सरन्यायाधीशांची आई कमलताई गवई विजयादशमीच्या उत्सवाला जाणार; डॉ. राजेंद्र गवई यांचे स्पष्टीकरण

30 Sep 2025 13:41:33

मुंबई : भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या आई कमलताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे निमंत्रण मिळाले असून त्या जाणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. वास्तविक कमलताईंनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. याबाबत त्यांचा मुलगा आणि सरन्यायाधीश गवई यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई यांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे.

माध्यमांना संबोधताना त्यांनी स्पष्ट केले की राजकारण आणि वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात. ते म्हणाले, संघाने कमलताईंना ५ ऑक्टोबरला अमरावती येथे होणाऱ्या उत्सवामध्ये मुख्य अतिथींच्या यादीत सामाविष्ट केले आहे. हा कार्यक्रम मुख्य कार्यक्रम नाही. विजयादशमीचा मुख्य कार्यक्रम नागपूरमध्ये २ ऑक्टोबरला आयोजित केला जाणार आहे.

डॉ. कमलताई गवई या ‘दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट’च्या संस्थापक अध्यक्षा आहेत. ५ ऑक्टोबर रोजी श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात अमरावती येथे होणाऱ्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून त्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्य वक्ते म्हणून ‘प्रज्ञा प्रवाहा’चे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार उपस्थित राहणार आहेत.

कमलताई गवई या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशा आशयाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पण हे पत्र बनावट असल्याचा दावा केला जात आहे. अशात कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी सांगितलं आहे.

राजेंद्र गवई पुढे म्हणाले की, “रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कमलताई याचे पती रा. सू. गवई यांचे भाजप नेत्यांशी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध होते. रा. सू. गवई यांनी राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपली होती.”


Powered By Sangraha 9.0