धारणीय वेग (भाग 4)

    30-Sep-2025
Total Views |

आहाराने जर राजस आणि तामस भावांचा उद्रेक होतो असे म्हटले, तर त्याचा अर्थ असा होतो की, त्या त्या (राजसिक) गुणाची आणि तामसिक गुणांची वाढ करण्याची क्षमता विशिष्ट आहारीय कल्पनांमध्ये आहे. आजच्या लेखातून सात्त्विक-राजसिक आणि तामसिक आहाराबद्दल जाणून घेऊया.

शरीराचे पोषण जसे अन्नाने होते, तसेच मनातील विविध भावना उत्पन्न करणे, नियंत्रित ठेवणे, भावनांचा उद्रेक होणे इ.देखील अन्नाने होते. मानस भाव (जसे राग/क्रोध, शोक, भय/भीती) जेव्हा अतिप्रमाणात उत्पन्न होतात, तेव्हा पचनप्रक्रियेवर परिणाम होतो. अग्नि (पाचकाग्नि-ज्याने खाल्लेल्या अन्नाचे नीट विघटन होते) त्यामध्ये बिघाड उत्पन्न होतो. हा बिघाड म्हणजे अग्नि (पचनशक्ती) नैसर्गिक (NATURAL)पेक्षा अधिक (सतत खा-खा सुटणे) किंवा मंद होणे (भूकच न लागणे, अन्नाची चव न कळणे, अन्नात रुचि न राहणे इ.) किंवा विषम म्हणजे एखाद वेळेस खाल्ल्यावर पुनः थोड्याच वेळाने भूक लागते. पण, एखाद वेळेस थोडेही खाल्ले की पूर्ण दिवस पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. अग्निदुष्टी/बिघाडामुळे शरीराचे, मनाचे बुद्धीच्या विविध कार्यांमध्ये, क्रियांमध्ये बिघाड उत्पन्न होतो. आरेाग्य-स्वास्थ्य बिघडते आणि आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. तेव्हा स्वस्थ राहण्यासाठी उत्तम आहाराची जोड असणं अत्यंत आवश्यक आहे. आहाराने/अन्नाने केवळ पोट भरते असे नाही, तर मनही तृप्त होते. चांगले जेवल्यावर मनही प्रसन्न आणि समाधानी होते. केवळ मुखाने आहाराचा आस्वाद घेतला जात नाही, पण पंचज्ञानेन्द्रिय अन्नाच्या स्वरुपाशी, वासाशी, चवीशी, रंगाशी एकरुप होतात आणि तेव्हाच समाधान, तृप्ती जाणवते. अन्नाचे सुयोग्य पचनास जेवताना तन-मन दोन्ही आहारात गुंतलेले असणे महत्त्वाचे आहे. यालाच

आयुर्वेदाच्या आहार नियमावलीमध्ये ‌‘तन-मना-भुञ्जीत‌’ असे म्हटले आहे. आहार पचनासाठीचा जो अग्नि आहे, पाचकाग्नि, त्याला यज्ञाची उपमा दिली आहे. जसा पूर्वाश्रमी बऱ्याच घरांमधून सतत अग्निहोत्र तेवत असत, तसाच पोटातील अग्निदेखील सतत दिसणे गरजेचे आहे. तो विझणे म्हणजे मृत्यू आणि भडकणे म्हणजे विकृति होय. तो सतत दीप्त राहण्यासाठी आहारस्वरुपी आहुती त्यात घालावी लागते. आहार हा आरोग्यपूरक, पोषक असावाच, त्याचबरोबर व्यक्तीच्या प्रकृतीला आणि वातावरणातील ऋतुलाही सात्म्य असेल (SUIT होईल) असाच असावा. आपण जसा आहार घेतो, तसे आपले आचार-विचारही निर्माण होतात. मनाचे दोन दोष आहेत, राजस आणि तामस आणि एक गुण आहे, सत्त्व. असा विचार करा की, एका काठीचे एक टोक म्हणजे रजगुण (राजस दोष) आणि दुसरे टोक म्हणजे तमोगुण (तामस भाव दोष) आणि त्यातला (त्या काठीचा) केंद्रबिंदू म्हणजे सत्त्वगुण. एका बोटावर काठी जर संतुलित करायची असली, तर ते बोट केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. ज्या बाजूला ते बोट सरकेल, काठी त्या दिशेने वाकेल/पडेल. याचाच अर्थ, EQUIPOISE - समत्व साधण्यासाठी मनाला सात्त्विक भावात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

