नवी दिल्ली : “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांच्या त्रिसेवा समन्वयामुळे वास्तविक वेळेत एकत्रित कार्यक्षमतेचे दर्शन घडले. यामुळे कमांडरांना योग्य वेळी निर्णय घेणे शक्य झाले, परिस्थितीविषयी जागरूकता वाढली आणि आपापसात अपघाती हानी होण्याचा धोका कमी झाला. संयुक्ततेतून मिळालेले हे निर्णायक यश भविष्यातील सर्व कारवायांसाठी आदर्श ठरले पाहिजे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले.
भारतीय वायुसेनेतर्फे आयोजित फॉस्टरिंग ग्रेटर जॉइंटनेस – सिनर्जी थ्रू शेयर्ड लर्निंग इन द डोमेन ऑफ इन्स्पेक्शन अँड ऑडिट्स, एव्हिएशन स्टँडर्ड्स अँड एअरोस्पेस सेफ्टी’ या सेमिनारमध्ये बोलत होते. या वेळी त्यांनी वायुसेनेची इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम (आयएसीसीएस), सेनेची आकाशतीर प्रणाली आणि नौदलाची त्रिगुण प्रणाली यांचा उल्लेख करत, या तिन्ही दलांच्या एकात्मिक प्रयत्नांनी संयुक्त कारवाईचे कणा निर्माण केल्याचे सांगितले.
त्यांनी अलीकडील कोलकाता येथे झालेल्या कंबाइंड कमांडर्स कॉन्फरन्सची आठवण करून दिली, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील संयुक्ततेचे महत्त्व अधोरेखित केले होते. “आमचे सरकार त्रिसेवा समन्वय वाढविण्यास कटिबद्ध आहे. हे केवळ धोरणात्मक उद्दिष्ट नाही, तर वेगाने बदलणाऱ्या सुरक्षा परिस्थितीत टिकून राहण्याचा एकमेव मार्ग आहे,” असे ते म्हणाले.
डिजिटल प्रगतीचा उल्लेख करताना राजनाथ सिंह यांनी सेनेची कम्प्युटराइज्ड इन्व्हेंटरी कंट्रोल ग्रुप, वायुसेनेची इंटिग्रेटेड मटेरियल्स मॅनेजमेंट ऑनलाईन सिस्टीम आणि नौदलाची इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट सिस्टीम यांचे कौतुक केले. त्यांनी जाहीर केले की या तिन्ही प्रणालींचा समन्वय साधण्यासाठी त्रिसेवा लॉजिस्टिक्स अप्लिकेशन विकसित केली जात आहे. संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की प्रत्येक दलाने भौगोलिक परिस्थितीनुसार स्वतःच्या कार्यपद्धती विकसित केल्या असल्या तरी त्या एकमेकांशी सामायिक केल्या गेल्या नाहीत. “आजच्या गुंतागुंतीच्या सुरक्षा वातावरणात ही विभागणी संपवून अनुभवांचे मुक्त आदानप्रदान आवश्यक आहे. कोणतीही सेवा स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाही; संयुक्ततेतच विजय आहे,” असे ते म्हणाले.