चेरापुंजी नाही तर यंदाही महाराष्ट्रातील 'हे' गाव ठरलंय देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण

04 Sep 2025 20:31:46


सातारा : (Patharpunj) देशात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने मागे टाकले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या पाथरपुंज असे या गावाचे नाव आहे. 

महाराष्ट्रातील अतिवृष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, गगनबावडा कोयना, नवजा आणि वलवण या ठिकाणांही मागे टाकल्याने पाथरपुंज हे पावसाचे नवे 'माहेरघर', म्हणून उदयास येत आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच काळात मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. केवळ मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत प्रचंड आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंजमध्ये सातत्याने पडणाऱ्या विक्रमी पाऊस लक्षात घेता, हवामान बदलांच्या या काळात पर्जन्यमानाचे केंद्र पश्चिमेकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्येही पाथरपुंजने चेरापुंजीला मागे टाकले होते. हाच कल कायम राहिल्यास, देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून लवकरच पाथरपुंजचे नाव घेतले जाईल.

पाथरपुंज या गावाचे भौगोलिक स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे गाव पाटण तालुक्यात असले तरी सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चांदोली अभयारण्यात वसलेले आहे. येथील काही घरे तिन्ही जिल्ह्यांमध्ये विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर असूनही, येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते, ज्यामुळे वारणा धरण भरण्यामध्ये या गावाचा मोठा वाटा आहे.



Powered By Sangraha 9.0