
अध्यात्माची पाऊलवाट चालताना, कीर्तन हे राष्ट्राच्या उत्कर्षाचे साधन आहे, हा विचार मांडत प्रबोधन करणाऱ्या धृव पटवर्धन यांचा जीवनप्रवास...‘‘भारतातील युवा हे भारताचे बलस्थान आहे,” असे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कायम सांगत असत. आपल्या युवकांना योग्य ते मार्गदर्शन लाभलं आणि त्यांना संधी उपलब्ध करून दिली की, ते राष्ट्राच्या उन्नतीसाठी दिवसरात्र तपस्या करतील, असा त्यांना विश्वास होता. २१व्या शतकातील भारताने त्यांचा हाच विश्वास सार्थ करून दाखवला. तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते कला आणि क्रीडा क्षेत्रापर्यंत भारत आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हाच विचार मनात ठेवून येणार्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत भारत विश्वबंधुत्वाचा विचार जगासमोर ठेवत आहे. युवाशक्तीला जर राष्ट्राच्या उत्कर्षाची आणि अध्यात्माची आंतरिक ओढ लागली, तर त्या राष्ट्राच्या प्रगतीला कुणीही थांबवू शकत नाही. हाच विचार मनात ठेवून प्रबोधनाचा, अध्यात्माचा वारसा सांगण्यासाठी लोकांसमक्ष उभे राहणारे युवा कीर्तनकार म्हणजे धृव पटवर्धन!
समर्थकृपेचा आशीर्वाद लाभलेले धृव पटवर्धन ‘युवा कीर्तनकार’ म्हणून प्रसिद्ध आहेतच, परंतु त्याचसोबत युवा लेखक म्हणूनसुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख अभिमानाने केला जातो. माणसाच्या जीवनात ‘स्व’चा बोध होण्याआधी त्याला अनेक यातनांमधून जावं लागतं. धृव पटवर्धन यांचा जीवनपट पाहिला, तर असे दिसून येते की, आत्मबोधाच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचण्यासाठीच त्यांना अनेक दिव्यातून जावे लागले. लहानपणीच मातृछत्र हरपल्यामुळे, साहजिकच त्यांच्या कोवळ्या मनाला यातना झाल्या. परंतु, त्या दुःखामुळे आपल्या मुलाने कोसळून जाऊ नये, एककल्ली होऊ नये, असा विचार धृव यांच्या वडिलांनी केला. त्यातूनच पुढे सज्जनगडावरच्या कीर्तन शिबिरात ते सामील झाले. आध्यात्मिक वातावरणात त्यांचं मन शांत झालं आणि त्यांच्या जीवनाला योग्य ती दिशासुद्धा मिळाली. गडावर असतानासुद्धा वेदनेची लाट त्यांची पाठ सोडत नव्हती, अशा वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना समर्थांच्या समोर मोकळं होण्यासाठी रडण्याचा सल्ला दिला. समर्थांच्या समाधीवर आपले अश्रू ढाळल्यानंतर, समर्थांनी त्यांचं मातृत्व स्वीकारल्याची त्यांना प्रचिती आली.
श्रवणाच्या माध्यमातून त्यांची आध्यात्मिक बैठक इतकी पक्की झाली, की अल्पावधीतच सज्जनगडावर होणार्या चक्री कीर्तनात त्यांनी कीर्तन केले. या आध्यात्मिक बैठकीसोबतच शिक्षणाचा प्रवाससुद्धा समर्थपणे सुरू ठेवला. सातार्याच्या के. एस. डी. शानभाग विद्यालयातून त्यांनी त्यांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. ९५ टक्के गुण मिळवून ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. त्याच महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना महाविद्यालयात आणि के. बी. पी. विश्वविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून दिली. सध्या त्यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असून, त्यांच्या शिक्षणाचा ध्यास तसुभरसुद्धा कमी झालेला नाही.