आहाराने जर राजस आणि तामस भावांचा उद्रेक होतो असे म्हटले, तर त्याचा अर्थ असा होतो की, त्या त्या (राजसिक) गुणाची आणि तामसिक गुणांची वाढ करण्याची क्षमता विशिष्ट आहारीय कल्पनांमध्ये आहे. आजच्या लेखातून सात्त्विक-राजसिक आणि तामसिक आहाराबद्दल जाणून घेऊया.

राजस दोष हा क्रियाशीलतादर्शक आहे. इच्छा निर्माण होणे, कल्पकता, कर्माला-कार्याला चालना देणे इ.ला चालना देणारे आहे. व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. महत्त्वाकांक्षा उत्पन्न करतो, आवड-ऊर्जा-कार्यमग्नता इ. गुणांना प्रेरित करतो. सत्त्व-रज-तम यांची साम्यावस्था मनाला निर्दोष, दोषरहित ठेवण्यास मदत करते. रजोगुणाचे वरील गुण प्रत्येकाला हवेहवेसेच आहेत. पण, सत्त्वगुणांत जेव्हा विषमता उत्पन्न होते, वैषम्य निर्माण होते, तेव्हा मन अस्थिर होते, अधिक चंचल होते आणि अशा वेळेस मन बाह्य विषयांकडे अधिक भरकटत जाते, धावत जाते. संतुलन बिघडले की जे प्रभावी आहे, त्याचे अतिरेकी, उद्रेक स्वरुप समोर येते आणि अतिरेकी काम, अति विचार किंवा भौतिक गोष्टींकडे अति ओढ निर्माण होते. या अतिरेकामुळे काम, क्रोध, दंभ, मत्सर व अशासारखे विविध भाव उत्पन्न होतात. विशिष्ट आहार सेवनाने शरीरात पित्त व मनात रजोगुणाचे अतिरेकी वाढ होऊन ते भाव विकृत अवस्थेत जातात. राजसिक आहार म्हटला की चमचमीत तेलकट, तळलेले, तिखट, मसालेदार, रस्सेदार पदार्थ होय. खारट, आंबट आणि तिखट चवीचे पदार्थ बहुतांशी वेळेस राजसिक दोषाला पूरक असतात. पित्ताचा आणि राजसदोषाचा तसा परस्पर संबंध जाणवू शकतो. तापट, लगेच-अतिरेक प्रतिक्रिया देणे, अति शौर्य, परिणाम-दुष्परिणामांचा विचार न करता केलेली कृति ही राजसदोषाच्या दुष्टीचे प्रतीक आहे. अति प्रमाणात चहा-कॉफी, कांदा-लसूण-लोणची, विविध प्रकारचे केचअपस आणि सॉस, व्हिनेगर इ. सगळे अन्नपदार्थ राजसिक आहारात येते. ज्या आहाराने खूप ऊर्जा मिळते (REDBULL मद्यपान इ.देखील) त्याचे अति सेवन केल्यास मनाला अतिचालना मिळाल्याने ते RESTLESS होते, राग-चिडचिड, लवकर झोप न येणे इ. लक्षणे उत्पन्न होतात. भरदाव वेगाने वाहने चालवणे, मारामारी इ. कुकर्म राजसदोषाच्या आधिक्याने होतात.

