या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता |
नमस्तयै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
अर्थात, हे देवी, तू सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तिरुपाने वास करतेस. अशा या देवीला मी वंदन करते. या स्तोत्राप्रमाणे आजच्या स्त्रीशक्तीला नमन करताना निश्र्चितच त्यांच्यासमोरील आव्हानांकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही.
आज आपल्या देशात दिवसाढवळ्या अगदी चिमुकलीपासून अगदी वृद्ध महिलेपर्यंत नराधमांकडून अत्याचाराची नृशंस प्रकरणे समोर येत असतात. लैंगिक भेदभाव, हुंडाबळी, घरगुती हिंसा, बालविवाह, कामाच्या ठिकाणी असमानता, सामाजिक बंधने हे प्रकार आपण ऐकतो, बघतो. पण, बरेचदा या अन्यायाविरोधात लढण्याऐवजी, काही जणी निमूटपणे हे अत्याचार सहन करतात.
खरं तर हिंदू संस्कृतीत पूर्वीपासून स्त्रीला केवळ देवीसमान पूजलेलेच नाही, तर स्त्रियांना समाजात एक मानाचे स्थानही होते. एवढेच नाही तर कुळ, वारसा संपत्ती आईच्या नावाने चालायचीही पद्धत होती आणि काही समाजांमध्ये ती अजूनही कायम आहे. तसेच आपल्या देवतांच्या नावातही मातेला अग्रस्थान आहे. जसे की, गणपतीला 'पार्वतीपुत्र’, हनुमानाला 'अंजनीसुत', कृष्णाला 'देवकीनंदन', महाभारतात कुंतीच्या पुत्रांना 'कौन्तेय' इत्यादी. त्याचप्रमाणे देवदेवतांचा उल्लेख करताना सुद्धा त्यांच्या अर्धांगिनीचे नाव प्रथम घेतले जाते. जसे की, नवीन जोडप्याला आशीर्वाद देताना 'लक्ष्मीृ-नारायणाचा जोडा', रामाचा उल्लेख करताना 'सियाराम', महादेवाचा उल्लेख करताना सुद्धा 'नमो पार्वतीपतये हर हर महादेव' असा केला जातो. पण, जसजसा काळ बदलत गेला, तसतसे समाज पुरुषप्रधान झाला. समाजाने स्त्रीला दुय्यम दर्जा देण्यास सुरुवात केली आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेतच.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः या श्र्लोकाच्या अगदी विपरीत चित्र समाजातील काही घटकांमध्ये दिसून येते. या बुरसटलेल्या परंपरांनी रूढी-परंपरांच्या बेड्या स्त्रियांच्या हातात अडकवल्या. मैत्रेयी, गार्गी, लोपामुद्रा यांच्यासारख्या हिंदू संस्कृतीत ज्ञानार्जन करणाऱ्या स्त्रियांची परंपरा मोठी आहे. पण, तरीही महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. बालविवाह, सतीप्रथा यांसारख्या परंपरा बोकाळल्या. चूल आणि मूल एवढ्यापुरताच स्त्रियांनी मर्यादित राहावे, अशा मानसिकतेने समाजाला ग्रासले. पण, काही थोर समाजसुधारक होऊन गेले, ज्यांनी स्त्रियांना या जुनाट रुढी-परंपरेच्या बेड्यांतून मुक्त करुन मोकळा श्वास मिळवून दिला. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे लॉर्ड विल्यस बेंटिक यांनी १८२९ मध्ये कायदा आणून सतीप्रथेवर पूर्णपणे बंद केली. महात्मा ज्योतिबा फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांनी स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला आणि त्याचा श्रीगणेशा आपल्या घरातील स्त्रियांपासून केला. त्याचप्रमाणे विधवा विवाहालासुद्धा पाठिंबा दिला आणि १८५६ मध्ये विधवा पुनर्विवाह मान्यता मिळाली. या समाजसुधारकांच्या चळवळीमुळे परिस्थिती जरुर बदलली. कालांतराने स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्वही निर्माण केले. तरीसुद्धा आजही २१व्या शतकात स्त्रियांकडे पाहण्याचा पूर्णपणे बदललेला नाही, हे दुर्दैवाने मान्य करावेच लागेल.