कीर्तन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात हातात हात घालून सुरू आहेत. याबद्दल आपले मत व्यक्त करताना ते म्हणतात की, "शिक्षण, वाचन आणि अभ्यासामुळे एखादा विषय मला समजून घेता येतो; तर कीर्तनामुळे तो विषय मी श्रोत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतो.” शिक्षण या विषयाचे त्यांचे समग्र आकलन आपल्याला यातून लक्षात येते.
धृव पटवर्धन यांच्या मते, त्यांच्या घरावर संतकृपा आहे. फलटणचे प. पू. श्री गोविंद काका उपळेकर यांची विशेष कृपा त्यांचे आजोबा दत्तात्रय पटवर्धन व आजी विजया पटवर्धन यांना लाभली आहे. युवा कीर्तनकार धृव पटवर्धन यांनी आतापर्यंत २०० हून अधिक केलेल्या कीर्तनसेवादेखील याच गुरुकृपेमुळे शय झाल्या. त्याचबरोबर कौतुकास्पद बाब म्हणजे, इंदोर आणि गुरुकुंज मोझरी येथे झालेल्या कीर्तन स्पर्धेत त्यांनी बक्षिसे मिळवली. अध्यात्माच्या बैठकीमध्ये तयार झालेल्या त्यांच्या आवाजाने पुढे सातारा, छत्रपती संभाजीनगर, हिंदवी रेडिओ, रयतवाणी या माध्यमातून त्यांच्या मुलाखती प्रक्षेपित झाल्या. यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा आणखी एक क्षण आला तो म्हणजे ‘प्रधानमंत्री युवा योजना!’
‘प्रधानमंत्री युवा योजने’अंतर्गत आलेल्या १६ हजारांहून अधिक पुस्तक प्रस्तावांतून निवडलेल्या ७५ प्रस्तावांमध्ये धृव पटवर्धन यांची निवड झाली. अज्ञात क्रांतिकारक डॉ. वा. वी. आठल्ये यांच्या जीवनावरील ‘वासुदेव विश्वनाथ आठल्ये-जीवन दर्शन’ हे त्यांचे पुस्तक ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत’ यांच्यातर्फे प्रकाशित झाले.
यातील विशेष बाब म्हणजे, केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतभर या पुस्तकाचे कौतुक झाले. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे घेण्यात येणार्या ‘फेस्टिवल ऑफ लायब्ररीज’ या दिल्लीत होणार्या कार्यक्रमात आपल्या लेखनाचा प्रवास मांडायची त्यांना संधी मिळाली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. त्याचप्रमाणे दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीत झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
त्याचप्रमाणे ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत’ यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणार्या ‘पुस्तक संस्कृती’ या द्वैमासिकात ‘बिळाशी जंगल सत्याग्रह’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’, ‘लीलावती’ या विषयांवर हिंदीमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहे. तसेच ‘मी सावरकर’ इत्यादी अनेक वक्तृत्व स्पर्धांचे ते विजेते आहेत. वक्तृत्वाबरोबरच लेखणीतून त्यांनी आपल्या शब्दांच्या सामर्थ्याचे लोकांना दर्शन घडवून आणले आहे. अध्यात्म आणि शिक्षण हा धृव यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या मते, कीर्तन हा आत्म-उद्धाराचा आणि राष्ट्र-उद्धाराचा मार्ग आहे. अध्यात्मामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला हवे. आताच्या घडीला अनेक युवक आणि युवती सोशल मीडियाच्या स्टेटसवर देवाचे फोटो, गाणी ठेवतात. मात्र, यापेक्षा महत्त्वाचं आहे, भगवंताचे, अध्यात्माचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणे. आपले कर्म पूर्ण करून आपल्यात चांगले गुण वृद्धिंगत करत राहणे म्हणजेच अध्यात्माच्या जवळ जाणे आहे, असे धृव पटवर्धन यांचे म्हणणे आहे. अशा या अनमोल ‘धृव तार्या’ला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!