अनाथ, परित्यक्तांचे आयुष्य उजळवण्याचा ध्यास

    30-Sep-2025
Total Views |

वय वर्षे केवळ नव्वद! पण ऊर्जा चाळीशीतल्या स्त्रियांएवढी. शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची आस. यावेळी ‘उंबरठा‘ चित्रपट आठवतो. हा चित्रपट समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या शांता निसळ यांच्यावर आधारित आहे. अभया शहाणेंनी शांता निसळ यांच्या मार्गदर्शनाखालीच समाजसेवेचे धडे गिरवले. यातून अनेकांचे आयुष्य उजळून निघाले आहे.


अभया गोविंद शहाणे यांनी दि. १३ सप्टेंबर १९५८ रोजी नाशिकमधील कळवण तालुयातून आपल्या नोकरीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे पद होते, ‘सोशल एज्युकेशन ऑफिसर‘ आणि कामाचे स्वरुप होते कुमारी माता, परित्यक्ता, अनाथ मुले यांची प्रगती होण्यासाठी काम करणे. त्यासाठी महिला मंडळांची स्थापना करणे, अंगणवांड्या सुरू करणे, शाळेत जाण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे. पण हे करणं खूप अवघड. गावागावांतून फिरून महिलांना जागृत करताना लोकांची आडकाठी असायची. त्यामुळे त्यांना प्रत्येक मोहिमेचं महत्त्व पटवून देणं, अवघड व्हायचं. पण पुढं त्यांना महत्त्व पटायचं. त्यातून साक्षारता मोहीम आणि पुढे रोजगार मोहीम सुरू झाली. महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या. हेच एकमेव ध्येय समोर ठेवून अभया तितक्याच उत्साहाने आजही कार्यरत आहेत. लग्नानंतरही समाजसेवेचं काम करताना त्यांची अनेक ठिकाणी बदली झाली. लग्नानंतर त्या नागपूरला समाजकल्याण असिस्टंट सुप्रिटेंडंट (उपअधीक्षिका) म्हणून रुजू झाल्या. तेथे सर्व लहान-मोठ्या गावात फिरून कुमारी माता, परित्यक्ता, बालविधवा यांची माहिती गोळा करणे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच त्यांचे काम. एका बाईची ही धडपड अनेकांना पाहावत नव्हती. त्यांनी कामात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अभया यांनी याला फार महत्त्व दिले नाही. त्यांना महिलांची साथ मिळत गेली. कामात अजिबात खंड पडला नाही. महिलांना शिवणकामासाठी मशीन मिळवून देणे, स्वेटर विणण्यासाठी मशीन देणे, ते विणण्याचे प्रशिक्षण देणे, खराटे बनविणे, मसाले तयार करून घेणे, असे अनेक उपक्रम सुरू होते. मुलांची शाळेची उपस्थिती वाढवण्यासाठी गावात फिरून सांगितले जात असे. त्यांच्या पालकांना समजावून सांगितले जात असे.

त्यानंतर अभया शहाणे यांची बदली मुंबईत चेंबूर, मुंबईला झाली. तिथे त्या ‘प्रोग्रॅम ऑफिसर‘म्हणून रुजू झाल्या. तिथे बेघर स्त्रियांसाठी वसतिगृहाच्या अर्थात भिक्षेकरी घरासाठी काम करू लागल्या. तिथेच ‘गॅजेट्स ऑफिसर‘ म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले. त्या भिक्षेकरी घरात एकूण २५० ते ३०० बायका होत्या. यासाठी ८८ कर्मचारी होते. या बायका, मुले पोलिसांना रस्त्यावर सापडलेली असत. त्यांना सुरक्षितपणे भिक्षेकरी घरात आणणे, त्यांची मानसिकता समजून घेणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे,

हे मोठे जिकिरीचे काम. महिलांचे पुर्नवसन हे एक अत्यंत संवेदनशील काम. अभया यांनी हे सर्व निष्ठेनं पूर्ण केलं. नागपूर ते मुंबईच्या प्रवासात त्यांनी २० वर्षांत ४५ महिलांचे लग्न लावून दिले. त्यातल्या काहीजणी आजही त्यांच्या संपर्कात आहेत. हे सांगताना त्यांचा ऊर भरून येतो. महिलांच्या सुख आणि दुःखाचा एक भाग होता आल्याचा त्यांना अभिमान वाटतो.

एकदा रस्त्यावर पडलेल्या बायकांमध्ये एक मनोरुग्ण महिला आढळली. ती घरातून पळून आली होती. तिचा पत्ता सापडत नव्हता. खूप शोधाशोध केल्यानंतर तिचे नातेवाईक जवळपास राहात असल्याचे समजले. त्यांचा पत्ता शोधून अभया यांनी तिचं मूळ घर शोधलं. तिथून मूळ गावी तिला पोहोचवलं. तिच्या नातीने तिला घरात घेतलं. त्यांच्या घरच्यांनी अभया शहाणे यांना बक्षीस देऊ केले; परंतु त्यांनी ते नाकारले. त्या म्हणाल्या, "आमच्याकडे २५० ते ३०० बायका आहेत. त्यांना काहीतरी बक्षीस द्या.” त्यावर नातीने सर्व बायकांना बांगड्या भरल्या. अशा आठवणी सांगताना अभया यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव दिसून येतात.

नाशिकमधल्या कळवणपासूनचा हा प्रवास नागपूर, अहमदनगर, सावंतवाडी, सोलापूर, कराड, औरंगाबाद, मुंबई आणि पुण्यापर्यंत येऊन स्थिरावला आहे. १९९४ मध्ये त्या अधिकृत समाससेवेच्या ध्यासातून निवृत्त झाल्या. पण पुण्यात स्थायिक झाल्यानंतरही समाजसेवेचा ध्यास त्यांना शांत बसू देईना. १९९७ मध्ये त्यांनी महिलांसाठी ‘स्नेहवर्धिनी‘ संस्था सुरू केली. योगाचे वर्ग सुरू केले. समविचारी निवृत्त झालेल्या शासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने ‘सर्वांगीण जीवनविकास’ ही शासकीय मान्यताप्राप्त संस्था सुरू केली.

पुण्यात त्या कात्रज येथील सुखसागर भागात स्थित आहेत. त्याकाळी कात्रज येथे येण्यासाठी बस नव्हती. रस्ताच नसल्याने बस सुरू करण्यासाठी ‘पीएमटी’ तयार नव्हती. पण अथक पाठपुरावा केल्यानंतर ‘शिवाजीनगर ते कात्रज‘ अशी पहिली बस अभया शहाणे यांच्यामुळे सुरू झाल्याचे नागरिक सांगतात. कात्रजमध्ये पाण्याची सोय नसल्याने अर्धा फर्लांग चालत जावे लागत असे. हा बायकांचा त्रास नष्ट करण्यासाठी त्यांनी नळ योजना ग्रामपंचायतीला सुरू करण्यास भाग पाडले.

आज वयाच्या ९०व्या वर्षी अभया शहाणे यांनी ‘सजीवी’ आणि ‘स्नेहवर्धिनी’ संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करत आहे. यासाठी अभया शहाणे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘नवदुर्गा पुरस्कार’, भारतीय जनता पक्षातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. स्त्री ही सक्षम, सजग आणि सबला आहे, हे दाखवून देणार्‍या ज्येष्ठ समाजसेविका अभया शहाणे यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

तृप्ती पारसनीस