शिक्षक : एक राष्ट्रनिर्माता

    04-Sep-2025
Total Views |

आज, दि. ५ सप्टेंबर. हा दिवस दरवर्षी आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाचे महत्त्व केवळ शिक्षकांचा गौरव करण्यापुरते मर्यादित नाही; तर तो दिवस राष्ट्रनिर्माणातील शिक्षकांच्या भूमिकेची पुनःप्रत्ययाने आठवण करून देणारा असतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती व ख्यातनाम तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस देशभर साजरा केला जातो. त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन ज्ञान, तत्त्वज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी वेचले. त्यांच्या जीवनविचारांतून शिक्षकाचे स्थान केवळ शाळा-महाविद्यालयापुरते नसून ते राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी जोडलेले आहे, हे स्पष्ट होते.

शिक्षकांचे स्थान-राष्ट्राच्या संस्कार वृक्षाचे मूळ
राष्ट्र म्हणजे केवळ भूभाग वा लोकसंख्या नव्हे; राष्ट्र हे सांस्कृतिक परंपरेवर, नैतिक मूल्यांवर, सामाजिक समरसतेवर व स्वावलंबी अर्थव्यवस्थेवर आधारलेले सजीव तत्त्व आहे. या राष्ट्राला दिशा देणारा प्रमुख घटक म्हणजे शिक्षक वर्ग. कारण, शिक्षक हे मुलांमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञान देऊन थांबत नाहीत, तर त्यांना चांगला नागरिक, जबाबदार समाजपुरुष, सजग मतदार आणि कुशल कारागीर घडवतात.

गुरु-शिष्य परंपरेने भारताला अद्वितीय अशी सांस्कृतिक ओळख दिली आहे. प्राचीन आश्रमशाळांमध्ये ऋषीमुनींनी ज्ञान, विज्ञान, शास्त्र, कला, युद्धकला, जीवनमूल्ये यांचे शिक्षण दिले. त्या काळात गुरूचे स्थान आई-वडिलांपेक्षा वर मानले गेले. कारण, आईवडील शरीर देतात; पण गुरू जीवनमूल्ये देतात. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’ ही संकल्पना म्हणूनच भारतीय समाजमनात खोलवर रुजलेली आहे.

शिक्षक दिन व राष्ट्रीय विचार
शिक्षक दिन हा केवळ एका व्यावसायिक समूहाचा सन्मान दिवस नाही, तर तो आपल्या राष्ट्रीय जीवनातील शिक्षकांचे स्थान अधोरेखित करणारा दिवस आहे. राष्ट्रनिर्मितीची पायाभरणी शाळेच्या वर्गात होते. एक शिक्षक विद्यार्थ्याच्या मनात देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, लोकशाही मूल्ये यांची बीजे पेरतो.

डॉ. राधाकृष्णन नेहमी सांगत, "शिक्षक हा समाजाचा आत्मा आहे. समाजातील नैतिक अधःपतन, हिंसा, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, जातीयतेचे विष या सर्वांवर उपाय म्हणजे आदर्श शिक्षक. जेव्हा शिक्षक मुलांना सत्य, न्याय, समता, बंधुता यांचे धडे शिकवतो, तेव्हा ती मुलं मोठे होऊन जबाबदार नागरिक बनतात आणि राष्ट्र अधिक बळकट होते.”

राष्ट्रीय दृष्टिकोनातून शिक्षकांची भूमिका व कार्य
‘आपले विद्यालय, आपला स्वाभिमान’ - एक देशव्यापी संकल्प अभियान शिक्षकांकडे केवळ सेवाशर्ती व एक कर्मचारी म्हणून न पाहता, या राष्ट्राचा राष्ट्रनिर्माता म्हणून पाहणे गरजेचे आहे. देशाच्या भावी पिढीला घडविणारा शिक्षक हा महत्त्वाचा आहे, तेव्हा या घटकाकडे समाजाने, प्रशासनाने त्या दृष्टीने पाहून त्यांना समाजात स्थान मिळवून देणे तेवढेच गरजेचे आहे.

