नवी दिल्ली, भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान डेविड वेडफुल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. हैदराबाद हाऊस येथे झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी, वैज्ञानिक सहकार्य आणि व्यापारिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
या भेटीपूर्वी जर्मन परराष्ट्र मंत्री वेडफुल बेंगळुरू येथे पोहोचले होते. त्यांनी तेथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चा दौरा करून भारताच्या तंत्रज्ञान व अवकाश क्षेत्रातील प्रगतीची माहिती घेतली.
डॉ. जयशंकर यांनी वेडफुल यांच्या भारत आगमनाचे स्वागत करताना सांगितले, भारत-जर्मनी २५ वर्षांची धोरणात्मक भागीदारी, ५० वर्षांचा वैज्ञानिक सहयोग, जवळपास ६० वर्षांचे सांस्कृतिक करार आणि शंभर वर्षांहून अधिक व्यावसायिक संबंध साजरे करत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याच्या संधींचा आढावा घेण्यासाठी बेंगळुरू दौरा महत्त्वाचा ठरेल.
युरोपियन युनियनसोबत भारताचे संबंध मजबूत करण्यात जर्मनीची भूमिका महत्त्वाची असल्याचे जयशंकर यांनी अधोरेखित केले. भारत आणि जर्मनी यांच्यात बहुआयामी सहकार्याचा इतिहास आहे. आजची चर्चा द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत जर्मनीचे परराष्ट्र मंत्री वेडफुल यांनी मुक्त व्यापार कराराबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, आम्ही मुक्त व्यापार राष्ट्र आहोत आणि भारतासोबतचा मुक्त व्यापार करार आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. युरोपियन युनियन या संदर्भात काम करत असून लवकरच यश मिळेल, याचा आम्हाला विश्वास आहे. या प्रक्रियेत जर्मनी पूर्णपणे भारताच्या पाठीशी उभा राहील.
भारत आणि जर्मनीसारख्या लोकशाही देशांमध्ये स्वाभाविक आघाडी असल्याचे वेडफुल यांनी नमूद केले. या शतकातील आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आकार देण्यात भारताची निर्णायक भूमिका आहे. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी आणि नियमाधारित जागतिक व्यवस्था टिकवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करावे लागेल, असे ते म्हणाले.