डोंबिवली : अभिनव बँकेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. बँकेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत असताना २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेचा एन पी ए शून्य टक्क्यांवर आला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या औचित्याने अभिनव बँकेची १८ वी शाखा दिवा शहरात सुरू झाली आहे. आमच्या या शाखेतून दिवावासियांना आम्ही सर्वोत्तम सेवा पुरवू असे ठोस आश्वासन बँकेचे अध्यक्ष रमेश रतन पाटील यांनी केले.
रविवार दिनांक २८ रोजी दिवा पुर्व येथील चंद्रगण रेसिडेन्सी, ए विंग पहिला मजला स्टेशन रोड येथे अभिनव बँकेच्या नूतन शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुभाष पाटील हे उपस्थित होते. अध्यक्ष पाटील यांनी यावेळी बँकेच्या यशस्वी वाटचालीची माहिती देताना सांगितले की रिझर्व्ह बँकेने आम्हाला आर्थिक दृष्ट्या सुदृढ आणि उत्तम व्यवस्थापन असणारी बँक असे प्रमाणपत्र दिले याचा अभिमान वाटतो. बँक आपल्या सभासदांना आणि ग्राहकांना संगणकीय तंत्रज्ञानाने परिपूर्ण अश्या बँकिंग सुविधा अल्प खर्चात देते. दिव्यातील नागरिकांना देखील या सर्व सुविधा उत्तमपणे मिळतील. बँकेचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या उद्घाटन सोहळ्यास हजार होते.