‘राष्ट्र के हित में शिक्षा, शिक्षा के हित में शिक्षक, शिक्षक के हित में समाज’ या राष्ट्रीय विचाराने ‘अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ’ (अइठडच) हे प्राथमिक शिक्षकांपासून ते वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी काम करणारे राष्ट्रीय विचारांचे संघटन आहे. ही संघटना राष्ट्रीय मूल्य रुजवण्याचे कार्य देशभर करत असून, शिक्षक हा राष्ट्रनिर्माता, समाज जडणघडणीतील महत्त्वाचा दुवा, मूल्य संस्कार, नागरी कर्तव्य, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आदी मूल्यांची रुजवणूक करणारा महत्त्वाचा घटक असल्याची जाणीव ‘शैक्षिक महासंघा’ने आयोजित ‘आपले विद्यालय, आपला स्वाभिमान’ या उपक्रमातून समग्र देशात करून दिली.

‘अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ’ प्रत्येक वर्षी शिक्षकांमध्ये पर्यायाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचारांची मूल्य रुजवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. दि. १ सप्टेंबर रोजी देशभरात एकाच दिवशी ‘आपले विद्यालय, आपला स्वाभिमान’ हा राष्ट्रीय मूल्यांची जपवणूक करणारा संस्कारक्षम प्रेरणादायी उपक्रम समग्र देशभरात संपन्न झाला. आपल्या संस्कृतीत संकल्पाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यादृष्टीने शाळा, विद्यार्थी, शिक्षक, समाज मिळून शाळेच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संकल्प केला. महाराष्ट्रातही कोकण विभाग वगळता सर्व माध्यमांच्या शाळांकडून यास उत्तम प्रतिसाद मिळाला. तो संकल्प होता की - आम्ही सर्व मिळून हा संकल्प करतो की, आम्ही आमचे विद्यालय स्वच्छ, हिरवेगार व अनुशासनयुक्त ठेवू. आमच्या विद्यालयातील साधनसंपत्ती व वेळ ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून मानून तिचे विवेकी जतन करू. विद्यालयात असे वातावरण निर्माण करू, जिथे कोणताही भेदभाव न मानता सौहार्दपूर्ण बंधुभावाने आम्ही वागू.

विद्यालय ही केवळ एक संस्था नसून, संस्कार, सेवा, समर्पण यांचे मंदिर म्हणून त्याचा गौरव वाढविण्यासाठी प्रयत्न करू. विद्यालय हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून चारित्र्यनिर्मिती, आत्मविकास व समाजसेवेचे उत्तम साधन म्हणून वापरू. शेवटी आम्ही सर्व मिळून हा संकल्प करतो की, आपले विद्यालय आपला गौरव आहे. आपला आत्मसन्मान आहे, राष्ट्रनिर्मितीचा गौरव आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संघटनेच्या या संस्कारक्षम उपक्रमाला शुभेच्छा संदेश देऊन राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत हा उपक्रम राबविण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश दिले व शिक्षण आयुक्त यांनी याबाबतीत राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांना पत्राद्वारे कळवले. यामुळे समग्र राज्यात कार्यक्रम राबविले गेले. यासाठी ‘अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ’ संलग्नित ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’, ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग’, ‘महाराष्ट्र राज्य मान्य खासगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ’ व ‘अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ उच्च शिक्षा विभाग’ या संलग्नित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संकल्प अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. संपूर्ण राज्यात या संकल्पना उत्स्फूर्त होणे प्रतिसाद देऊन एक वातावरणनिर्मिती यानिमित्ताने झाली.

’अइठडच’ संलग्न ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग’
‘आपले विद्यालय, आपला स्वाभिमान’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले.
१) एकूण जिल्हा परिषद - ३४
२) सहभागी जिल्हे - २६
३ सहभागी शाळा - २२ हजार, ८८१
४) कार्यक्रमात सहभागी शिक्षकांची संख्या - ७७ हजार, ९१९
५) कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या - ३ लाख, १० हजार, ९९२०

१. स्वातंत्र्य संग्रामातील शिक्षकांचे योगदान : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक शिक्षक पुढे आले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, बाळशास्त्री जांभेकर हे सर्व शिक्षण क्षेत्राशी निगडित होते. विद्यार्थ्यांना त्यांनी केवळ विषयांचे ज्ञान न देता, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली.

२. सामाजिक सुधारणांमध्ये शिक्षकांचे योगदान: राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, कर्वे यांसारख्या शिक्षकांनी सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देऊन समाजप्रबोधन केले. स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाह यांसारख्या चळवळींना शिक्षकी वृत्तीनेच दिशा दिली.

