
युरोपीय ख्रिस्ती धर्मामधील ‘ईश्वर’ संकल्पना आणि तिला झालेला विरोध हा ईश्वराच्या दोन प्रमुख गुणांविषयी होता. त्यातील पहिला म्हणजे ईश्वर हा विश्वाचा निर्माता आणि नियंता असणे. यातून निर्माण होणारे वैश्विक सुरचना तत्त्व आणि त्याचा प्रतिवाद आपण मागील भागात पाहिला. दुसरा गुण म्हणजे, ईश्वर हा न्यायाच्या तत्त्वाचा प्रणेता असणे. या संकल्पनेचा धर्मामध्ये अभिप्रेत अर्थ, त्याच्या प्रतिवादातून निर्माण झालेली नास्तिकतेची आणि मानवी नीतितत्त्वांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी वसाहतवादी चिंतनासाठी विशेष महत्त्वाची आहे. याचे एक महत्त्वाचे कारण प्रत्यक्ष राजकीय वसाहती नष्ट झाल्यानंतर जी राष्ट्रांची एक जागतिक मांडणी आज उदयास आली आहे, तिच्या मुळाशी यातीलच काही तत्त्वांचा आधार आहे. त्यामुळे आजच्या काळात ‘वैचारिक वसाहतवाद’ कशा प्रकारे आपला प्रभाव टिकवून आहे, त्याच्या समग्र आकलनासाठी त्याचे क्रमशः ऐतिहासिक विकसन समजून घेणे आवश्यक आहे.न्याय किंवा नीतितत्त्वे यांचा नेमका आधार काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न इतिहासातील सर्वच तत्त्ववेत्त्यांनी केला. मनुष्याने सद्गुणी का असावे आणि सद्गुण हे माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती दर्शवतात का किंवा दुराचाराकडे न वळता सदाचाराचे आचरण ठेवण्यासाठी आवश्यक नैसर्गिक प्रेरणा कोणत्या, हे प्रश्न सर्वच प्रमुख चिंतनप्रणालींमध्ये हाताळले गेलेले आहेत. प्राचीन युरोपच्या ग्रीक परंपरेतील प्लेटोची अदृश्यतेची अंगठी आणि त्याआधारे केलेले नीतिमत्तेचे विश्लेषण प्रसिद्ध आहे. विविध चिंतने नीतिमत्तेचे मूळ मानवी वर्तनात शोधत असताना, धर्माच्या परंपरेने मात्र एक सर्वथा वेगळे उत्तर या प्रश्नासाठी दिले. हे उत्तर म्हणजे, ‘ईश्वरी न्याय’ आणि ‘न्यायी ईश्वर’ ही संकल्पना.
धर्माच्या मांडणीनुसार ‘न्याय’ संकल्पनेचे मूलतत्त्व ईश्वर हे आहे. ईश्वर त्याच्या विचारातून आणि कृतीतून न्याय कोणता आहे, ते स्पष्ट करतो. त्यामुळे ईश्वरी इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे सदाचार आणि न्यायी ईश्वर अशा प्रकारचे वर्तन असणार्या सर्व लोकांचे परलोकी कल्याण करतो. इथे दोन बाबी नीट लक्षात घ्यायला हव्यात. पहिले म्हणजे न्यायी असणे, हे ईश्वर तत्त्वाचे एक लक्षणच आहे. त्यामुळे ‘न्याय’ ही एक कोणती तरी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ‘ईश्वर’ त्या व्यवस्थेनुसार वागतो, अशी कल्पना चुकीची आहे. त्याउलट न्यायी वागणे हे ईश्वरासाठी अंगभूत असल्याने आणि तो सर्वज्ञानी असल्याने तो वागेल तसे वागणे, म्हणजे न्यायाचे. दुसरे म्हणजे ईश्वराच्या चिंतनाचे व वर्तनाचे ज्ञान मर्त्य मानवांना कसे होणार, तर त्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराच्या प्रेषिताने सांगितलेला आणि धर्माच्या पुस्तकांतून सांगून ठेवलेला ईश्वरी संदेशांचा.
