दु:ख काहे खतम नहीं होता

04 Sep 2025 15:24:56

आररं... कसं पचवायचं हे दुःख! देवेंद्र फडणवीसांना आपले सगळे डावपेच उलटवण्यासाठीच देवाने जगात पाठवलं की काय? तीन दिवस कसं छान सुरू होतं सगळं. काही तरी अशुभ घडूही शकले असते. पण, त्यांनी शासननिर्णय काढला आणि ते सगळे मागे फिरले. याचा अर्थ महाराष्ट्र शांत राहणार, तेच मुख्यमंत्री राहणार, आणि आमच्या डोळ्यात सलणारे ते दोघेही उपमुख्यमंत्री राहणार!

ये दुःख काहे खतम नहीं होता बे? काय स्वप्न पाहिली होती. मुंबईत लाखो लाडक्या बहिणी ‘आमचा देवाभाऊ’ म्हणत मोठा कार्यक्रम करीत होत्या. त्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ, त्यांचे मंत्रिमंडळ, सरकार, प्रशासन त्यात गुंग राहील; त्याचवेळी सगेसोयरे आंदोलन मुंबईच्या दिशेने कुच करेल. त्यामुळे तयारी नसल्याने सरकार-प्रशासनाची तारांबळ उडेल. त्यात गणेशोत्सवामध्ये नेहमीपेक्षा कैकपटीने जास्त मुंबईकर रस्त्यावर उतरतात. अशावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये घुसून काहीही करता येऊ शकते. दुसरीकडे या आंदोलनामध्ये काही मुस्लीम नेतेमंडळीपण गळ्याच्या शिरा ताणून आंदोलकांना म्हणत होते, "हिंदू तुम्हाला आरक्षण मिळवून देत नाहीत, तर तुम्ही कशाला भगवा झेंडा हातात घेता? कशाला हिंदू म्हणवून घेता. इथे या मशिदी उघड्या केल्या आहेत.” पण, इतकं करूनही आमच्या हाताला अपयशच आले. त्याच काय आहे, देवेंद्र मुख्यमंत्री असले की, दररोज मोर्चे काढण्यासाठी लोकांना उकसवायचे हे आमचे ठरलेले! त्यामुळे देवेंद्र यांना त्रास देण्यासाठी आमचे ठरलेले लोक आंदोलन करत रस्त्यावर उतरतात. पण, त्यांनी रस्त्यावर नाच सुरू केला की, या देवेंद्र यांना पुन्हा दहा हत्तीचे बळ येते आणि नाच करणार्‍या आणि त्यांना नाचवणार्‍यांना ते अद्दल घडवतात. काय करावं? आता असे करायचे का? की, फडणवीसांनी जो शासन निर्णय काढलाय त्याबद्दल अफवा पसरवूया का? महाराष्ट्र शांत राहून कसं चालेल? हं! आता मोर्चा ओबीसी समाजाकडे वळवायला हवा. समाजातल्या काही लोकांना भडकवायला हवे. तसे झाले की बेस्ट! छे, ‘बेस्ट’ म्हटले की ‘बेस्ट’च्या निवडणुकीत मिळालेला तो भोपळा आठवतो. भोपळा त्यांना मिळाला काय आम्हाला मिळाला काय? आम्ही सत्ताप्राप्तीसाठी सामुदायिक प्रयत्न करणारे आहोत, तर आमचे भोपळ्याशी नाते काही तुटत नाही. आतापण आंदोलन चिघळणार होते. पण, हाती शून्य आले. ‘ये दुःख कब खतम होगा?

दसरा महोत्सवही निधर्मी?

लेखिका बानू मुश्ताक यांना कर्नाटक काँग्रेस सरकारने नुकतेच जगद्विख्यात ‘म्हैसुरु दसरा महोत्सव’च्या उद्घाटक म्हणून आमंत्रण दिल्याचे वाचनात आले. अर्थात, महोत्सवाचे उद्घाटन बानूने केले काय किंवा कोण्या एलिझाबेथने केले काय? फक्त त्यांच्या विचार आणि कृतीमध्ये श्रद्धा असायला हवी, हेच अनेकांचे मत आहे. पण, बानू मुश्ताक यांच्या नावाला भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटन आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांचे म्हणणे आहे की, आधी बानू मुश्ताक यांनी स्पष्ट करावे की, देवी चामुंडेश्वरीवर त्यांचा विश्वास आहे का?

ते असे म्हणतात; कारण बानू मुश्ताक यांनी २०२३ साली कन्नड साहित्य संमेलनात प्रश्न विचारला होता की, "अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांनी यामध्ये कसे सहभागी व्हावे?” कारण, त्यांच्या मते, साहित्य संमेलनामध्ये कन्नड भाषेला भुवनेश्वरी देवी म्हणून पुजले होते, तसेच संमेलनातल्या झेंड्याला हळद-कुंकवाने रंगवले होते. हे सगळे हिंदू धर्मसंस्कृतीनुसार केले होते. त्यामुळे बानू मुश्ताक म्हणाल्या, "मी इथे कशी सहभागी होऊ शकेन?” पुढे २०२५ साली याच बानू मुश्ताक यांच्या एका पुस्तकाला ‘बुकर पुरस्कार’ मिळाला. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय लेखकांच्या कोणत्या साहित्याला पुरस्कार दिला जातो, हे काही लपलेले नाही. विषयांतर झाले. पण, हिंदू धर्मश्रद्धा पाहून व्यथित होणार्‍या बानू मुश्ताक आता दसरा महोत्सवामध्ये मुख्य उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या म्हणतात की, "दसरा महोत्सव हा कोणत्या एका धर्माचा महोत्सव नाही, तर तो कर्नाटकचा सांस्कृतिक महोत्सव आहे.” काँग्रेस सरकारपण म्हणत आहे की, "हा महोत्सव धार्मिक नाही, तर हा राजकीय महोत्सव आहेे.” पण, हे खरे नाही. देवी चामुंडेश्वरीने महिषासुराचा वध केला. या स्मृतिनिमित्त अनेक शतकांपूर्वी हिंदू राजा वाडियार यांनी हा महोत्सव सुरू केला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हा उत्सव राज्य सरकारने करावा असे ठरवले गेले. पण, दसरा महोत्सवाचे अंतरंग हिंदूच राहिलेे. मात्र, आज काँग्रेस सरकारने हिंदू महोत्सवाला निधर्मीपणाचा बुरखा घालण्याचा प्रयत्न केला. यावर तिथले हिंदू निधर्मी-पुरोगामित्वाचे गोडवे गात राहणार आहेत का? तसेच, तिथल्या हिंदूंच्या धर्मश्रद्धा चिरडून टाकण्यात काँग्रेस सरकारला यश येईल का?
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0