गाली हुजूर की तो, लगती दुवाओं जैसी

    04-Sep-2025
Total Views |

सार्वजनिक टिप्पणीमध्ये आता तर्क आणि वस्तुस्थितीऐवजी वैयक्तिक शिवराळपणाच वाढत चालला आहे. भारतात नरेंद्र मोदी हे बहुसंख्य भारतीयांचे लाडके नेते असले, तरी त्यांच्या विरोधकांच्या दृष्टीने ते खलनायकच आहेत. त्यांच्या कारभारात भ्रष्टाचाराचा अंश नसल्याने त्यांनाच वैयक्तिक स्तरावर बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. अमेरिकेच्या एका जबाबदार प्रतिनिधीनेही केलेल्या वक्तव्याकडे या व्यापक कटाचा भाग म्हणूनच पाहिले पाहिजे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत, तशी तेथील राजकीय नेत्यांची सार्वजनिक टीका-टिप्पणी अधिक विखारी होत चाललेली दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच बिहारमध्ये बोलताना सांगितले की, काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनी त्यांच्या दिवंगत आईबद्दल देखील शिवराळ भाषा वापरली. हा फक्त आपल्या दिवंगत मातेचा अपमान आहे असे नव्हे, तर तो समस्त नारीशक्तीचा अपमान आहे, असे मानले पाहिजे. आपल्या आईवर झालेल्या या अश्लाघ्य टीकेमुळे मोदी व्यथित झालेले दिसत होते.

नरेंद्र मोदी यांना शिवराळ भाषा नवीन नाही. त्यांच्यावर आजवर असंख्य शेलया विशेषणांचा वर्षाव विरोधकांनी केला आहे. ‘मौत का सौदागर’पासून ‘चौकीदार चोर हैं’ आणि आता ‘व्होटचोर’ यांसारखे अनेक अपशब्द मोदी यांच्या वाट्याला आले. मोदींनीही काही वेळा या अपशब्दांकडे "आपण टॉनिक म्हणून पाहतो,” असे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले होते. अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या वादग्रस्त खासदार महुआ मोईत्रा यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलही असेच भीषण आणि संतापजनक वक्तव्य केले होते. त्याबद्दल त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जणू कोण अधिक घृणास्पद वक्तव्ये करतो, याबद्दल काँग्रेस-तृणमूल काँग्रेस नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असावी, असे दिसते.

भारतातील राजकारण दिवसेंदिवस नीचतम पातळी गाठत चालले आहे. राहुल गांधींनी आजवर क्वचितच मोदी यांचा उल्लेख आदरार्थी केला आहे. ते आपल्या वक्तव्यात मोदींचा उल्लेख नेहमीच एकारार्थी करतात. मोदींनी या सभेत त्या गोष्टीचाही उल्लेख केला. राहुल गांधी यांना वैयक्तिकदृष्ट्या मोदी यांच्याबद्दल आदर वाटत नसला तरी चालेल; पण मोदी ज्या पदावर आहेत, त्याचा आणि त्यांच्या वयाचा मान राखणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण, राहुल गांधी यांच्यावरील संस्कार पाहता त्यांच्याकडून इतपत सभ्यतेची अपेक्षा करणेही वेडेपणाचे ठरेल. राष्ट्रपतिपदावर निवडून आल्यावर एका काँग्रेस नेत्याने द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला होता. या पदावर महिला निवडून आल्यामुळे आपल्या तोंडून चुकून असा उल्लेख झाल्याची सारवासारव त्याने केली. पण, त्यात अर्थ नव्हता. कारण, यापूर्वी काँग्रेसच्याच प्रतिभा पाटील या राष्ट्रपती होत्या. तेव्हा या नेत्याने कधी चुकूनही त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला नव्हता. यावरून काँग्रेसची एकंदर राजकीय संस्कृती किती घसरली आहे, ते दिसून येते. सोनिया गांधी यांनीही मुर्मू यांना एकदा ‘पूअर थिंग’ म्हटले होते.

