सर्वविनाशी डावा विचार : सांस्कृतिक साम्यवाद

30 Sep 2025 21:34:54

संपूर्ण जगातील कोणत्याही प्रकारच्या सत्ता संपुष्टात आणून एक निरंकुश समाजव्यवस्थेची निर्मिती करण्याचा साम्यवादाचा जुनाच मानस. कोणत्याही समाजाची, व्यक्तीवरील मानसिक, सांस्कृतिक वा वैचारिक सत्ता सांस्कृतिक साम्यवादास मान्य नाही. त्यानिमित्ताने ‘सांस्कृतिक साम्यवाद’ या संकल्पनेचा ऊहापोह करणारा लेख...


रशियन राज्यक्रांतीनंतर साम्यवादी रशियाने स्थापन केलेले सोव्हिएत साम्राज्य ९०च्या दशकात कोसळले. ६०च्या दशकात साम्यवादी तत्त्वांवर स्थापन झालेले चिनी सरकार आज आर्थिक धोरणांच्या बाबतीत साम्यवादी आहे, असे अजिबात म्हणता येत नाही. भारतासारख्या देशांमध्ये ९०च्याच दशकात साम्यवादाची झूल उतरवून, आर्थिक उदारीकरणाकडे वाटचाल सुरू झाली होती. एकंदरीत साम्यवादी अर्थव्यवस्था आज जगाच्या पाठीवर कुठेही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. काही तथाकथित विद्वानांचे कंपू सोडले, तर साम्यवादी आर्थिक प्रारूपाची कोणी चर्चाही करत नाही. असे असताना, साम्यवादी विचार आज जगातील एक प्रमुख विचारप्रवाह म्हणून का ओळखला जातो आणि आज आपल्याला दिसणारे साम्यवादाचे बदललेले चित्र नेमके कसे आहे? ते जाणून घेणे आवश्यक आहे. साम्यवादी विचार हा स्वतःला जागतिक विचार म्हणवून घेत असल्याने, त्याची स्वाभाविक प्रवृत्ती ही वसाहतवादी विचारांशी साधर्म्य राखणारी आहे. परंतु, त्याची प्रत्यक्ष मांडणी अंतर्विरोधांनी भरलेली आणि त्याचाच आधार घेत स्वतःला स्थिर करणारी आहे. त्यामुळे साम्यवादी चिंतनामुळे कोणते वैचारिक धोके निर्माण होऊ शकतात, याचे आकलन निर्वसाहतीकरणाचा अभ्यास करताना आवश्यक आहे.

साम्यवादाच्या मुळाशी विरोधविकासाची हेगेलची मांडणी आहे, हे आपण पाहिले. हेगेलची मांडणी मुळात इतिहासाच्या आकलनासाठी होती. मार्सने त्याच मांडणीचा वापर आर्थिक व्यवहारांच्या आकलनासाठी करत, सततच्या वर्गसंघर्षाचे तत्त्व मांडले. परंतु, मानवी प्रेरणा या केवळ भौतिक स्वरूपाच्या असतात, या चुकीच्या समजुतीतून केलेली मांडणी समाजाच्या अन्य प्रश्नांवर उपयोगी नव्हतीच, पण आर्थिक विषयातही साम्यवादी मांडणीने प्रतिपादलेले उत्तर अपूर्ण ठरले. दुसरे म्हणजे मार्सला अपेक्षित क्रांती प्रगत औद्योगिकीकरण असलेल्या पश्चिम युरोपीय देशांमध्ये झालीच नाही. हे सर्व चित्र पाहता काही साम्यवादी विचारवंतांनी, मार्सच्या मांडणीचा फेरविचार करायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न मार्सच्या आर्थिक मांडणीकडून दूर जात, हेगेलच्या वैचारिक मांडणीची पुनर्प्रस्थापना करणारा होता. साम्यवादाच्या या नव्या मांडणीला ‘सांस्कृतिक साम्यवाद’ म्हणून ओळखले जाते.
सांस्कृतिक साम्यवादाचा पाया हा विरोधविकासाचे तत्त्व हाच असला, तरी त्याचे उपयोजन सांस्कृतिक संदर्भात केले जाते. मार्सच्या सिद्धांतातील धनदांडग्या वर्गाची जागा इथे सांस्कृतिक उच्च वर्ग घेतो. प्रत्यक्ष जुलूम हे या उच्च वर्गाचे साधन नसते, तर आपल्या सांस्कृतिक मूल्यांना श्रेष्ठ म्हणून सर्व समाजावर लादण्याचे काम या वर्गाकडून केले जाते. या मूल्यांच्या कृत्रिम उतरंडीमुळे, तथाकथित खालचा वर्ग या उच्च वर्गाकडे सतत आदर्श म्हणून पाहात राहतो आणि सांस्कृतिकदृष्ट्या कायम दबलेला राहतो. हा सांस्कृतिक उच्च वर्चस्ववाद (हशसशोपू) सांस्कृतिक असंतोषाच्या मुळाशी आहे आणि त्याचे उच्चाटन आवश्यक आहे, असा सिद्धांत सांस्कृतिक साम्यवादाने मांडला. इटलीमधील अंतोनियो ग्रामशी या संकल्पनेचा एक प्रमुख प्रवर्तक मानला जातो.

