‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ने नक्षलवाद्यांचा कणा मोडला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

03 Sep 2025 17:22:59

नवी दिल्ली,  केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस, डीआरजी व कोब्रा दलाच्या जवानांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.

कर्रेगुट्टालू टेकडीवर झालेल्या या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी कारवाईत जवानांनी दाखवलेल्या शौर्यास नक्षलविरोधी लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदले जाईल, असे शाह यांनी सांगितले. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. सर्व नक्षलवाद्यांनी शरण यावे, पकडले जावे किंवा संपवले जावे, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारने ठेवले आहे. कडाक्याच्या उन्हात, डोंगराळ भागातील कठीण परिस्थितीत आणि प्रत्येक पावलावर आयईडीचा धोका असतानाही जवानांनी अत्यंत मनोबलाने ही कारवाई यशस्वी केली. कर्रेगुट्टालू टेकडीवरील नक्षलवाद्यांचे तळ, साहित्यसाठा व पुरवठा साखळी जवानांनी धाडसाने नष्ट केली, याकडे केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले

शाह यांनी नमूद केले की, नक्षलवाद्यांनी देशातील मागास भागात मोठे नुकसान केले आहे. शाळा-बाह्य शिक्षण, आरोग्यसेवा आणि सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही. परंतु, गेल्या काही वर्षांत चालवलेल्या कारवायांमुळे पशुपतिनाथ ते तिरुपती या परिसरातील तब्बल ६.५ कोटी लोकांच्या आयुष्यात नवा सूर्योदय झाला आहे. तसेच नक्षलविरोधी कारवायांत गंभीर जखमी झालेल्या जवानांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.


Powered By Sangraha 9.0