दिल्ली दंगल प्रकरण; उमर खालिद, शरजील इमाम यांना पुन्हा जामीन नाकारला

03 Sep 2025 13:19:49

मुंबई
(प्रतिनिधी) : ईशान्य दिल्ली दंगली प्रकरणी २०२० साली अटक झालेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात उमर खालिद व शरजील इमाम यांच्यासह नऊ जणांची जामिनाची मागणी फेटाळली आहे. या यादीत मोहम्मद सलीम खान, शिफा-उर-रहमान, अतहर खान, मीरान हैदर, शादाब अहमद, अब्दुल खालिद सैफी आणि गुलफिशा फातिमा यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नवीन चावला आणि शैलिंदर कौर यांच्या खंडपीठाने सर्व अर्जांवर सुनावणी करून निकाल दिला. न्यायालयाने निर्णय वाचताना स्पष्ट शब्दांत म्हटले, “सर्व अपील खारिज केली जात आहेत.” आरोपींच्या वकिलांनी मांडणी करताना, अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत आणि दीर्घ काळ ते तुरुंगात असल्यामुळे जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरली नाही.

उमर खालिद प्रकरण

उमर खालिदला सप्टेंबर २०२० मध्ये अटक झाली. त्याच्यावर गुन्हेगारी कट, दंगल, बेकायदेशीर जमावबंदी आणि गैरकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. तो गेली चार वर्षे तुरुंगात आहे. पहिली जामिनाची याचिका मार्च २०२२ मध्ये खालच्या न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर खालिदने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, मात्र ऑक्टोबर २०२२ मध्येही त्याला दिलासा मिळाला नाही. यानंतर खालिदने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले होते. मात्र या सुनावणीदरम्यान खालिदची याचिका १४ वेळा पुढे ढकलली गेली. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी परिस्थिती बदलल्याचे सांगत खालिदने स्वतःची याचिका मागे घेतली. त्यानंतर २८ मे २०२४ रोजी खालच्या न्यायालयाने त्याची दुसरी जामिनाची मागणीही फेटाळली. त्यावरूनच उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0