युरोपमध्ये प्रोटेस्टंट पंथाच्या आणि पुनरुज्जीवन चळवळीच्या उदयापासून जी धर्माची चिकित्सा होऊ लागली, त्यात प्रधानतत्त्व हे तर्कप्रामाण्याचे होते. या तर्कप्रामाण्याचाही आधार धर्मामध्ये आहे. भारतीयांसाठी तर्क हे अनेक प्रमाणांपैकी एक असल्याने त्याचा आधार काय, याची चिकित्सा आपण करत नाही. परंतु, धर्माच्या चौकटीत पाहिल्यास या विश्वाची निर्मिती ईश्वराने मानवी उपभोगासाठी केलेली असल्याने या विश्वातील सर्व विषय मानवासाठी बुद्धिगम्य असायला हवेत. बुद्धीचा आधार म्हणजे तर्क. अशा प्रकारे युरोपातील तर्कप्रामाण्य हे धर्माच्या चौकटीनुसार ‘ग्राह्य’ असे होते. स्वाभाविकपणे ईश्वरी न्यायाचे आकलन तर्काच्या आधारे मानवास होणे हे शय कोटीतले आहे, असे मानून त्याचे दैनंदिन अनुभवांच्या आधारे विश्लेषण सुरू झाले. यातील सर्वांत पहिले चिंतन पुन्हा एकदा आपल्याला थॉमस अक्विनासकडे घेऊन जाते. त्याने तर्काचा अधिष्ठाता ईश्वर असल्याचे प्रतिपादन करून ईश्वराच्या सर्व कृतींमध्ये तार्किक सुसंगती असल्याची मांडणी केली. तार्किकदृष्ट्या सुसंगत आणि म्हणूनच अपरिवर्तनीय अशा ईश्वरीय कायद्याची निर्मिती स्वतः ईश्वराने केलेली आहे. जुन्या व नव्या कराराद्वारे या कायद्याचे एक मूर्त स्वरूपही त्याने मानवांना दिलेले आहे. त्यामुळे न्यायाचा आधार हा ईश्वरीय कायदाच असू शकतो, असे अक्विनासचे म्हणणे होते. देकार्तने त्याला ईश्वरीय दयाळूपणाची जोड दिली. ईश्वर सर्वज्ञानी आणि स्वयंपूर्ण असल्याने त्याच्या कायद्यात अन्यायाला जागा असू शकत नाही. कायदा हा फक्त दुराचारी लोकांना शासन असा नसून सदाचारी लोकांना त्यांच्या सद्वर्तनाचे बक्षीसही मिळवून देणारा आहे.
या ईश्वरी न्यायाच्या तत्त्वाला किंचित धक्का दिला, तो इमॅन्युएल कांट याने. तर्कप्रामाण्य आणि मानवांतील बरोबरीचे आणि जशास तसे या व्यवहारांचे तत्त्व मान्य केल्यास नीतितत्त्वांची एक संरचना उभी राहते, असे प्रतिपादन कांट याने केले. या प्रतिपादनात ईश्वर तर्काचे मूळ म्हणून उपस्थित तर होता, पण पुढील सर्व व्यावहारिक मांडणीत ईश्वराला काही स्थान नव्हते. ईश्वरी न्यायाच्या संदर्भात ही एक प्रकारे अज्ञेयवादी मांडणी होती. याच काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीचा आधार घेऊन मानवी बुद्धीच्या तर्कप्रधानतेचा आधार ईश्वरी तत्त्व नाही, तर तो बुद्धीचा सहज स्वभाव आहे, ही मांडणी अज्ञेयवादाच्या पुढच्या टप्प्यात होणे स्वाभाविक होते. मानवी नीतिमत्ता ही मानवातील परस्पर व्यवहार सुरळीतपणे चालू राहावेत, या एकमेव उद्दिष्टाने निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी कोणत्याही ईश्वरतत्त्वाची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन निरीश्वरवादी द-होलबाख प्रभृतींनी करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रबोधन काळात घडलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीने न्यायाच्या तत्त्वात सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षा आणि व्यवहार यांचा संगम घडवून न्यायाचा संबंध स्वातंत्र्य आणि लोकेच्छा यासारख्या तत्त्वांशी जोडला. व्हॉल्टेअर आणि रुसो यांच्या न्याय संकल्पनेत ईश्वर तर होता, परंतु कांटच्या मताप्रमाणेच त्याची आवश्यकता मर्यादित होती आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ईश्वरीय न्याय जाणून घेण्यास प्रीस्टवर्गाची आवश्यकता नव्हती. नवीन उदय झालेला ‘तिसरा वर्ग’ न्यायाचे तत्त्व जाणून घेण्यास स्वतःच समर्थ होता.