याच संकल्पनेचे किंचित वेगळे स्वरूप, फ्रँकफर्ट स्कूल म्हणून ओळखल्या जाणार्या गटाने मांडले. या गटाच्या मते संस्कृतीचा प्रवाह एका छोट्या गटाच्या हातात नियंत्रित असतो आणि ते ठरवतात त्याच मूल्यांना सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होते. अन्य समाज या मूल्यांची चिकित्सा न करता, त्यांना स्वीकारतो आणि त्याच मूल्यांमध्ये स्वतःला तोलून पाहतो. स्वाभाविकपणे या छोट्या गटाची मूल्ये संपूर्ण समाजाची मूल्ये म्हणून प्रस्थापित होतात. इथे कोणीही कुणावरही जबरदस्ती केलेली नसते, तर तथाकथित उच्च वर्गाने त्यांच्या श्रेष्ठत्वाचा बेमालूम आभास निर्माण केलेला असतो. एक प्रकारे संस्कृतीचा प्रवाह हा या छोट्या गटाने चालवलेला संस्कृतीचा कारखाना असून, त्यात बनलेले उत्पादन सर्व समाजांत वितरित होते आणि संस्कृती म्हणून मान्यता पावते. त्यामुळे सर्व प्रकारच्या सांस्कृतिक मूल्यांना केवळ त्यांच्या ऐतिहासिक किंवा सामाजिक महत्त्वासाठी मान्यता न देता, प्रत्येक मूल्याची चिकित्सा करायला हवी अशी मांडणी या गटाने केली. या मांडणीला चिकित्सासिद्धांत (लीळींळलरश्र ींहशेीू) म्हणून ओळखले जाते.

ग्रामशीचे आणि फ्रँकफर्ट स्कूलचे विचार हे दोन्ही, दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे मांडले गेले होते. दोन महायुद्धांच्यामधील आर्थिक आणि राजकीय स्थित्यंतराचा त्याला संदर्भ आहे. आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर साम्यवादी विचार घेऊन सत्तेत आलेल्या नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटलीमध्ये सर्व समाजांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय प्रतीकांचा वापर या दोन्ही राजकीय गटांनी केल्यावर, केवळ मार्सचा सिद्धांत अपेक्षित क्रांती घडवू शकत नाही आणि समाजासाठी सांस्कृतिक मूल्येही महत्त्वाची असतात या जाणिवेतून सांस्कृतिक साम्यवादाची पायाभरणी झालेली आहे. परंतु, मार्सच्या साम्यवादापासून तात्त्विक फारकत घेतली, तरी या नवीन मांडणीने संपूर्ण क्रांतीच्या तत्त्वापासून फारकत घेतलेली नव्हती. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या दबलेल्या समाजाची संपूर्ण क्रांती सांस्कृतिक साम्यवादात अपेक्षित असून, आर्थिक साम्यवादाप्रमाणेच तिला हिंसेचे वावडे नाही. हेगेलचे सततच्या संघर्षाचे तत्त्व इथेही कायम राहते, मात्र हा संघर्ष सांस्कृतिक मूल्यांच्या स्थापनेसाठी आहे. त्यामुळे सांस्कृतिक साम्यवादाची लढाई खालच्या वर्गाला कोणत्यातरी ऐहिक सुखांच्या प्राप्तीपुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या जीवनमूल्यांच्याच प्रस्थापनेची ही लढाई आहे.

