गणेश दर्शनाचे औचित्य; निवडणूकीचे बिगुल वाजण्याआधीच कट्टर प्रतिस्पर्धींचा एकत्र संवाद - विरोधकांसह मित्रपक्षांना आश्चर्याचा दे धक्का

03 Sep 2025 12:36:10

डोंबिवली,
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या घरी गणेशोत्सवाला हजेरी लावून बाप्पाचे दर्शन घेतले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले चव्हाण आणि म्हात्रे एकत्र आल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेले चव्हाण आणि म्हात्रे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कोणते नवे राजकीय समीकरण बघायला मिळणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये केडीएमसीचा समावेश आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे गणेश उत्सवादरम्यान नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत. केडीएमसीच्या प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबर पर्यत हरकती सूचना घेण्याची अंतिम मुदत आहे. निवडणूकीचे बिगुल वाजल्याने सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांकडून आपल्या जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले जात आहे. महापौर पदांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपाकडून आपल्याच पक्षाचा महापौर होईल असा दावा केला जात आहे. तर शिवसेनेकडून महायुतीचा महापौर असेल असा दावा केला जात आहे. सध्या तरी दोन्ही पक्षांकडून महायुतीत निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे. पण युती होणार की नाही हे येत्या काळात समजेल.

यंदाची निवडणूक ही पॅनल पध्दतीने होत आहे. एका पॅनलमध्ये चार उमेदवार असणार आहेत. प्रभाग रचनेचा अभ्यास करून आपल्या सोयीच्या प्रभागात इच्छुकांकडून प्रवेश केला जात आहे. त्यामुळे प्रभागरचना जाहीर होताच पक्षप्रवेशाला वेग आला आहे. कॉग्रेसच्या माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर मनसेमधील काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. येत्या काळात पक्षप्रवेश वाढण्याची देखील शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात दिपेश म्हात्रे हे देखील भाजपा मध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना उधाण आले होते. त्यातच चव्हाण यांनी म्हात्रे यांच्या घरी गणेशोत्सवाला भेट दिल्याने ही चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात म्हात्रे भाजपामध्ये प्रवेश करणार का ? की आणखी कोणती राजकीय समीकरणे पाहायला मिळणार हे पाहावे लागणार आहे.


Powered By Sangraha 9.0