पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकांमध्ये अभाविपचा ऐतिहासिक विजय

04 Sep 2025 16:26:56

मुंबई : पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघ निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) ४८ वर्षांनी आपला झेंडा फडकवला. गेल्या पाच दशकांत पहिल्यांदाच अभाविपने पंजाब विद्यापीठ कॅम्पस स्टुडंट कौन्सिल निवडणूक २०२५ मध्ये अध्यक्षपदावर गौरव वीर सोहल यांनी ३१४७ मते मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गेल्या वर्षी एनएसयूआयने निवडणूक जिंकली होती. 
 
गौरव वीर सोहल यावेळी म्हणाले की, हा फक्त माझा नाही तर सकारात्मक राजकारणावर विश्वास दाखवणाऱ्या पंजाब विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याचा विजय आहे. मी इनसो आणि एचएसआरए या सर्व सहयोगी विद्यार्थी संघटनांचेही मनःपूर्वक आभार मानतो ज्यांनी अभाविपसोबत  खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत विद्यार्थीहिताची मशाल प्रज्वलित ठेवली.
 
उपाध्यक्ष पदासाठी ‘साथ यूनियन’चे अश्मित सिंह यांनी ३२४९ मते मिळवून विजय मिळवला. सचिवपदासाठी अभिषेक डागर यांनी ३२६२ मते मिळवून यश मिळवले. तर संयुक्त सचिवपदासाठी मोहित मंडेरा यांनी ३१२८ मते मिळवून विजय मिळवला. मोहित मंडेरा यांनी एनएसयूआयसोबत युती केली होती. अध्यक्षपदावर मोठा विजय मिळाल्यानंतर अभाविपने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून गौरव वीर सोहल यांचे अभिनंदन केले आहे.

अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सोलंकी म्हणाले की, आज पंजाब विद्यापीठाने इतिहास रचला आहे. हा क्षण विद्यार्थ्यांच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक आहे, ज्यातून ते एकता, जबाबदारी आणि प्रगतीच्या भावनेने आपले भविष्य घडवू इच्छितात. हा फक्त एका निवडणुकीचा निकाल नाही, तर विचारांचा विजय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब विद्यापीठात जे प्रांतीयवाद आणि फूट पाडणारे विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्याला विद्यार्थ्यांनी नकार दिला. गौरव वीर यांचा विजय हा पुरावा आहे की हा फक्त एका व्यक्तीचा नाही, तर पंजाब विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याचा सामूहिक विजय आहे.


Powered By Sangraha 9.0