तिरुपती देवस्थानच्या मंदिर उभारणीस काँग्रेसचा विरोध

30 Sep 2025 12:34:24

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाने मागास समाजाच्या वस्त्यांमध्ये पाच हजार मंदिर उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी विरोध केला आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील ख्रिश्चन धर्मांतरणावर मात्र त्या मूग गिळून गप्प बसतात. हिंदू धर्मद्वेष हा देशातील काँग्रेसच्या आत्म्याचा स्थायीभाव झाला आहे.

आंध्र प्रदेशातील मागास जाती-जमातींच्या वसाहतींमध्ये पाच हजार मंदिरांची उभारणी करण्याची जी योजना ‌‘तिरुमला तिरुपती देवस्थान‌’ने आखली आहे, त्यास आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष वाय. एस. शर्मिला यांनी तीव्र विरोध केला आहे. वाय. एस. शर्मिला या राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांच्या कन्या होत. ‌‘तिरुमला तिरुपती देवस्थान‌’च्या या मंदिर उभारणी योजनेस काँग्रेसने केलेला विरोध लक्षात घेता, राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गेल्या दि. २७ सप्टेंबर रोजी पत्रकारांशी बोलताना वाय. एस. शर्मिला यांनी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तिरुमला तिरुपती देवस्थाना‌’वर जोरदार टीका केली. ‌’मंदिर उभारणी हा ‌‘संघाचा कार्यक्रम‌’ असून हा उपक्रम घटनेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. नायडू यांनी पूर्णपणे भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणास कवटाळले आहे‌’, असा आरोपही त्यांनी केला. दलित वस्त्यांमध्ये मंदिरांची उभारणी करण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. दलित वस्त्यांमध्ये पाच हजार मंदिरांची उभारणी करा, अशी मागणी कोणी केली आहे? ‌‘तिरुमला तिरुपती देवस्थान‌’कडे अधिक निधी असेल, तर त्यांनी तो दलितांच्या कल्याणासाठी किंवा वसतिगृहे उभारण्यासाठी खर्च करावा. मंदिरांची उभारणी म्हणजे, पैशाचा अपव्यय असल्याची टीका त्यांनी केली. हा निर्णय भेदभाव करणारा असून ही योजना सरकारने त्वरित गुंडाळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पण, वाय. एस. शर्मिला ज्या कुटुंबामधून आल्या आहेत, त्या कुटुंबाने नेहमीच ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. तसेच, शर्मिला यांचे यजमान तर सामूहिक धर्मांतर करण्याच्या कारवायांमध्ये गुंतले असल्याचा आरोप, त्यांच्यावर करण्यात येत आहे. हिंदूविरोधी मानसिकतेतून शर्मिला असे आरोप करीत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ‌‘तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळा‌’चे सदस्य भानू प्रकाश यांनी, शर्मिला यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. हिंदू समाजाचा आणि तिरुपती देवस्थानास, उदारपणे देणग्या देणाऱ्या भाविकांचा शर्मिला यांनी अपमान केला आहे. दलित आणि मागास समाजाच्या उत्कर्षाच्या हेतूने हा जो धार्मिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे, त्यास विरोध केल्याबद्दल शर्मिला यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आंध्र प्रदेश भाजपच्या प्रवक्त्या सदिनेनी यामिनी सरमा यांनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकून, शर्मिला यांच्या म्हणण्यास आक्षेप घेतला. आम्ही पाच हजार नव्हे, तर ५० हजार मंदिरे उभारू, त्यास आक्षेप घेणाऱ्या शर्मिला कोण? त्या हिंदूविरोधी राजकारणी आहेत. त्यांच्यामध्ये एवढी हिंमत असेल, तर चर्चकडून घेतल्या जाणाऱ्या देणग्यांबाबत त्यांनी विचारणा करावी. हज यात्रा, इमामांचे वेतन अशा ज्या गोष्टी सरकारी पैशातून होतात, त्याबाबत विचारणा करावी, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशात मागास जाती-जमातींच्या वसाहतींमध्ये पाच हजार मंदिरे उभारण्याची जी योजना ‌‘तिरुमला तिरुपती देवस्थान‌’ने आखली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असल्याचे यावरून दिसून येत आहे.

