Who is Mohsin Naqvi?: भारताने आशिया कप २०२५मध्ये बाजी मारत पाकिस्तानी क्रिकेट संघाला धुळ चारत पाच गडी राखून विजय मिळवला. भारताकडून पाकिस्तानी संघाचा हा सलग पाचवा पराभव आहे. भारताने कुठल्याही सामन्यात पराभव न स्वीकारता आशियाई चषक आपल्या नावे केला. मात्र, हे चषक देण्यासाठी पाकिस्तानचे विद्यमान मंत्री, आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष तथा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) आला होता. भारताविरोधात गरळ ओकणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, असा त्यांचा इतिहास असल्याने भारतीय संघाने नम्रपणे त्यांच्याहातून चषक स्वीकारण्यास नकार दिला.
बीसीसीआयने भारतीय संघाची ही भूमिका यापूर्वीच आयोजकांना कळवली होती. एक देश म्हणून तशी भूमिका घेतल्यानंतर नक्वींने एक पाऊल मागे सरकणे अपेक्षित होते. मात्र, अहंकारात बुडालेल्या नक्वींने मीच चषक देणार, असा अट्टाहास धरल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली. नक्वीच्या या वक्तव्याचे जोरदार चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहे. त्यांनी स्वतःसह पूर्ण देशाचं हसं करून घेतलं आहे.
रविवार, दि २८ सप्टेंबर रोजी सामना पार पडल्यानंतर पुढील ९० मिनिटे हा सर्व खेळ नकवींच्या समोरच सुरू होता. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर विजयानंतर सर्व भारतीय खेळाडू मैदानावर आले. काहींचे कुटूंबीयही मैदानावर दाखल होते. कर्णधार सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याची पत्नी, कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि पत्नी नताशा त्यांच्या दोन मुलींसह उपस्थित होते. यावेळेसच काही अंतरावरच नक्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते. भारताविरोधात भूमिका घेणाऱ्या नकवीकडून चषक स्वीकारणार नाही हे बीसीसीआयने यापूर्वीच कळवले होते. तरीही नकवी मंचावरुन हलले नाहीत.
कोण आहेत मोहसीन नकवी (Mohsin Naqvi)?
मोहसीन नकवी हे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते आशियाई क्रिकेट बोर्डावरही अध्यक्ष आहेत. शाहबाज शरीफच्या सरकारमध्ये नकवी गृह आणि नार्कोटीक्स विभागाचे मंत्री आहेत. नकवीने वारंवार भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम केले आहे. २०२४ फेब्रुवारी रोजी त्यांना पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर अध्यक्ष म्हणून नेमले, याच वर्षी एप्रिलमध्ये त्यांना एसीसीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. मात्र, त्याने तिन्ही पदे आपल्याकडे ठेवली.
आसीम मुनीरचा (Asim Munir) सर्वात जवळचा सहकारी
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या अहवालानुसार, २८ ऑक्टोबर १९८७ मध्ये लाहोरमध्ये नकवीचा जन्म झाला. नक्वी सीटी मीडिया ग्रुपचे अध्यक्ष आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख आसीम मुनीर आणि पीपीपी नेता आसीफ अली जरदारी यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. जानेवारी २०१४ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत पाक पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. पाक पंजाबचा तो खासदारही आहे.
वादग्रस्त वक्तव्यासाठी आहे ओळख
मोहसीन नकवीने गेल्या काही दिवसांत सोशल मीडिय़ावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो विमान क्रॅश होण्याची नक्कल करत गोल केल्याचा आनंद साजरा करत असल्याची एक पोस्ट होती. भारताची एकूण सहा विमाने आपण पाडल्याचा खोटा दावा या पोस्टमध्ये त्याने केला होता. यानंतर पाकिस्तानचा वादग्रस्त गोलंदाज हारिस रौफने २१ सप्टेंबरच्या सामन्या दरम्यान अशाच प्रकारचा इशारा केला होता. त्यानंतर त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता. भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवनेही याला प्रत्युत्तर म्हणून विजयानंतर कुठल्याही पाकिस्तानी खेळाडूशी हस्तांदोलन करण्याचा निर्णय घेतला नाही. ज्यामुळे नक्वींचा तीळपापड झाला होता.