देशाच्या विकासात शिक्षकांचे मोठे योगदान; प्रा. मनिष घायाळ

04 Sep 2025 18:56:49

खानिवडे : शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपाडा येथील शांती गोविंद हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रा. मनिष घायाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देऊन त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवतात.”

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मनिष घायाळ उपस्थित होते. त्यांच्यासोबत शाळेचे अध्यक्ष भरत म्हात्रे, मुख्याध्यापक जयेश म्हात्रे, उपमुख्याध्यापक शांता भूसाणे तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी या निमित्ताने शिक्षकांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

आपल्या प्रभावी भाषणात प्रा. घायाळ म्हणाले, “शिक्षक म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ आहेत. पुस्तक हेच माझे गुरू आहे” असे सांगून त्यांनी स्वतः लिहिलेली कविता सादर करत विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार आणि निसर्गापासून शिकण्याचे महत्त्व समजावले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होणारा ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची आठवण करून देणारा दिवस असल्याचेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0