पाकप्रेमापोटीच ट्रम्प यांचा भारतविरोध - अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा दावा

03 Sep 2025 11:11:22

नवी दिल्ली, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जेल सुलिवन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबाचे पाकिस्तानमधील व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी भारतासोबतचे अमेरिका-भारत संबंध दुर्लक्षित केल्याचा ठपका सुलिवन यांनी ठेवला आहे. एका यूट्यूब मुलाखतीत सुलिवन यांनी भारत-अमेरिका व्यापार करारातील वाद, तसेच ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षविरामाचे श्रेय स्वतःकडे खेचण्याचा केलेला प्रयत्न यावर भाष्य केले.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात एनएसए राहिलेले सुलिवन यांनी म्हटले की, भारतासारख्या महत्त्वाच्या देशाशी असलेले संबंध दुय्यम ठरवणे ही अमेरिकेची मोठी धोरणात्मक चूक ठरेल. यापूर्वी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी देखील ट्रम्प यांच्या भारताशी असलेल्या धोरणांवर टीका केली होती.

सुलिवन यांनी या मुलाखतीत ट्रम्प कुटुंबाच्या पाकिस्तानमधील बिटकॉइनसंबंधी व्यवसायाचा उल्लेख केला, तर दुसरीकडे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक भारतात कारखाने उभारत असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने दशकानुदशके भारताशी संबंध बांधले आहेत आणि ते दोन्ही राजकीय पक्षांच्या सहकार्याने शक्य झाले आहे. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे आणि तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था व चीनविरोधी रणनीतीसाठी त्याच्यासोबत राहणे अमेरिकेच्या हिताचे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांनी कुटुंबाच्या व्यावसायिक फायद्यासाठी भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम घडवला असून, हे अमेरिकेसाठी मोठे धोरणात्मक नुकसान आहे. या पद्धतीमुळे जर्मनी, जपान, कॅनडा यांसारखे मित्रदेशही अस्वस्थ होतील. उद्या त्यांच्या बाबतीतही अमेरिका अशीच भूमिका घेईल का, असा प्रश्न त्यांना पडेल. यामुळे अमेरिकेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, असे सुलिवन यांनी म्हटले आहे.

आपली ओळख ही आपले वचन असायला हवे. मित्रदेशांना विश्वास वाटला पाहिजे की अमेरिका कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत उभी राहील. भारताच्या बाबतीत झालेले घटनाक्रम केवळ द्विपक्षीय नात्यांवरच नव्हे तर जागतिक स्तरावरील अमेरिकेच्या इतर भागीदारांसोबतच्या संबंधांवरही परिणाम करतील असा इशारा त्यांनी दिला.


Powered By Sangraha 9.0