याउलट पाकिस्तानने जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख ‘देहाती औरत’ असा केला होता, तेव्हा सर्वप्रथम त्यावर जोरदार हल्ला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीच केला होता. "आमचे कितीही मतभेद असले, तरी परदेशी व्यक्तीची आमच्या पंतप्रधानांबाबत अशोभनीय वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,” असे मोदी यांनी सुनावले होते. ज्याचे त्याचे विचार आणि संस्कार, दुसरे काय!

ज्या जगदीप धनखड यांच्याबद्दल विरोधी पक्षांना आता प्रेमाचे उमाळे येत आहेत, त्यांची संसद परिसरात नक्कल करून थट्टा उडविण्यात हेच विरोधी नेते आघाडीवर होते. तृणमूल काँग्रेसचे एक अतिशहाणे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांच्या हातवार्‍यांची नक्कल केली होती आणि त्याचे राहुल गांधी यांनी तत्परतेने आपल्या मोबाईल फोनमध्ये त्याचे चित्रणही केले होते. तेव्हा धनखड हे उपराष्ट्रपतिपदावर होते. धनखड सोडा, पण इतया उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या शारीरिक लकबींची नक्कल करून कल्याण बॅनर्जी यांनी आपण किती निर्लज्ज आहोत, तेच दाखवून दिले.

भारतातील राजकारण यापेक्षाही नीच स्तरावर जाण्याची शयता आहे. याचे कारण आता राजकारणात मुद्दे आणि धोरण यांना महत्त्व उरलेले नाही. विरोधकांना केवळ सत्ता हवी आहे. मोदींसारख्या नेत्यामुळे सरकार किंवा स्वतः मोदी यांच्यावर टीका करण्यासारखे मुद्देच विरोधकांकडे नाहीत. परिणामी, त्यांच्याकडून मोदी यांच्यावर अमर्याद वैयक्तिक हल्ले केले जात आहेत. दिवसागणिक त्यात वाढच होण्याची शयता आहे.

भारतातील राजकीय नेते सोडाच, आता अमेरिकेतील राजकीय नेते आणि मंत्र्यांनीही मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका सुरू केली आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी पीटर नावरो यांनी नुकतेच म्हटले होते की, "रशियन तेलाच्या खरेदीमुळे भारतातील ब्राह्मणवर्गाचा फायदा होत आहे!” त्यांच्या या वक्तव्यावर सुरुवातीला आश्चर्य व्यक्त झाले, तरी हळूहळू त्यामागील सखोल कट उघड झाला. भारतातील हिंदूंमध्ये जातीच्या मुद्द्यावरून फूट पाडण्याचा भारतातील विरोधकांचा डाव आहे, ही गोष्ट एव्हाना भारतात प्रस्थापित झाली आहे. पण, त्यात आता अमेरिकेचे नेतेही सक्रिय सहभागी होत आहेत, ही धक्कादायक गोष्ट. म्हणूनच नावरो यांचे वक्तव्य हलयात घेण्याची गरज नाही. त्यांच्या वक्तव्यातील तर्क सोडून देऊया. पण, त्यामागील भावना आणि सुप्त षड्यंत्र लक्षात येते. नावरो हे ट्रम्प यांचे विश्वासू असून ते सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे सरकारच्या धोरणाचे सूचक मानले पाहिजे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘लावारिस’ चित्रपटातील एका गाण्यातील ओळ आहे, ‘गाली हुजूर की तो, लगती दुवाओं जैसी, हम दुवा भी दे तो लगे हैं गाली|’ या देशावर राज्य करण्याचा आपल्याला दैवदत्त अधिकार असल्याच्या भ्रामक समजुतीत असलेल्या गांधी घराण्यातील लोकांची अशी भावना असणे शय आहे. पण, या नामदारांना आता आजच्या काळात आणून त्यांना बदललेल्या वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची गरज आहे.

राहुल बोरगांवकर