नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे होणार आहे. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते संघाच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे दर्शन घडवणारे विशेष स्मारक टपाल तिकीट व नाणे प्रकाशीत करण्यात येणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.
सन १९२५ मध्ये नागपूर येथे डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवकाधारित संघटन म्हणून सांस्कृतिक जागृती, शिस्त, सेवा व सामाजिक जबाबदारी जोपासण्याचे कार्य सुरू केले. शताब्दीपूर्तीनिमित्त संघाच्या राष्ट्रघडणीतील ऐतिहासिक प्रवासाबरोबरच देशाच्या सांस्कृतिक ऐक्याच्या संदेशालाही अधोरेखित केले जाणार आहे.
देशाच्या परकीय सत्तेच्या पार्श्वभूमीवर उभारलेला हा स्वयंप्रेरित चळवळ म्हणून संघ ओळखला जातो. मातृभूमीवरील निष्ठा, राष्ट्रभक्ती, शिस्त, संयम, पराक्रम आणि धैर्य यांचे संस्कार घडवणे, तसेच भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणे हे संघाचे ध्येय आहे.
गेल्या शंभर वर्षांत संघाने शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पूर, भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्वयंसेवकांनी मदत व पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तर संघाशी संलग्न विविध संघटनांनी युवक, महिला, शेतकरी यांना सक्षम बनवून समाजातील सहभाग व स्थानिक समुदायांची ताकद वाढवण्यावर भर दिला आहे.