
फणसाड वन्यजीव अभयारण्यात संकटग्रस्त गिधाडांच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणार्या मिनार मिलेश साळवी याच्याविषयी...
मिनारचा जन्म दि. १२ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात झाला. मात्र, तो लहानचा मोठा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुयात झाला. काही मुलांचे निसर्गाशी होणार्या ओळखीचे रूपांतर गट्टीमध्ये होते; तर काही मुलं त्यापासून दुरावलीदेखील जातात. मिनारला निसर्गासोबत गट्टी होण्यासाठी बराच कालावधी लागला. मात्र, त्यादरम्यान निसर्गात फिरणे, फुलपाखरांच्या मागे पळणे अशी निसर्गाची होणारी लहान मुलांची सर्वसामान्य ओळख मिनारच्या बाबतीतही होत होती. त्याचे शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण रोह्यामध्येच झाले. रोह्यातील डी. जी. तटकरे महाविद्यालयामधून त्याने विज्ञान विषयामधून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्याला ‘रसायनशास्त्र’ या विषयात रस नव्हता. त्यामुळे महाविद्यालयाची शोधाशोध सुरू झाली. ही शोधाशोध त्याला ठाण्यात घेऊन आली.
ठाण्यातील बी. एन. बांदोडकर महाविद्यालयात मिनारने विज्ञान शाखेतील पदवीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. विषय होता जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र. महाविद्यालयातील पहिले वर्ष सुरू झाल्यावर काही काळ तो मुंबईत राहिला. मात्र, सहा महिने राहिल्यानंतर त्याला मुंबई काही मानवली नाही. मात्र, महाविद्यालय सोडायचे नव्हते. त्यामुळे सुरू झाला दररोज रोहा ते ठाणे असा तीन तासांचा रस्ते प्रवास! मिनार दररोज महाविद्यालयात येण्यासाठी रोहा ते ठाणे असा प्रवास करू लागला. या दरम्यानच्या काळात त्याची अजून काही निसर्गाची गट्टी झालेली नव्हती. दुसर्या वर्षात असताना महाविद्यालयातील फुलपाखरू उद्यान हे त्याच्या आणि निसर्गाच्या गट्टीचे कारण बनले. एकेदिवशी फुलपाखरू उद्यानात फिरत असताना मिनारला काही कीटक घोळका करून एकत्रित जाताना दिसले. त्याच्या मनात कीटकांच्या त्या घोळयाची हालचाल पाहून कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे खिशातला मोबाईल आपसूक बाहेर आला. तो क्षण त्याने टिपला. आता हुरहूर लागली ती म्हणजे, त्या कीटकांविषयी आणि त्यांच्या त्या वर्तनाविषयी जाणून घेण्याची. लागलीच त्याने शिक्षक कक्ष गाठला. प्राध्यापिका कुर्वे यांना हेरून तो व्हिडिओ दाखवला. त्यावर कुर्वे यांनीदेखील मिनारच्या सर्व प्रश्नाचे निरसन केले आणि त्याची निसर्गासोबत गट्टी करून दिली.
या प्रसंगानंतर मिनार आवडीने फुलपाखरू उद्यान फिरू लागला. तेथील फुलपाखरांचे आणि इतर कीटकांचे बारकाईने निरीक्षण करू लागला. पक्षिनिरीक्षणालाही सुरुवात झाली. मित्रवर्य सागर महाजनसोबत जंगलात रात्री भटकून सरीसृपांना पाहण्यास सुरुवात झाली. पदवीनंतर बी. एन. बांदोडकर महाविद्यालयामधूनच त्याने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण ‘एन्व्हार्यन्मेंटल सायन्स’ या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर आता कामाला सुरुवात झाली. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ला पुण्यात फुलपाखरू उद्यान तयार करण्यासाठी होतकरू मुलाची गरज होती. मिनारने या कामासाठी अर्ज दिला. त्यामध्ये त्याची निवड झाली आणि त्यानंतर सहा महिन्यांसाठी तो पुण्यात स्थायिक झाला. त्याठिकाणी त्याने एका खासगी उद्योग कंपनीमध्ये फुलपाखरू उद्यान तयार केले. त्यादरम्यान ‘कोरोना’ची लाट आली आणि आरोग्याच्या समस्येमुळे मिनारने पुन्हा रोहा गाठले.
‘कोरोना’च्या कालावधीनंतर मिनारने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. मात्र, यावेळी त्याच्या कामाची दिशा बदलली होती. दोन वर्षे त्याने ऐरोलीत आरोग्याशी निगडित एका खासगी कंपनीत काम केले. दोन वर्षांनंतर निसर्गाने पुन्हा एकदा मिनारला साद घातली. ‘ग्रीन वर्क ट्रस्ट’ (जीडब्ल्यूटी) या संस्थेला रायगड तालुयातील फणसाड वन्यजीव अभयारण्यात एका उमद्या स्थानिक तरुणाची गरज होती. मिनारने संधी हेरून लागलीच अर्ज केला. स्थानिक असल्याने ‘जीडब्ल्यूटी’नेदेखील त्याला फणसाडमधील एका विशेष प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी दिली. हा प्रकल्प आहे गिधाड पुनरुज्जीवनाच्या.
‘जीडब्ल्यूटी’च्या ‘जटायू’ या प्रकल्पामध्ये मिनार सध्या प्रोजेट मॅनेजर म्हणून काम करत आहे. २०१५ साली फणसाड अभयारण्यामधून गिधाडे दिसेनाशी झाली. सद्यःस्थितीत अभयारण्यापासून ५० किमी दूरपर्यंत गिधाडांचे अस्तित्व आहे. त्यामुळे या गिधाडांना पुन्हा एकदा फणसाड अभयारण्यात पुनःस्थापित करण्यासाठी ‘जीडब्ल्यूटी’ गिधाडांचे आहार केंद्र उभारून विशेष प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये मिनार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या प्रकल्पामधील आहार केंद्रात मृत जनावरांची कलेवरे आणण्यासाठी मिनार प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षभरात त्याने रायगडमधील १५ तालुयांमधील ५१४ ग्रामपंचायतींना भेट दिल्या असून गिधाडांसाठी मृत जनावरांची कलेवरे मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. सद्यःपरिस्थिती मिनारसमोर रस्त्यावर मृतावस्थेत सापडणार्या बेवारस गायींची समस्या आहे. या बेवारस गायींच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडत असल्याने, ती गिधाडांना खाण्यासाठी टाकता येत नाही. त्यामुळे प्लास्टिकविरहित गुरांची कलेवरे मिळवण्याचे आवाहन मिनारसमोर आहे. सद्यःपरिस्थितीत मिनार पूर्णपणे फणसाडमध्ये गिधाडांच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रयत्नशील असून त्यासाठी मेहनत घेत आहे. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!