हवाई क्षेत्रातील चांगली नोकरी असताना आपल्या सहकार्यांना आहाराबाबत जागरूकता नसल्याचे दिसले. असे अजून किती लोक असतील, जे आहाराबाबत जागरूक नाहीत. असा विचार करत करिअरचा नवा मार्ग सापडला आणि त्यातून दर्शना कुर्लेकर यांनी आहार प्रबोधन सुरू केले. कधी कडक आहारतज्ज्ञ, तर कधी समुपदेशक बनत, त्या महिलांना सशक्त करण्यासाठी धडपडत असतात.
तंदुरुस्त असा शब्द ऐकला की, पिळदार शरीरयष्टी किंवा निरोगी व्यक्ती अशी छबी डोळ्यासमोर उभी राहते. परंतु, तंदुरुस्त राहण्यासाठी आहार आणि विचार महत्त्वाचे असतात. आहार म्हटलं की, अनेक समज-गैरसमज असतात. प्रत्येकाच्या शारीरिक प्रवृत्ती आणि दिवसाचे नियोजन याला अनुसरून प्रत्येकाचा आहार वेगवेगळा असतो. यावर अनेक वर्षे सातत्याने संशोधन करून आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेऊन दर्शना कुर्लेकर आहारतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना वाट दाखवण्याचे काम त्या करतात, तर गरजू तरुण खेळाडूंना आहाराबाबतच नव्हे, तर खेळासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
हवाई क्षेत्राची आवड असणाऱ्या दर्शना यांनी हवाई सेवेचे शिक्षण पूर्ण केले. नोकरी करत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकार्यांना आहाराबाबत योग्य जागृती नसल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी विविध संस्थांमधून आहाराचे धडे गिरवायला सुरुवात केली. आपल्या सहकार्यांना योग्य आहाराचे महत्त्व पटवून देताना करिअरचा नवा मार्ग सापडला. आपल्या सहकार्यांना आपण सांगितलेल्या आहाराचा आणि नियोजनाचा फायदा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्रीडा आहार, शारीरिक आहार तसेच, आहाराचे विविध अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आहारक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. विविध आस्थापनांमध्ये जाऊन आहाराबाबत जागृती निर्माण केली. विशेषतः महिलांना आहाराबाबत जागरूक असायलाच पाहिजे, त्यासाठी त्या आग्रही असतात. घरातील महिलेचा आहार योग्य असेल, तर संपूर्ण घराचा आहार योग्य राहील. हे त्या महिलांना पटवून देतात. लहान मुलांच्या आहारासाठी विशेष प्रयत्न करतात.
सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे आकर्षण आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. आताची पिढी मोबाईलसारख्या गोष्टींच्या आहारी जात असल्याचे बघून त्या अस्वस्थ होतात. शाळांमधून त्या मोबाईलच्या दुष्परिणाम आणि आरोग्यावर होणारा घातक परिणाम याबद्दल मुलांमध्ये जागृती निर्माण करत आहेत. मुलांचे दोन्ही पालक काम करत असल्याने मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. यामुळे दर्शना यांनी कमी वेळेत होणार्या विविध प्रकारच्या पौष्टिक रेसिपी तयार केल्या आहेत. महिलांना त्या रेसिपी देतात. महिलांसाठी विविध प्रकारचे सॅलेड बनवणे, त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे. घरच्याघरी कमी वेळेत होणारे आणि सहज बनवता येणारे अन्नपदार्थ त्या शिकवतात. आहाराबाबत जागृती करण्याची खरी गरज वस्ती भागात आहे. त्यामुळे दर्शन वस्ती भागात जाऊन महिलांना आहाराबाबत मार्गदर्शन करतात. महिलांनी आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा, सात्विक आहार कसा असावा, याचे मार्गदर्शन करतात. लहान मुल दिसल्यास घरी जाऊन पालकांना सात्विक आहाराचे महत्त्व पटवून देतात. अन्न हे शरीराचे खरे इंधन आहे. त्यामुळे चांगले इंधन मिळाले, तर शरीर अनेक वर्षे चांगले काम करू शकेल. तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. त्या अशा वाट चुकलेल्यांना वाट दाखवतात. व्यसनांचे दुष्परिणाम आणि शरीरावर होणारे अपाय याबाबत समुपदेशन करतात. आजारांनी ग्रस्त रुग्णांना आधार देणे त्यांना आवडते. अनुशासन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्या महिलांच्या आहाराबाबत लक्ष देतात. पुण्यातील विविध रुग्णालयात जाऊन त्या रुग्णांना आहाराबाबत मार्गदर्शन करतात. अशा योग्य आहाराचे दर्शन घडवणार्या दर्शना कुर्लेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
शशांक तांबे