म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ

04 Sep 2025 19:30:35

मुंबई : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवार २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या आज 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आदी उपस्थित होते. नाशिक मंडळाच्या या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गतच्या एकूण ४७८ सदनिकांचा समावेश असून या सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. सोडतीअंतर्गत देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सोडतीसाठी दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. दि. ३ ऑक्टोबर, रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दि. ३ ऑक्टोबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दि.३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दि.४ ऑक्टोबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता म्हाडाच्या या संकेतस्थळावर केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक व स्थळ संकेतस्थळावर कळविले जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0