मार्सच्या मांडणीत जे स्थान आर्थिक दृष्टीने शोषक आणि शोषित यांचे होते, तेच स्थान या नव्या सिद्धांतात सांस्कृतिक उच्च आणि नीच वर्गाचे आहे. हा उच्च आणि नीच भेद नेमका ठरवायचा कसा ही अडचण जशी आर्थिक साम्यवादात होती, तशीच ती सांस्कृतिक साम्यवादातही राहिली. परंतु, सांस्कृतिक साम्यवादाने, विशेषतः चिकित्सासिद्धांताने या प्रश्नाचे एक वेगळेच उत्तर दिले. सर्व प्रकारचे समाजव्यवहार एकप्रतलीय प्रतिमानात पाहता येत नसल्याने, समाजांतर्गत उच्चनीचतेचे भेदही एकप्रतलीय पद्धतीत पाहता येणार नाहीत. प्रत्येक प्रतलावर या दोन वर्गांच्या अस्तित्वाची कल्पना करता येऊ शकते आणि प्रत्येक प्रतलावर शोषणाची प्रक्रिया सुरूच असते. हे शोषणही केवळ आर्थिक स्वरूपाचे नसून, सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या अधिकारांचे शोषण या प्रतिमानात महत्त्वाचे असते. परंतु, सांस्कृतिक उच्च वर्चस्ववाद हा केवळ सांस्कृतिक परिघात मर्यादित न राहता, आर्थिक आणि व्यावहारिक परिघातील वर्चस्वसुद्धा या उच्चवर्गाच्या हातात केंद्रीभूत होण्यास कारण ठरतो. अशा प्रकारचा उच्च वर्चस्ववाद हा भ्रामक गुणवंत, सत्तेचे मिथक उभारण्यातही काही वेळा यशस्वी होतो. भौतिक साधने एकवटल्याने उच्च वर्गाची सत्ता किंवा विशिष्ट मूल्यांची सत्ता समाजमानसात स्थिरपद होते आणि त्यातूनच तिला बळ मिळत राहते. बहुप्रतलीय सांस्कृतिक उतरंडीत जे समाजगट सर्वच किंवा बहुतांश प्रतलांवर नीच वर्गात राहतात त्यांची सर्वच बाजूंनी कोंडी होते आणि त्यांना उग्र आंदोलनांमधून क्रांतीचा प्रयत्न करणे, हाच उपाय उरतो.

सांस्कृतिक साम्यवादाचे हे बहुप्रतलीय संघर्षाचे तत्त्व, म्हणूनच आर्थिक साम्यवादापेक्षा अधिक घातक आहे. शोषक-शोषित गटांची निश्चित व्याख्या नसल्याने, प्रत्येक विशिष्ट समाजगट कोणत्यातरी परिप्रेक्षात स्वतःला शोषित समजून क्रांतीचा उद्घोष करू शकतो. त्याचबरोबर शोषक कोण हेही सतत बदलत असल्याने, हा लढा एकाचवेळी सर्वांचाच आणि सर्वांच्याच विरोधात असा होतो. एकप्रकारे सांस्कृतिक साम्यवाद रामायणातील इंद्रजितासारख्या एका मायावी शत्रूची कल्पना करतो, जो सतत त्याचे रूप बदलत राहतो. तात्त्विकदृष्ट्या बहुप्रतलीय शोषक-शोषित रचना प्रत्यक्षात समाजातील सर्व लहानमोठ्या घटकांना एकमेकांविरुद्ध उभी करते आणि त्यातून संपूर्ण समाजाचीच वीण उसवली जाते. उच्च वर्चस्ववादाचा आधार घेत आणि आपण त्याचे बळी असल्याचे भासवत, प्रत्येक छोटा समाजगट सतत इतर सर्व समाजाविरुद्ध संघर्षाची भूमिका घेत राहतो. त्यातून टोकाची व्यक्तिगत अधिकारांची मागणी उभी राहते परंतु, या तथाकथित शोषितांचे अधिकार पूर्ण कोणी करायचे, याचे कोणतेही विवेचन सांस्कृतिक साम्यवाद करीत नसल्याने, अधिकारांच्या मागणीची परिणती बरेचदा राज्यशासनाविरुद्ध किंवा मुख्य समाजगटाविरुद्ध हिंसेत होते. प्रत्यक्ष हिंसेच्या कित्येक अधिक प्रमाणात सांस्कृतिक साम्यवाद, शाब्दिक हिंसेचा आणि सामाजिक हिंसेचा वापर करतो. या प्रकारची हिंसा माध्यमांतून जाहीर बदनामी, अश्लाघ्य भाषेचा वापर, ठराविक व्यक्ती अथवा गटाचा ठरवून सामाजिक बहिष्कार या स्वरूपाची असते. तथाकथित उच्च वर्गाच्या मनात स्वतःच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीविषयी अपराधगंड निर्माण करणे, हा अशा अप्रत्यक्ष हिंसेचा उद्देश असतो. परंतु, कोणताही एक समाजगट हा निश्चितपणे शोषक अथवा शोषित नसल्याने, सर्वच व्यक्ती एकाचवेळी अपराधगंड आणि क्रांतीचा उद्घोष या दोन टोकांमध्ये आंदोलित होत राहतात आणि संपूर्ण समाजच एक प्रकारचे उकळते रसायन बनते.

