"धारावीकर नवरा नको ग बाई!" ; लग्नासाठी धारावीला तरुणींची नापसंती - वधू-वर सूचक मंडळांची धक्कादायक माहिती

03 Sep 2025 10:53:59

मुंबई, आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील तरुणांपुढे गेल्या काही वर्षांपासून नवे संकट उभे राहिले आहे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक तरुणांना 'वधू' शोधण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धारावीत सक्रिय असणाऱ्या विविध वधू-वर सूचक मंडळांकडून (मॅरेज ब्युरो) मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर धारावीत संसार थाटायला बहुतांशी तरुणींचा नकार असल्याने स्थानिक तरुणांच्या 'शुभमंगला'चा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. दाटीवाटीची वस्ती, गरीबी, मूलभूत सुविधांची वानवा आणि दैनंदिन संघर्षामुळे गावाकडच्या आणि छोट्या शहरांमधल्या मुलीदेखील लग्नासाठी धारावीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.

स्थानिक पातळीवर वधू-वर सूचक मंडळाचे काम करणाऱ्या डी सेल्विन नाडर यांच्या मते, चित्रपट आणि सोशल मीडियातून धारावीची काळी बाजू मोठ्या प्रमाणात दाखवली जाते. त्यामुळे इथले सगळे तरुण 'बिघडलेले' असल्याचा समज पसरला आहे. "आजच्या तरुणींच्या मनात त्यांच्या भावी नवऱ्याची प्रतिमा तयार असते. नवरा मुलगा सुशिक्षित, सुसंस्कृत, मृदु भाषिक आणि समाजात प्रतिष्ठा असणारा असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. असा सर्वगुणसंपन्न वर धारावीत सापडणारच नाही, असा समज (अथवा गैरसमज म्हणुया) तरुणींनी करून घेतला आहे. त्यामुळे बोहल्यावर चढायला उत्सुक असलेल्या धारावीतील तरुणांचे लग्नाचे स्वप्न लांबणीवर पडत आहे" अशा शब्दांत डी सेल्विन यांनी वास्तव समोर मांडले.

'उचित वर' शोधताना आता शिक्षण, करिअर आणि प्रतिष्ठित आयुष्य या बाबींना तरुणींकडून प्राधान्य दिले जात आहे. "जॉब करणाऱ्या सुशिक्षित तरुणी आपल्या तोलामोलाचा वर शोधतात आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतील,

अशा ठिकाणी लग्न करतात. धारावीतील बहुतांशी घरांमध्ये स्वतंत्र शौचालय नसून अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांची अवस्थाही फारच बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. अशा दयनीय परिस्थितीत तरुणींना आश्वासक भविष्य दिसत नाही" अशी प्रतिक्रिया बालाजी मॅट्रिमोनीचे संस्थापक पनीर सेल्वम नाडर यांनी दिली.

"कोणतेही आई -वडील आपल्या मुलीचं लग्न अस्वच्छ आणि घाणीचं साम्राज्य असलेल्या ठिकाणी का लावून देतील?" असा सवालही सेल्वम यांनी उपस्थित केला.

धारावीत राहणाऱ्या सरस्वती शिंदे (नाव बदलले आहे) यांनी त्यांच्या भावाची व्यथा मांडली. भावाला चांगली नोकरी असूनही सातत्याने लग्नासाठी नकार पचवावा लागतो आहे. अद्यापही त्यांच्या भावासाठी वधू शोधण्यात कुटुंबाला यश आले नसल्याची कबुली त्यांनी दिली. "लग्न करताना मुलींच्या माफक अपेक्षा असतात, त्या म्हणजे सुरक्षित घर आणि आसपासचे चांगले वातावरण. मात्र, दुर्दैवाने धारावीत या माफक अपेक्षा देखील पूर्ण होताना दिसत नाहीत.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धारावीतील तरुणांवर ' टपोरी ' आणि 'व्यसनी' म्हणून बसलेला शिक्का. वास्तविक, धारावीतील सगळेच तरुण काही वाईट नाहीत. मात्र, धारावी बाहेरच्या जगाने इथल्या तरुणांविषयी जे चुकीचं चित्र उभं केलं आहे, ते सहजासहजी बदलता येणार नाही. यामुळेच धारावीतल्या तरूणांचे 'वधू संशोधन' जिकिरीचे झाले आहे" अशा शब्दांत सरस्वती यांनी तरुणांची कैफियत मांडली.

"आधीच्या पिढीतील लोक इतका विचार करत नव्हते. पण आता तरुणींचा विचार बदलला आहे. होणाऱ्या नवऱ्याची मिळकत कमी असली तरीही चालेल, मात्र होणारं सासर हे स्वच्छ आणि प्रतिष्ठित ठिकाणी असावं, अशी अपेक्षा आजच्या तरुणींची आहे. चांगला वर हवा, मात्र लग्नानंतरचे आयुष्य झोपडपट्टीत व्यतीत करायला नको, अशी तरुणींची भूमिका आहे" असे सेल्विन यांनी सांगितले.

"धारावीतील वास्तव आणि तरुणींची अपेक्षा यातील तफावतीमुळे इथे वधू-वर

सूचक मंडळ चालविणे देखील जिकिरीचे आहे. या व्यवसायातील बऱ्याच जणांनी आता आपला मोर्चा दुसऱ्या व्यवसायांकडे वळवला आहे" अशी खंत नाडर यांनी बोलून दाखवली.

"कदाचित पुनर्विकासानंतर धारावीतील हे चित्र बदलेल. इथल्या घरांमध्ये देखील उच्चशिक्षित वधू संसार थाटतील.या नववधूंच्या पावलांनी धारावीतील घरांमध्ये सुख आणि समृद्धी येईल" असा आशावाद नाडर यांनी व्यक्त केला.



Powered By Sangraha 9.0