काठीचे दुसरे टोक म्हणजे, तामस भाव (गुण) जेवढी क्रियाशीलता राजसदोषात आहे, तेवढाच मंदपणा, शांतता, अंधकार प्रेरणेचा अभाव हे तामसाचे वैशिष्ट्य आहे. जडत्व, क्रियाशीलतेचा अभाव (निष्क्रियता), अज्ञान, अंधकार, आळस, काही न करण्याची स्थिती म्हणजे तमोगुणाची दुष्टी यामध्ये प्रोत्साहनाचा अभाव असतो, शून्यता असते. रजोगुणी व्यक्ती जेवढी हायपरॲक्टिव्ह असते, तेव्हा तमोगुणी व्यक्ती आळशी आणि कर्महीन असतो. आहे त्या स्थितीत (चांगली, वाईट, त्रासदायक) राहणे, हालचाल क्रिया न करणे हा तमोगुणाचा विशेष गुणधर्म आहे. यामुळे तमोगुणी व्यक्ती आळशी, अज्ञानी, जिला काही न केल्याची खंत असते, पण करायची इच्छा नसते आणि भीती (भय) सतत वाटत राहणे असे होऊ शकते. क्रियाशून्यता इतक्या टोकाची होऊ शकते की, रोजची दिनचर्याही व्यवस्थित पाळली जात नाही. अति झोपणे, अंघोळ न करणे, केस न विंचरणे, गलिच्छ राहणे इ.पासून ते इतरांशी संपर्क बंद करणे, संवाद साधण्याचाही आळस येणे इथपर्यंत जाऊ शकतो. काही अन्नाचे प्रकार अशा तमोगुणाला पूरक ठरतात. तमोगुणाचा शरीरात अतिरेकी वाढ करण्यास कारणीभूत ठरतात. जसे, शिळे, नासलेले, कुजलेले, खराब झालेले अन्न, अन्न अति मात्रेत गरजेपेक्षा जास्त खाणे, पचायला जड अन्नाचे वारंवार सेवन करणे. अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा अति वापर करणे, रेडी टू ईट खाद्यपदार्थ, ज्यात खूप ADDITIVES आहेत, जे ADDICTIVE आहेत (जसे अजिनोमोटो इ.) अशा आहार सेवनाने आळस तर येतोच, पण, आकलनशक्ती कमी होऊन विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो. इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे अल्प कष्ट, अल्प चेष्टा होतात, कामे पूर्ण न झाल्याने असाहाय्यतेची भावना उत्पन्न होते, नकारात्मक भाव, उदासीनता, आळस, अज्ञान, खेद, भीती इ. भावनांचा उद्रेक होतो. अति मांसाहार विशेषतः जिथे सतत, मंद आचेवर शिजविले जाते, शिळे अन्न, अति शिजविलेले अन्न, अति मत्स्याहार, अति मद्यपान, कांदा-लसूण, अतिथंड केलेले खाद्यपदार्थ, SYNTHETIC INGREDIENTS आणि परिरक्षक (PRESERVATIVES), कुजवलेले, शिळे पदार्थ, तंबाखू व अन्य मादक पदार्थ इ. सगळे तामसगुणी आहेत.

यापेक्षा अधिक मोठी यादी राजसिक व तामसिक आहारीय पदार्थांची आहे. जसे शरीराला इजा झाली की मनाला त्रास होतो आणि मन अस्थिर असेल, तर शरीरावरही त्याचे पडसाद उमटतात. तसेच आहाराचेही आहे. सत्त्व-रज-तम या तिन्ही मानसिक भावांचा समतोल आरोग्यासाठी गरजेचा आहे. हे संतुलन बिघडले हे मानसदोष वाढून मानसिक आणि शारीरिक आजारांना निमंत्रण देण्यासारखे होते आणि यासाठीच निरोगी राहायचे असले, तर आपण काय खातोय, याकडेही लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. (क्रमशः)

- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
[email protected]