मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरासत से विकास तकचा संदेश देत भारताच्या समृद्ध वाटचालीचा विचार मांडला आहे. ही विरासत नेमकी कशी आहे याची प्रचिती आपल्याला, इतिहासाचे जुने दस्तावेज चाळताना येते. मात्र या ज्ञानाचा प्रसार वयाचा असेल तर लोक सहभाग आवश्यक आहे" असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. पुराभिलेख संचालनालयातील कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " इतिहासाच्या अमूल्य कागदपत्रांचा हा ठेवा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत ही सुद्धा एका प्रकारची सेवाच आहे. इतिहासातील अनेक अज्ञात घटनांची माहिती आपल्याला यामुळे होते. महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याच्या अज्ञात पैलूंवर या प्रदर्शनाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे की आपण या प्रदर्शनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी."
दि. ३० सप्टेंबर रोजी, मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात सांस्कृतिक कार्य विभाग पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित पुराभिलेखन संचालनालयातील कागदपत्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा सदस्य मिहिर कोटेचा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक श्री.सुजित कुमार उगले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विधानसभा सदस्य मिहिर कोटेचा म्हणाले की " भारताच्या स्वातंत्र्य युद्धाचीजी संघर्ष कहाणी आहे ती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. इतिहासातील या कागदपत्राच्या माध्यमातून एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा युवा पिढीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे याबद्दल मी पुराभिलेख संचालनालयाचे अभिनंदन करतो." पुराधलेच संचालनालयाचे संचालक श्री सुजितकुमार उगले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " १८२१ साली पुराभिलेख संचालनालयाची स्थापना झाली होती. इतिहासाशी निगडित अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध आहेत. कागदपत्रांमध्ये घडलेला इतिहास जाणून घेण्यासाठी केवळ भारतभरातलेच नाही तर परदेशी अभ्यासू सुद्धा आपल्याकडे येतात. इतिहासाचा हा खजिना लोकांना उपलब्ध करून द्यावा या सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या इच्छेला मान देत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आपल्या सर्वांना आमचे विनंती आहे की आपण यातील छायाचित्र काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून आपल्याला आपला समृद्ध इतिहास लक्षात येईल. येणाऱ्या काळात पुराभिलेख संचालनालयाकडून अशाच वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आणल्या जातील.
१ ऑक्टोबर रोजी रात्री १० पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री वेगवेगळ्या भावमुद्रा टिपणारे अनेक फोटो यावेळी इतिहास अभ्यासकांना बघायला मिळतील त्याचबरोबर, महात्मा गांधींनी वेळोवेळी इंग्रज अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार, हरिजन या त्यांच्या मुखपत्रातून त्यांनी लोकांशी साधलेला संवाद अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा आहे. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री यांची प्रसारमाध्यमांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या कार्यक्रमाचे वृत्त यावेळी अभ्यासकांना बघायला मिळणार आहे.
भारतातील सर्वात मोठे महापुराभिलेख भवन मुंबईत उभं राहतंय
ऐतिहासिक साधनांच्या संवर्धनावर भाष्य करताना राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की " आपला ऐतिहासीक ठेवा जतन करणे, त्याची माहिती पुढची पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कतर्व्य आहे. याचसाठी राज्य सरकारने महा पुराभिलेख भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे भारतातील सर्वात मोठे महापुराभिलेख भवन असेल. या अद्यावत भवनामध्ये आपण तिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष, स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयी उपलब्ध करुन देण्यात येतील. येत्या ६ ते ७ महिन्यांमध्ये हे भवन लोकांसाठी सज्ज असेल" अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.