अशा प्रकारे सांस्कृतिक साम्यवाद आर्थिक विषमतेचे मूळ जरी सांस्कृतिक विषमतेत शोधत असला, तरी त्याचा प्रवास हा समाजाच्या सर्वच छोट्या-मोठ्या घटकांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यात होतो. यातून निर्माण होणारी निरंकुश व्यवस्था, ही सांस्कृतिक साम्यवादास अभिप्रेतच आहे. या निरंकुशतेच्या तत्त्वाचे मूळ आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्थापन झालेल्या, जॅकोबिन गटाच्या मांडणीत आणि कार्यपद्धतीत दिसते. आर्थिक साम्यवादापेक्षा त्याचे वेगळेपणही लक्षात घेण्याची गरज, त्याचे तात्त्विकदृष्ट्या खंडन करण्यासाठी आवश्यक आहे. सांस्कृतिक साम्यवादाचे ध्येय हे कोणतेही संपूर्ण जगावर राज्य करण्याची मनीषा बाळगणारे साम्यवादी राज्यसरकार स्थापण्याचे नाही, तर त्याउलट संपूर्ण जगातील कोणत्याही प्रकारच्या सत्ता संपुष्टात आणून एक निरंकुश समाजव्यवस्था आणण्याचे आहे. अशा प्रकारच्या समाजाचे संचालन कशा प्रकारे होईल, असा विचारच या प्रतिमानात होत नाही. कारण कोणत्याही प्रकारची समाजाची व्यक्तीवरील मानसिक, सांस्कृतिक वा वैचारिक सत्ता सांस्कृतिक साम्यवादास मान्य नाही. स्वाभाविकपणे सांस्कृतिक साम्यवादाचे पहिले लक्ष्य हे जगातील सर्व प्राचीन संस्कृती हेच असते. परंपरेने चालत आलेल्या कर्मांनी, पद्धतींनी, वहिवाटींनी बद्ध समाज जेव्हा या परंपरांचा निर्वाह विशेष चिकित्सा न करता करत राहतो, तेव्हा असा समाज चिकित्सासिद्धांताचे स्वाभाविक लक्ष्य बनतो. कित्येक शतकांच्या वसाहतीच्या वैचारिक पारतंत्र्यात अडकलेला समाज, स्वतःच्या चालीरितींवर होणार्या टीकेस उत्तर देण्यास सक्षम असतोच, असे नाही. जगातील सर्वांत प्राचीन आणि सनातन अशी हिंदू संस्कृती, त्यामुळेच सांस्कृतिक साम्यवादाचे अग्रीम लक्ष्य बनते.

सांस्कृतिक साम्यवाद आर्थिक क्षेत्र ओलांडून संस्कृतीच्या क्षेत्रातही एक नवे आव्हान उभे करतो, ज्याचा परामर्श स्वतंत्रपणे आपण घेऊ. या आव्हानाच्या समग्र आकलनाची आवश्यकता त्याला समाजचिंतनातून संपूर्णपणे परास्त करण्यासाठी आवश्यक आहे.

Powered By Sangraha 9.0