ईश्वरी न्यायाच्या तत्त्वाची चर्चा खरे तर नास्तिकता आणि अज्ञेयवाद यांच्या संदर्भात इथेच थांबवायला हरकत नाही. कारण, प्रबोधन काळाच्या शेवटापर्यंत ईश्वरविरहित न्याय आणि सदाचाराची संकल्पना मानवी तर्कप्रधानतेच्या तत्त्वावर प्रतिष्ठित करता येते, हे अनेक विचारवंतांनी दाखवून दिलेले होते. मानवी समाज काही विवक्षित मूलतत्त्वांच्या आधारे परस्पर सहकार्याने प्रगती करत राहावा, यासारखी संपूर्णपणे ऐहिक उद्दिष्टे गृहीत धरून मानवी कायद्याची व न्याय संकल्पनेची पूर्ण सुसंगत व्याख्या करणे शय आहे, हे तार्किकरित्या मान्य झाले होते. मात्र, कांटच्या कर्तव्यांना बांधील अशा नीतितत्त्वांच्या कल्पनेनंतरची जी पुढच्या टप्प्यातील वैचारिक मांडणी युरोपमध्ये झाली, तिचा परिचय सांस्कृतिक वसाहतीकरणाच्या यथार्थ आकलनासाठी आवश्यक आहे. यातील पहिला प्रमुख प्रवाह म्हणजे उपयुक्ततावादाचा. वैयक्तिक उपयुक्ततावादाचे तत्त्व जरी हॉब्स आणि ह्यूम यांनी प्रबोधनकाळात मांडले असले, तरी त्याचा बेन्थॅमने सामाजिक किंवा सामूहिक उपयुक्ततावादात विकास केला. न्यायाच्या तत्त्वाचे केंद्र बेन्थॅम आणि त्यानंतर मिल यांच्या मांडणीतून व्यक्तीवरून समाजाकडे झाले. न्यायाचे तत्त्व व्यक्तीचे आदर्श आचरण कसे असावे, या प्रकारचे न राहता, त्या आचरणाचा संपूर्ण समाजाच्या धारणेवर कशा प्रकारचा प्रभाव पडतो, यावर अवलंबित झाले. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाचा एक परिणाम म्हणजे, या काळात सामाजिक शास्त्रांमध्येही गुणात्मक संकल्पनांऐवजी परिमेय संकल्पनांचे महत्त्व वाढू लागले होते. त्यामुळे ही सामाजिक उपयुक्तता मोजणे आणि त्याआधारे मानवी वर्तणुकीतील योग्यायोग्यता निश्चित करणे, असा विचार पुढे आला. स्वाभाविकपणे सामाजिक सौख्याची जागा सामाजिक समृद्धीने घेतली. आजच्या जगात आपण कोणत्याही विषयाच्या इष्टानिष्टतेची चर्चा त्याच्या अर्थराजकीय नफ्यातोट्याच्या संदर्भात करतो, त्याचे मूळ हे सामाजिक उपयुक्ततावादात आहे.