गरब्यामध्ये मुस्लीम तरुणांची घुसखोरी

नवरात्रीच्यानिमित्ताने अंबेची उपासना विविध प्रकारे केली जाते. गुजरातमध्ये तर नवरात्रीचे नऊ दिवस गरबा खेळून, अंबेची आराधना केली जाते. यामध्ये हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. नवरात्रीनिमित्त होणारा गरबा आता केवळ गुजरातचा राहिला नाही. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यातही गरब्याचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात हिंदू तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतात. अशा हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी, काही ठिकाणी मुस्लीम तरुणही हिंदू असल्याचे भासवून आणि खोटे नाव सांगून, अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. गरबा खेळण्यासाठी खोटे नाव सांगून मुस्लीम तरुण घुसल्याचे प्रकार राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उघडकीस आले. नवरात्र हा हिंदू समाजाचा उत्सव असल्याने त्यामध्ये अन्य धमयांना प्रवेश देता कामा नये, अशी मागणी केली जात आहे. तरीही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नसल्यानेच, घुसखोरी करून हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न मुस्लीम तरुणांकडून केला जात असल्याचे दिसते. राजस्थानमध्ये बांसवाडा येथील अंबा मंदिरालगत आयोजित गरब्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुस्लीमास पकडण्यात आले. आरव त्रिवेदी असे आपले नाव सांगून तो तेथे आला होता.

एका अल्पवयीन हिंदू मुलीला फूस लावण्याच्या हेतूने, सदर मुस्लीम तेथे आला होता. ‌‘बजरंग दल‌’ आणि ‌‘विश्व हिंदू परिषदे‌’च्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणास पकडून, पोलिसांच्या हवाली केले. असाच एक प्रकार मध्य प्रदेशात घडला. सागरमध्ये गरबा मंडपामध्ये दोन मुस्लीम तरुण खोटे नाव सांगून घुसले. त्यातील एक जण काश्मिरी मुस्लीम होता. आफताब हुसेन असे त्याचे नाव असल्याचे लक्षात आले. युगान्तक गरबा मंडपामध्ये हा प्रकार घडला. तेथे उपस्थित कार्यकर्त्यांना त्या दोघांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ते मुस्लीम असल्याचे आढळून आले. बनावट ओळखपत्र किंवा कोणाकडून तरी पास घेऊन, गरबा मंडपात या मुस्लीम तरुणांनी प्रवेश केल्याचे दिसून आले. ‌‘हिंदू जागरण मंच‌’ने या घटनेचा निषेध केला आहे. त्या दोघा मुस्लीम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते अधिक चौकशी करीत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहरातही घडली. त्या शहरातील एका गरबा कार्यक्रमात मोहम्मद हमीद रझा नावाचा एक मुस्लीम तरुण घुसला. आपले नाव राहुल असल्याचे सांगून त्याने तेथे प्रवेश केला पण, त्याचे संशयास्पद वर्तन लक्षात आल्याने, त्यास आयोजकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गरबा कार्यक्रमात हा प्रकार घडला. गरब्याच्यानिमित्ताने मुस्लीम तरुण घुसखोरी करत असल्याची तीन उदाहरणे येथे दिली आहेत. असे प्रकार अन्यत्रही घडत असणारच. हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी अशा उत्सवात मुस्लीम तरुण शिरकाव करतात, हे उघड आहे. हिंदू समाजाने अधिक सतर्क राहून हिंदूंच्या या उत्सवात अन्य धमय येणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच, या महोत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे.

चार संरक्षित स्थाने देण्याची योगी यांची विनंती!

सध्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेली उत्तर प्रदेशातील चार संरक्षित स्थाने आमच्या ताब्यात द्यावीत, अशी विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ही स्थाने बुंदेलखंडातील असून परंपरा जपण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने, या चार स्थानांचा विकास करण्यासाठी ती स्थाने उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यात आली आहे. जागतिक पर्यटन नकाशावर बुंदेलखंड आणण्याच्या हेतूने, ही मागणी करण्यात आली आहे. तालबेहत किल्ला (ललितपूर), कालिंजर किल्ला (बांदा), मादफा किल्ला (चित्रकूट) आणि झांशी येथील बरुआ घाटाच्या पायऱ्या या संरक्षित वास्तू, उत्तर प्रदेश सरकारला द्याव्यात अशी विनंती केली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून या संरक्षित स्थानांची योग्य काळजी तर घेतली जाईलच पण, त्याच वेळी पर्यटनासही प्रोत्साहन मिळेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. “बुंदेलखंड म्हणजे ‌‘भारताचे हृदय‌’ आहे,” असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. “ही चार स्थाने आमच्याकडे दिल्यास या भागाचा आर्थिक विकासही होईल,” असेही आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. “पुरातत्त्व वास्तू, पुरातत्त्व स्थाने आणि अवशेष यांच्यासंदर्भातील कायद्यातील ‌‘कलम ३५‌’च्या आधारे असे हस्तांतरण करणे, कायदेशीररित्या शक्य आहे,” असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

- दत्ता पंचवाघ
9869020732


Powered By Sangraha 9.0