३. नव्या भारताचे स्वप्न घडविण्यात शिक्षकांचे योगदान : आजचा भारत तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, अवकाश, औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत आहे. या प्रत्येक क्षेत्रामागे शिक्षकांनी निर्माण केलेले वैज्ञानिक मनोवृत्तीचे विद्यार्थी आहेत. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांनी स्वतःचे श्रेय आपल्या शिक्षकांना दिले आहे.

आधुनिक काळातील आव्हाने व शिक्षक
आजच्या काळात शिक्षण ही फक्त नोकरी मिळविण्याची साधनरचना म्हणून पाहिली जाते. स्पर्धा परीक्षा, करिअरचा दबाव, जागतिकीकरण, माहितीचा प्रचंड वेग यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ, ताण, मूल्यांचा र्‍हास वाढला आहे. अशा वेळी शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना योग्य जीवनमूल्ये देणे अत्यावश्यक आहे.

शिक्षक दिन आपल्याला स्मरण करून देतो की, शिक्षकाने चरित्रनिर्मिती हे आपले मुख्य ध्येय मानले पाहिजे.
- विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत केला पाहिजे.
- ज्ञानासोबत संस्कार देणे ही त्यांची जबाबदारी आहे.
- डिजिटल युगातही मानवी स्पर्श हरवू नये, यासाठी शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व जिवंत प्रेरणास्थान असावे.

राष्ट्रासाठी शिक्षक-आदर्श व भूमिका
भारताला आज विज्ञान, उद्योग, कृषी, संरक्षण या सर्व क्षेत्रांत सक्षम नागरिकांची गरज आहे. पण, त्या बरोबरच त्याला नीतिमान, प्रामाणिक, सहिष्णु, देशभक्त नागरिकांची आवश्यकता आहे. ही निर्मिती फक्त शिक्षक करू शकतो. ‘मी कोण?’, ‘मी भारतीय आहे आणि माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकतो?’ हा प्रश्न शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःला सतत विचारायला लावला पाहिजे. प्रत्येक शाळा म्हणजे त्या राष्ट्राच्या भविष्यातील नागरिकांची कार्यशाळा आहे. शिक्षक म्हणजे, त्या कार्यशाळेचा अभियंता. अभियंत्याची जशी रचना चुकली तर इमारत कोसळते, तसेच शिक्षकाने कर्तव्य टाळले तर राष्ट्राचा पाया हलतो. म्हणून या शिक्षकाला केवळ विद्यादानाचे कार्य करू द्यावे. इतर अध्यापनेतर कामात गुंतवून न ठेवता, त्यांना ‘शिक्षक एक राष्ट्रनिर्माता’ म्हणून काम करू द्यावे. ही शासनाकडून, प्रशासनाकडूनदेखील अपेक्षा राहील.

निष्कर्ष
शिक्षक दिन हा केवळ एक औपचारिकता न राहता, तो राष्ट्रीय पुनर्जागरणाचा दिवस व्हावा, हीच खरी अपेक्षा आहे. शिक्षकांनी आपले व्यक्तिमत्त्व असे घडवावे की, प्रत्येक विद्यार्थी त्यांच्याकडून प्रेरणा घेईल. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वातले ज्ञान, संयम, कर्तव्यभावना, नीतिमत्ता व राष्ट्रनिष्ठा हीच खरी त्यांची ओळख ठरावी.

डॉ. राधाकृष्णन म्हणाले होते, "शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे केवळ रोजगार नव्हे, तर सुसंस्कृत, कर्तव्यपरायण व जबाबदार नागरिक घडवणे.” या वायात शिक्षक दिनाचे आणि शिक्षकांच्या कार्याचे सार दडलेले आहे.

शिक्षक दिन हा दिवस राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाने शिक्षकांना अभिवादन करण्याचा आहे. कारण, आजचा विद्यार्थी हा उद्याचा नेता, शास्त्रज्ञ, सैनिक, शेतकरी किंवा समाजसेवक आहे आणि त्याला घडविणारा व्यक्ती म्हणजे शिक्षक. त्यामुळेच आपण ठामपणे म्हणू शकतो; ‘शिक्षक घडले तर राष्ट्र घडेल!’

पुरुषोत्तम काळे
(लेखक प्रांत कार्यवाह,अइठडच संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आहेत.)