न्यायाचे तत्त्व ऐहिक प्रेरणांवर आधारित करण्याच्या तत्त्वज्ञानाची पुढची पायरी दुसर्या बाजूने गाठली, ती नीत्शेप्रणित संपूर्ण निरीश्वरवादाने. या प्रणालीने ईश्वराचे अस्तित्व तर नाकारलेच, पण तर्क वा बुद्धिगम्य आणि त्यामुळे अपरिवर्तनीय अशा न्यायाच्या तत्त्वांचेही अस्तित्व नाकारले. या प्रणालीनुसार निरपेक्ष न्याय असे काही नसून व्यक्तींमधील परस्परसंबंध आणि व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंध न्यायाची परिभाषा ठरवतात. हे संबंध बरेचदा ‘बळी तो कान पिळी’ किंवा ज्याला ‘मात्स्यन्याय’ असे संबोधले जाते, अशाच प्रकारचे असतात. परंतु, त्यांना तत्त्वज्ञानाचा मुलामा चढवून तेच योग्य कसे आहेत, अशी मांडणी केली जाते. या प्रणालीचे एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे संदर्भहीन संपूर्ण सत्य असे काही नसते, तर कोणत्याही तत्त्वाविषयी त्याच्या विशिष्ट संदर्भांमध्येच योग्यायोग्यतेचे निदान करता येऊ शकते. बंधनविहीनतेच्या तत्त्वाला एक प्रकारे तात्त्विक मुलामा देण्याचे काम या नीत्शेप्रणित आणि नंतर सार्त्र, काम्यू इत्यादींनी प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाने केले. आजच्या जगात ज्यास ‘सत्योत्तर मांडणी’ (पोस्ट ट्रुथ) म्हटले जाते, त्याचा मूलविचार या न्यायाच्या नवीन मांडणीतून झालेला आहे.
‘न्याय’ विषयाची मांडणी हिंदू विचारात ‘ऋत’ आणि ‘धर्म’ या संकल्पनांच्या चर्चेतून सुरू होते. पृथ्वीवरील मानवी न्यायाचे तत्त्व एका वैश्विक न्यायाच्या तत्त्वावर आधारित आहे, ज्यास आपण ‘ऋत’ असे म्हणतो. या वैश्विक ऋताचे ऐहिक जगतातील रूप म्हणजे ‘धर्म’, ज्याच्या पालनाने संपूर्ण सजीव सृष्टीची धारणा होते. हे धर्मतत्त्व स्वयंभू असून त्यास ईश्वराचा आधार आवश्यक नाही, तर त्याउलट धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी भगवंताने आवश्यक तसे अवतार घेणे हे त्याचे कार्यच आहे. धर्मातसुद्धा शाश्वत धर्म, नैमित्तिक धर्म आणि आपद्धर्म असे प्राधान्यविग्रह आहेत. वेद-उपनिषदे-पुराण-इतिहास या सर्वांच्या मांडणीतून धर्माची एक व्यामिश्र समज भारतीय मनास स्वाभाविकपणे उत्पन्न होत असते. मात्र, तर्कप्रधान मार्गाने आणि गणिती अचूकतेने न्यायाची तत्त्वे निश्चित करता यावीत, असे मुळात भारतीय समाजाचे आकलन नाही.
अशा प्रकारे ईश्वरी सुरचनेचे तत्त्व आणि न्यायाचे तत्त्व, या दोन्ही तत्त्वांच्या आधारे जे ईश्वरतत्त्वाचे आकलन अब्राहमिक धर्मामध्ये आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जे निरीश्वरवादी आणि अज्ञेयवादी तत्त्वज्ञान युरोपात विकसित झाले, त्या दोन्हींची आवश्यकता भारतीय समाजासाठी गैरलागू आहे. स्वाभाविकपणे धर्मविषयक वरवरची साम्ये गृहीत धरून त्याच्या विरोधातील तत्त्वज्ञानांचे भारतीय समाजावरील आरोपणही चुकीचे ठरेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, या विचारधारांमधून पुढे आलेल्या ऐहिकतावाद आणि सत्योत्तरवादाच्या ज्या नवीन विचारधारा आहेत, त्या ईश्वरविचारातून मुक्त असल्याने सर्व जागतिक समाजास लागू असल्याचा जो सार्वत्रिक समज आहे, तो या संकल्पनांच्या वैचारिक पार्श्वभूमीचे आकलन करून घेतल्याशिवाय निर्माण झालेला आहे. भिन्न समाजांचे भिन्न सांस्कृतिक आकलन त्यांना आवश्यक चिंतनाची संदर्भचौकट निर्माण करते, याची जाणीव आणि मान्यता आज प्राथमिकतेने आवश्यक आहे.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३