नवी दिल्ली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भविष्यातील जैव-धोके आणि अण्वस्त्रांमुळे निर्माण होणाऱ्या रेडिओ प्रदूषणाविरुद्ध सज्जतेची गरज अधोरेखित केली आहे. दिल्ली कँट येथील मानेकशॉ सेंटरमध्ये मंगळवारी आयोजित मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (एमएनएस)च्या शताब्दीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोविड-१९ महामारीनंतर जैव-धोक्यांची शक्यता वाढली असल्याचे नमूद करत जनरल चौहान म्हणाले, “भविष्यात मानवनिर्मित, अपघाती किंवा नैसर्गिक पद्धतीने होणारे जैव-धोके वाढतील. अशा परिस्थितीशी लढण्यासाठी व संक्रमितांना उपचार देण्यासाठी विशेष प्रोटोकॉल आवश्यक आहेत. आपण त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही” या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “आपल्या संदर्भात अण्वस्त्रवापराची शक्यता कमी असली तरी सुरक्षा धोरणात त्याचा विचार करणे आवश्यक आहे. रेडिओ प्रदूषणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण प्रोटोकॉल असणे गरजेचे आहे. अशा तयारीमुळे अण्वस्त्र वापरण्याविरुद्ध प्रतिबंधक परिणाम घडतो.”
या प्रसंगी जनरल चौहान यांनी मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले, “एमएनएसने गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी, जहाजांवरील रुग्णालये, तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरांपासून मानवतावादी मोहिमांपर्यंत अपार सेवाभावाने काम केले आहे. नर्सेस फक्त उपचार देत नाहीत तर आशा, दिलासा आणि करुणाही देतात. उपचार करणाऱ्यांच्या भावनिक व मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. भारतीय सशस्त्र दलांमध्ये समन्वय वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. “एमएनएस हे एकमेव असे दल आहे ज्यामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांमध्ये नर्सिंग स्टाफ सहजपणे बदलला जाऊ शकतो. तीनही दलांमध्ये अशा संयुक्ततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.