मुंबई : उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये केली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांचे सगळे उध्वस्त झाले आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची. मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना दिला पाहिजे. तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना व्यक्त करायला अर्थ असेल."
नुसताच थयथयाट अन् कांगावा
"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार, नुसताच थयथयाट अन् कांगावा असतो. त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणे तर सामनातून चालूच असते की?" असा खोचक टोलाही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.