थोडक्यात काय, काळ जसा बदलत गेला, उत्तरोत्तर प्रगतीही होत गेली, तसतशा स्त्री स्वातंत्र्याच्या भूमिका, संकल्पनासुद्धा बदलत गेल्या. परंतु, स्त्रियांची लढाई अजूनही संपलेली नाही. आजही समाजातील काही स्त्रिया माहेरी असताना वडील, भाऊ यांच्या विचारांखाली आणि सासरी गेल्यावर सासरवासीयांच्या आणि नवर्याच्या ओझ्याखाली, विचारांखाली दबलेल्या दिसतात. त्यांच्याकडे आर्थिक स्वातंत्र्यही नाही आणि वैचारिक स्वातंत्र्याची तर सोयच नाही. आजही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतील बुरसटलेल्या विचारांची मंडळी 'ती'चे मत ग्राह्य धरतच नाही.आज स्त्रिया नोकरी-व्यवसाय करतात. लाखो स्त्रियांनी समाजात आपले एक वेगळे अस्तित्वही निर्माण केले आहे. एकीकडे असे सकारात्मक चित्र समाजात असले, तरी काही समाजघटकांत महिलांना अजूनही व्यक्तिस्वातंत्र्य नाही. एकूणच या समाजाच्या परंपरा, त्यांचे नियम याचे अनुकरण करून स्त्रियांनी वागायचे ठरवले, तरी सुद्धा जेव्हा मुलीच्या जन्माचा प्रश्न येतो, तेव्हा समाजात अजूनही मुलगी नको, ही संकुचित वृत्तीही दिसून येते.
त्यामुळे सामाजिक परिवर्तन हे मानसिक परिवर्तनातून घडले पाहिजे. पण, बरेचदा होते नेमके उलटेच. स्त्रीभ्रूणहत्येला कारण ठरलेली हुंडापद्धत सरकारला कायदे करून बंद करावी लागली. याचा परिणाम झाला, पण म्हणावे तसे परिवर्तन मनापासून झालेच नाही, अन्यथा ऐन नवरात्रीत १५ दिवसांचे स्त्री अर्भक उघड्यावर सापडले नसते आणि पाचच महिन्यांपूर्वी हुंड्यापोटी पुण्याच्या वैष्णवी हगवणेला आत्महत्या करावी लागली नसती. कायदे करूनसुध्दा परिवर्तन होत नसेल, तर अशा समाजात स्त्रिया १०० टक्के सुरक्षित आहेत, असे आपण म्हणू शकतो का? बलात्काराच्या खटल्यांमध्ये नराधमांवर कारवाई होते, पण वर्षानुवर्षे खटल्याचा निकाल रखडतो. मग त्या महिलेला खरंच न्याय मिळाला, असे म्हणता येईल का?
या लेखातून सांगण्याचा मतितार्थ इतकाच की, केवळ नवरात्रीचे नऊ दिवस देवीची म्हणजेच स्त्रीशक्तीची पूजा-आराधना करण्यापेक्षा, अन्य दिवशीसुद्धा महिलांचा आदर करा. एक वस्तू म्हणून तिच्याकडे न पाहता, एक ’माणूस’ म्हणून बघा, तरच खर्या अर्थाने नवरात्री साजरी करण्यामागचा उद्देश सार्थकी लागेल आणि हा बदल जर समाजात होणार नसेल, तर प्रत्येक स्त्रीने वेळप्रसंगी दुर्गा, कालिमाता, चंडिका असे अवतार घेणे, ही सुद्धा काळाची गरज!
- वैष्णवी प्रभू