‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’चे आक्रमण

04 Sep 2025 15:49:26

जग हे एकप्रकारे जागतिक खेडेच असून, प्रत्येक देश ही एक स्वतंत्र बाजारपेठ. त्यामुळेच एखाद्या देशात युद्धप्रसंग उद्भवला की लगोलग जागतिक पुरवठा साखळ्यांवर त्याचा ताण दिसून येतो. अशाप्रकारे जागतिक बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक म्हणजेच ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस.’ म्हणूनच त्याचे आकलन सद्यस्थितीत गरजेचे...

आपल्याला किमान स्थानिक राजकारणाचे, चालू घडामोडींचे आकलन होणे का महत्त्वाचे आहे? कारण, त्यावर आपल्या दैनंदिन अत्यावश्यक गरजांची पूर्तता त्यावर अवलंबून असते. राजकारणाचा आमच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही, असे म्हणणार्‍यांच्याही आयुष्यावर राजकारणाचा किंवा सत्ताकारणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम हा दिसून येतोच. ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’ ही संज्ञा याचप्रमाणे काम करणारी आहे. जागतिक बाजारपेठेतील सत्ताधीश जे ठरवतील, तशा सवयी विकसित, विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना आपसूक लागू पडतात. त्यासाठी काही अपवाद वगळता कुठल्याही सीमांचे तसे बंधन राहत नाही. आपल्या घरात सकाळी येणारे दूध, वृत्तपत्र, भाजीपाला, अन्य अत्यावश्यक वस्तू, त्यानंतर येणार्‍या चैनीच्या वस्तूंच्या किमती ज्याप्रकारे सरकार आणि प्रशासन यांच्या हस्तक्षेपाविना ठरत नाहीत, त्याचप्रकारे ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’च्या हस्तक्षेपाविना दररोज लागणार्‍या शेकडो वस्तूंच्या किमतीही निर्धारित करता येत नाहीत.

उपलब्ध संदर्भांनुसार, याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येईल की, ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’ म्हणजे, असे बदल जे जागतिक बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करतात, ज्यामुळे वस्तू, उत्पादने, सेवा आणि भांडवल यांचा आकार बदलत जातो. या शक्ती एकमेकांशी संलग्न असल्या कारणास्तव त्याचे परिणाम जगभर उमटतात. याच शक्तींद्वारे जगातील महागाई, चलनमूल्य, उत्पन्न मर्यादा, व्याजदर आणि अर्थव्यवस्थेतील वाढ या गोष्टी ठरतात. ही झाली आर्थिक शक्तींची ताकद. मग पुढे येते ती तंत्रज्ञान शक्ती. या शक्तीच्या जोरावर तंत्रज्ञान क्षेत्रात नवे बदल होतात. जागतिक स्तरावर मक्तेदारीचे आयाम बदलत जातात. नव्या उद्योगसंस्था उभ्या राहतात. ‘एआय’, इंटरनेट ब्राऊझर्स, सोशल मीडिया कंपन्या, मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आदी यंत्रणांचे पाईक आपण कधी होऊन जातो, हे आपले आपल्यालाच कळत नाही. सध्या रिल्स पाहण्यात तरुणाई इतकी गुंग आहे की, एका सर्वेक्षणानुसार, सरासरी प्रत्येक व्यक्ती दिवसाला ३२ मिनिटे यावर घालवते. ३० सेकंदाचे व्हिडिओ पाहण्याची ही सवय कशामुळे लागली? तर कंपन्यांनी त्याप्रकारे तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळेच! मेसेंजर अ‍ॅप्ससारखी माध्यमे आपल्या जीवनाचा भाग कधी बनली, ते आपल्याला कळलेही नाही. याउलट चीनची स्थिती. तिथल्या सरकारांनी आधी या सर्व बाहेरील सोशल मीडिया कंपन्यांवर बंदी आणली. स्वतःची हक्काचे सोशल मीडिया अ‍ॅप्स आणि सर्च इंजिन्स विकसित केली. ‘एआय’ने जगात धुमाकूळ घातला, तेव्हा स्वतःच्या ‘डीपसीक’ कंपनीला बळ देऊन जगाचे लक्षही चीनने वेधून घेतले. चीनने ज्याप्रकारे स्वतःच्या गोष्टींचा आग्रह सोडला नाही. तो अगदी भाषेचा का असेना? तशी वृत्ती आपल्यात रुजलेली नाही.

तेल आयातीचा विषय ज्याप्रकारे गाजला, त्याचे उदाहरणही घेता येईल. रशियाकडून भारताने तेल घ्यावे की नाही, हा सर्वस्वी भारत-रशिया संबंधांवर अवलंबून असलेला विषय. मात्र, त्याबद्दल स्वारस्य अमेरिका आणि युरोपियन संघालाच अधिक. पुढचा पैलू म्हणजे राजकीय आणि ‘लीगल फोर्सेस.’ याचे ताजे उदाहरण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी लादलेल्या आयातशुल्काच्या रूपात अवघे जग पाहते आहे. पुढे येतो तो ‘कॉम्पिटीटीव्ह’ आणि ‘सोशल फोर्सेस’ ज्यात ग्राहकांची वर्तणूक, सवयी या प्रामुख्याने बदलण्यासाठी भाग पाडणे, असे प्रकार होतात. ‘कोविड’ काळातील लसींचा तुटवटा हे एक प्रमुख उदाहरण. ज्यावेळी अमेरिकन सरकारने लसींसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा रोखण्याची आडमुठी भूमिका घेतली होती, तेव्हा भारतातील ‘कोविड’ मृत्यूदर वाढत चालला होता. ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’ ही संकल्पना याचप्रकारे काम करते.

