार झाले. ट्रम्प यांनी या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करत म्हटले की, मारले गेलेले गुन्हेगार ‘ट्रेन डे अरागुआ’ या दहशतवादी संघटनेचे लोक होते. हा हल्ला म्हणजे, अमेरिकेमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणार्यांसाठी इशारा आहे. यावर ट्रम्प यांनी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो ‘एआय जनरेटेड’ आहे असे काहीच घडलेले नाही, असे व्हेनेझुएलाचे सरकार म्हणत आहे. अमेरिकेने ‘ट्रेन डे अरागुआ’ या संघटनेला ‘दहशतवादी’ संबोधत बंदी घातली. त्याचबरोबर अमेरिकेने व्हेनेझुएला देशाला ‘नार्को स्टेट’, तर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना ‘ड्रग माफिया’ म्हणून जाहीर केले आहे. मादुरो यांना पकडून देणार्याला अमेरिकेने ५० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४४०.६९ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
असो! सदर घटनेत उल्लेख केलेली ‘ट्रेन डे अरागुआ’ टोळी काय आहे? तर सुरुवातीला ही टोळी रेल्वेसंबंधित कामात खंडणी मागायची. सरकारने या टोळीतील गुन्हेगारांना पकडून टोकोरान येथील तुरुंगात डांबले. पण, या टोळीच्या म्होरक्याने तुरुंगाशी संबंधित सगळ्यांनाच पैसे चारले आणि तुरुंगच ताब्यात घेतले. या टोळीतली प्रत्येक सदस्य या तुरुंगात कुटुंबासह राहू लागला. तुरुंगात पोन, टिव्हीसह, हॉटेल, बाजारपेठ, पोहण्यासाठी तलाव, उद्यान अशा सुविधा या टोळीने तुरुंगात निर्माण केल्या. तुरुंगातूनच ही टोळी गुन्हेगारीचे नियोजन करू लागली. त्यात दहशतवाद, अमली पदार्थ तस्करी, मानवी तस्करी आणि गुलामगिरी वगैरे गंभीर गुन्हे ही टोळी करू लागली. पुढे २०२३ साली व्हेनेझुएला सरकारने तुरुंगावर कारवाई केली.
व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांचे सरकार, प्रशासन ‘कार्टेल डे लॉस सोलेस’ नावाच्या संघटनेद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीचा धंदा करतात. त्या पैशातून सत्ता मिळवतात. अमेरिकेने असेही आरोप केले की, कोलंबिया देशात मोठ्या प्रमाणात कोकेनचे उत्पादन होते. या अमली पदार्थांच्या तस्करीसाठी तस्करांना व्हेनेझुएलाचे हवाई दल व लष्करी ताफे, विमाने, ट्रक व बंदरांवरून संरक्षण देतात. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती मादुरो आणि त्यांचे सरकार, प्रशासन ‘कार्टेल डे लॉस सोलेस’ नावाच्या संघटनेद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीचा धंदा करतात. त्या पैशातून सत्ता मिळवतात.
पण, यावर मादुरो यांचे म्हणणे आहे की, व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणात तेलसाठे आहेत. अमेरिकेला या तेलसाठ्यांवर वर्चस्व हवे आहे. त्यासाठी अमेरिकेला अमेरिकेच्या हो ला हो करणारे सरकार व्हेनेझुएलामध्ये हवे आहे. मादुरो आणि त्यापूर्वीचे राष्ट्रपती हुगो चावेज यांनी कधीही अमेरिकेला देशामध्ये ढवळाढवळ करू दिली नाही. चावेज यांच्या मृत्यूनंतर मादुरो राष्ट्रपती झाले. मात्र, अमेरिकेने ठपका ठेवला की, या निवडणुकीत भ्रष्टाचार झाला. त्यानंतर गुईडो याविरोधी पक्षाच्या नेत्याने स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. अमेरिकने आणि युरोपातील काही देशांनी गुईडो यांना पाठिंबा दिला. मात्र, जनतेने आणि जगभरातील इतर देशांनी मादुरो यांचे समर्थन केले आणि निकोलोस मादुरो हेच व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती झाले. या काळात अमेरिकेच्या दोन सैन्याधिकार्यांनाही व्हेनेझुएलातून पकडण्यात आले. ते गुईडोंना मदत करून निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी व्हेनेझुएलात आले होते, असे निकोलस यांनी जाहीर केले. मात्र, आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही, असे अमेरिकेने म्हटले. मात्र, त्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले. व्हेनेझुएलाशी व्यवहार करणार्या देशांवरही आर्थिक निर्बंध लादण्याची धमकी दिली. व्हेनेझुएलामध्ये गृहयुद्धही सुरू झाली. हे सगळे अमेरिकेचे षड्यंत्र आहे, असे व्हेनेझुएलाच्या सरकारचे म्हणणे. सध्या तरी दक्षिण अमेरिकेत असलेला व्हेनेझुएला देश अमेरिकेच्या नावडत्या यादीत असलेल्या रशिया, चीन आणि इराण या देशांसोबत जगाच्या राजकारणात ठाम उभा आहे. भारताशीही या देशाचे मैत्रीपूर्वक संबंध आहेत. या सर्व देशांचा पाठिंबा असल्याने अमेरिका उघड उघड व्हेनेझुएला देशाविरोधात काहीही करू शकत नाही. तरीही अधूनमधून अमेरिका व्हेनेझुएलाविरोधात कारवाया करत असते. या परिप्रेक्ष्यात वाटते की, जगावर अधिपत्य गाजवायच्या नादात अमेरिका देश राजकीय संकेत आणि नीतीमूल्य विरसला आहे का?
९५९४९६९६३८