राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या संचालकपदी विरेंद्र तिवारी

    03-Sep-2025
Total Views |

national biodiversity authority



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
भारतीय वनसेवेतील निवृत्तीनंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील माजी वनअधिकारी विरेंद्र तिवारी यांची नियुक्ती राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या संचालकपदावर केली आहे (national biodiversity authority). पुढील तीन वर्षांसाठी तिवारी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे (national biodiversity authority). तिवारी यांनी यापूर्वी महाराष्ट्र वन विभागातील महत्त्वपूर्ण पदांवर काम केले असून भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्लूआयआय) संचालक पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आहे. (national biodiversity authority)
 
तिवारी हे १९८९ सालच्या बॅचचे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. गेल्याच आठवड्यात ते वन सेवेतून निवृत्त झाले. वन विभागात वन आणि वन्यजीव संवर्धनाबरोबरच धोरण आणि प्रशासकीय पातळ्यांवरही ठोस काम करावे लागते. त्यामुळेच वनसंगोपनाच्या कामात ताळमेळ राहून वनसंपत्तीची भरभराट होते. राज्याच्या वन विभागातील प्रशासकीय आणि धोरणात्मक कामांचा दांडगा अनुभव असलेले एक नाव म्हणजे वन अधिकारी विरेंद्र तिवारी. शिस्त, पाठपुरावा आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी वनसेवेत तीन दशक पूर्ण केली. तातडीने निर्णय घेऊन बेधडकपणे काम करण्यासाठी ते ओळखले जातात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे दि. ३१ आॅगस्ट, १९६५ रोजी तिवारी यांचा जन्म झाला. मात्र, त्यांचे बालपण हे मुंबईतील विक्रोळीत गेले. माटुंगा येथील 'आयसीटी' या संस्थेमधून १९८७ साली त्यांनी केमिकल अभियांत्रिकेची पदवी मिळवली. त्यानंतर वर्षभर नोकरी केली. पर्यावरणीय विज्ञानामध्ये एम.टेक करण्यासाठी तिवारींनी 'आयआयटी बीएचयू'मध्ये प्रवेश मिळविला आणि त्याठिकाणीच 'केंद्रीय लोकसेवा आयोगा'च्या परिक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
 
१९८९ सालच्या 'लोकसेवा आयोगा'च्या 'इंडियन फाॅरेस्ट सर्विस'च्या परिक्षेत तिवारी हे उत्तीर्ण झाले. 'लोकसेवा आयोगा'च्या परिक्षेत उत्तम गुण मिळाल्याने त्यांना 'इंडियन इन्फाॅर्मेशन सर्विस'मध्येही सेवा देण्याची संधी चालून आली होती. मात्र, पर्यावरणीय विज्ञानामध्ये एम.टेक करत असल्याने त्यांचा अधिक भर वन विभागातील सेवेकडे होता. त्यांनी राज्यात अगदी विदर्भापासून ते कोकण किनारपट्टीप्रदेशात काम केले आहे. मंत्रालयात देखील त्यांनी काम केले. डब्लूआयआयच्या संचालकपदावरील त्यांचे काम वाखाणण्याजोगे ठरले.