आणखीन एक अशीच साधी गोष्ट. पूर्वी आयुर्वेदिक दंतमंजन घरोघरी वापरले जात होते. कुठली तरी एखादी कंपनी बाजारात त्याला पर्याय उभा करते. त्याच ब्रॅण्डला जोडून टुथपेस्ट बाजारात आणते आणि वर्षानुवर्षे असलेली दंतमंजनची सवय मोडीत निघते. यात अनेक स्वदेशी कंपन्यांनाही मग ‘पेस्ट’ हा उत्पादन म्हणून पर्याय निवडावा लागला. आजीबाईच्या बटव्यातील अनेक औषधी वनस्पती, ज्या अबालवृद्धांना कामी येत असत. मात्र, आता घरात मूल जन्मल्यापासूनच अनेक औषध कंपन्यांच्या उत्पादनांचा सपाटा सुरू होतो, हे स्थित्यंतर आपल्या लक्षातही येत नाही. याच कंपन्यांनी आता विपणनासाठी पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदिक औषधांचा वापर त्यांच्या उत्पादनात असल्याचा दावा केला आणि आपण पुन्हा त्याला बळी पडू लागलो. म्हणून सुरुवातीपासून उल्लेख केल्यानुसार, तुमच्या घरातील वस्तूंपासून तुमच्या ताटात नेमके काय वाढले जाते, याचा निर्णय तुम्हाला घेण्याचा अधिकार उरलेलाच नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आणखी एक उदाहरण द्यायचे झाले ते म्हणजे नुडल्स. दोन मिनिटांत तयार होणार्‍या नुडल्सची रेसिपी दहा सेकंदाच्या जाहिरातीत गुंडाळून दिली आणि त्यानंतर प्रत्येक घराघरात त्याचे करोडो ग्राहक तयार झाले. भारतात चॉकलेट्सची परंपरा कधीच नाही. इथल्या छप्पन भोगांमध्ये विविध राज्यांतील पारंपरिक मिठाई किंवा गोडाधोडाची पद्धत पूर्वापार होती. त्यानंतर चॉकलेट कंपन्यांनी भारतात बस्तान बसवले. जाहिरातींचा मारा सुरू झाला. त्यामुळे भारतीय हलवायांचे नुकसान होऊ लागले. अर्थात, या पाश्चात्य कंपन्यांनी भारतात व्यापार इथल्या नावानेच केला, तरीही त्याचा नफा त्यांच्या पालकत्व स्वीकारणार्‍या कंपन्यांनाच जाणार. शीतपेयांच्याही बाबतीतही तसाच प्रकार. ही वरवर पाहता दिसणारी उदाहरणे आहेत. पण, खोलात जाऊन विचार केला, तर अशा कित्येक गोष्टींना आपण सहज स्वीकारल्याचे दिसून येते. कोल्हापुरी चपलांचा ब्रॅण्ड जेव्हा पाश्चात्य कंपनीने चोरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर्वांनी आवाज उठवला. मात्र, अशा कित्येक ब्रॅण्ड्सची घुसखोरी सरळसरळ आपल्या आयुष्यात झाली आणि आपण त्याला पर्याय निर्माण करू शकलेलो नाही. कितीही उदारमतवादी म्हटले, तरीही इतर देश आपल्या उत्पादनाच्या खपासाठी बाजारपेठांच्या शोधात असतात. भारत ही सर्वांत मोठी लोकसंख्या असलेली चीननंतरची दुसरी बाजारपेठ. चीनने हा धोका वेळीच ओळखला. त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांना स्वदेशी पर्याय शोधला. याचे टोकाचे उदाहरण जर्मनीचेही. मॅस एमिल फ्रिडरिच वॉन स्टेफानिट्झ यांनी चक्क सैन्यात लागणार्‍या कुत्र्यांच्या प्रजातीची निर्मिती केली. आज जगात प्रसिद्ध असलेल्या ‘जर्मन शेफर्ड’ या प्रजातीचे निर्माते आणि सुधारक म्हणून त्यांची गणना केली जाते. सैन्यातील श्वानही आपल्याच देशातील हवेत, असा त्यांचा अट्टहास. इतका सूक्ष्म विचार या देशांनी केला. हजारो प्राचीन वर्षांचा इतिहास असलेले आपण असा दृष्टिकोन आत्मसात करणार आहोत का? तरच ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’च्या आक्रमणापुढे टिकाव धरणे शय होईल.
Powered By Sangraha 9.0