मुंबई : "भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात आध्यात्मिक ज्ञानाची शिकवण आहे. भारतात जे आहे आणि इतर विकसित राष्ट्रांकडे जे नाही, ते नेमके हेच आध्यात्मिक ज्ञान आहे. भगवद्गीतेतील समत्व दर्शनाचे तत्वज्ञान हेच भारताचे खरे तत्वज्ञान आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. केरळच्या कलाडी श्री शारदा सैनिक शाळेत गीतायनम राष्ट्रीय चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत डॉ. कृष्णगोपाल म्हणाले, जगातील राष्ट्रे केवळ भौतिक विकासाचा आधार घेऊन प्रगती करत असताना, सर्वत्र अशांतता पसरत आहे. गीतेतील अर्जुनाप्रमाणे, आज समाज त्यांच्या कर्तव्याच्या भावनेत गोंधळलेले आणि अस्वस्थतेने भरलेले दिसतात. भगवंताने गीतेद्वारे अर्जुनाला दिलेले व्यापक आध्यात्मिक ज्ञान हा संपूर्ण जगाच्या शाश्वत आणि संतुलित विकासासाठी उपयुक्त एकमेव मार्ग आहे. "ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति" शिकवणाऱ्या या ज्ञानाची आता वेळ आली आहे
एपीजे अब्दुल कलाम टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. के. शिवप्रसाद यांनी या चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी सांगितले की गीता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रासंगिकता प्राप्त करत आहे. काही वर्षांपूर्वी, केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ई.के.नयनर यांनी व्हॅटिकनमध्ये पोपची भेट घेतली तेव्हा त्यांनी सादर केलेली भेट भगवद्गीता होती. काळ आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन, गीता हा भारताच्या अध्यात्माचा ग्रंथ आहे.
भारतीय विचार केंद्राचे संचालक आर. संजयन यांनी प्रमुख भाषण केले. त्यांनी सांगितले की, जग भारताच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करेल अशी वेळ जवळ येत आहे आणि गीता प्रचार प्रकल्प हा त्या दिशेने जागृती करणारा आहे. त्यांनी २०२६ मध्ये तिरुवनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय गीता चर्चासत्र आयोजित करण्याची घोषणाही केली.
भगवद्गीतेचे दर्शन प्रसारित करण्यासाठी परमेश्वरजी यांच्या नेतृत्वाखाली भगवद्गीता स्वाध्याय समितीने २००० मध्ये तिरुवनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय गीता चर्चासत्र आयोजित केले होते. त्या ऐतिहासिक घटनेच्या रजत जयंती (रौप्य महोत्सवी) उत्सवाचे उद्घाटन आता आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलाडी येथे भव्यतेने करण्यात आले आहे. यासह, अद्वैताच्या भूमीत डिसेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या वर्षभराच्या उत्सवांना सुरुवात झाली आहे.