जलद निकालासाठी कटिबद्ध

    30-Sep-2025
Total Views |

बाबाराव सावरकरांची गाढवावरून धिंड काढल्याचा राग मनाशी धरत नाशिकमध्ये मॅजिस्ट्रेटपदी असलेल्या जॅक्सनची, दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे या ध्येयवेड्या तरुणाने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेला जवळपास 116 वर्षांचा कालावधी उलटला आहे. आज ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे, अगदी दोनच दिवसांपूव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या सातमजली जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. जवळपास ३१० कोटी रुपये खर्चून उभारलेली ही इमारत, राज्यातील न्यायालयीन इमारतीतील सर्वांत देखणी आणि आधुनिक वास्तू ठरणार आहे. एकाही जिल्हा न्यायालयात नसलेले ‌‘ॲक्सिलेटर‌’ येथे आहेत. सुमारे चार लाख चौरस फुटांचे बांधकाम असणारी ही पर्यावरणस्नेही इमारत, नाशिक न्यायालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीच्या पाठीमागील बाजूला आहे.

इमारतीत भ्रमंती करताना विविध प्रकारची शिल्पे, चित्र आणि वारली चित्रकलेचे दर्शन घडते. त्याच्याशी अनुरूप प्रकाशयोजनेची सांगड घातली गेल्याने अंतर्गत भागास वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. इमारतीत ४५ न्यायालयीन सभागृह आहेत. याव्यतिरिक्त न्यायालयीन कार्यालय, सरकारी अभियोक्ता कक्ष, ग्रंथालय, संगणक सर्व्हर कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग खोली, हिरकणी कक्ष, बँक एटीएम, टपाल कार्यालय यांचा समावेश आहे. तसेच, वातानुकूलित यंत्रणा, उद्वाहन, अपंगांसाठी रॅम्प, छतावर सौरऊर्जेसाठी यंत्रणा आदींचा अंतर्भाव असल्याने इमारतीचे रुपडे खुलले आहे. चार वर्षांपूव या इमारतीचे भूमिपूजन माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते झाले होते. आता त्या इमारतीचे उद्घाटन विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होत आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण असाही योगायोग यानिमित्त जुळून आला आहे. इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा असल्या, तरी वर्षानुवर्ष तिष्ठत पडलेल्या अनेक केसेसमुळे हजारोंच्या आयुष्याचा चुराडा झाल्याची अनेक उदाहरणे या इमारतीच्या आवारात सापडतील. त्यामुळे उद्घाटनापूव जादा न्यायाधीशांची नेमणूक करून केसेसचा जलद निपटारा करण्यात येणार असल्याचे नाशिकच्या ‌‘बार असोशिएशन‌’ने सांगितले असले, तरी त्यावर उपाययोजना झाल्या तरच इमारतीचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.

नाशिकमध्ये गुंडगिरीला उधाण

भाऊ नाशकात आपलीच हवा आहे‌’, हे वाक्य गल्लीबोळात अगदी सहज ऐकायला मिळते. शहरात प्रत्येक छोटा-मोठा गुंड याच आविर्भावात नाक्या-नाक्यावर राडा घालताना दिसतो. त्यामुळे गुन्हेगारीबाबतीतही नाशिकची प्रगती बरीच झाली आहे की काय? अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. नाशकातली गुंडागिरी पराकोटीला गेली असून, पोलीस आयुक्तांचा कोणताही धाक या भुरट्या चोरांना नसल्याचे विदारक दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. एखादा व्हिडिओ शूट करायचा म्हटले, तरी तलवारी नाचवत सरळ पोटात हत्यार खुपसण्याचे प्रकार नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बघायला मिळत आहेत. अशा कृत्यांमध्ये बालगुन्हेगारांचा सर्वाधिक समावेश असून, ते स्वतःच व्हिडिओ काढून रिल टाकत आहेत. अगदी काल-परवा एका कॅफेत बसलेल्या एका तरुणाचा, असाच एका गँगने वार करून खून केला. त्यात आणखी भर म्हणून, नाशिकमधील राजीवनगर येथे अल्पवयीन मुलांनी मोटारीच्या काचा फोडून धुडगूस घातला. त्याआधी कोयते नाचवत भाईच्या पाया पड, असा धमकवण्याचा देवळाली कॅम्पचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मग सातपूरला दांडिया खेळून बाहेर पडणाऱ्या टोळक्याला एका दुचाकीचा धक्का लागला, म्हणून त्या दुचाकी चालवणाऱ्या युवकालाच टोळक्याने भोसकून टाकले.

या घटनेला अवघे काही तास उलटत नाहीत, तोच पाथड गावाच्या मार्गावर एका कॅफेत बसलेल्या युवकाचा, अशाच एक भुरट्या गँगने वार करत खून केला. पूव नाशिकमध्ये मोजक्याच भाईंचे प्रस्थ होते. त्यात काही राजकीय नेत्यांची नावेही घेतली जात. काळ बदलला, तसे प्रत्येक गल्लीबोळात भाई जन्माला आले. आपल्या वाहनाला कोणी कट मारला म्हणून विचारायला जावे, तर तोही भाई निघू शकतो आणि हत्यार काढून आपल्या पोटात खुपसू शकतो, इतकी भिती सध्या नाशिकच्या नागरिकांमध्ये रुजली आहे. एकेकाळी शांत असलेले नाशिक साऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करत होते. त्यामुळेच शहरात गुंतवणूक, उद्योग व व्यवसायाच्या अमाप संधी निर्माण झाल्या. पण, सध्यासारखी अशांतता शहरात वाढीस लागली, तर बाहेरून कुणी नाशिकमध्ये येणे सोडाच नाशिककरांना तरी नाशिकमध्ये राहावेसे वाटेल का? असाच प्रश्न उपस्थित
होत आहे.

- विराम गांगुर्डे