खानिवड्यात श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सवाची ६८ वर्षांची अखंड परंपरा

03 Sep 2025 12:58:14

खानिवडे : वसई तालुक्यातील पूर्व भागात मुंबई–अहमदाबाद महामार्गालगत वसलेल्या खानिवडे गावातील श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव यंदा ६८व्या वर्षात पदार्पण करत आहे. सन १९५८ पासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांच्या सहभागातून अखंड टिकून आहे.

त्या काळी महामार्ग नसल्यामुळे गावकऱ्यांना दळणवळणासाठी तानसा नदी होडीने पार करावी लागे. दुर्गम मानल्या जाणाऱ्या या भागातील शिकलेले व सुसंस्कारित तरुण एकत्र येऊन श्रीराम मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सवाची परंपरा सुरु झाली.

या उत्सवाचे वैशिष्ट्य असे की, प्रारंभी मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी होते. मात्र मागील अनेक वर्षांपासून कोणतीही पदाधिकाऱ्यांची निवड न करता सर्व गावकरी एकत्रित जबाबदाऱ्या स्वीकारून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.

सध्या हा उत्सव गावातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात साजरा होतो. आरती, भजने आणि पारंपरिक गजराच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. गौरी विसर्जन याबरोबरच बाप्पाचे विसर्जन केले जाते. उत्सव काळात गावातील बालकलाकार नाटक, अभिनय, गायन, नकलांचा कार्यक्रम सादर करतात, तर महिला पारंपरिक गौरी गीतांवर ढोलकीच्या ठेक्यांसह नृत्य करतात.

विशेष म्हणजे, उत्सवासाठी लागणारा खर्च कोणाकडे मागितला जात नाही. गावकरी स्वतःहून पुढे येऊन निधी जमा करतात. अशा या सामूहिक भावनेतून साजरा होणाऱ्या खानिवडे गावातील श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा यंदा ६८व्या वर्षातही उत्साहाने सुरू आहे.


Powered By Sangraha 9.0