थलापती विजयच्या रॅलीत 'त्या' कारणाने झाली चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा वाढला

29 Sep 2025 17:02:54


मुंबई : RCB च्या विजयरॅलीतील चेंगराचेंगरीच्या गंभीर घटनेनंतर दक्षिण भारतात पुन्हा एकदा असाच वाईट प्रसंग घडला. तमिळनाडूच्या करूर येथे शनिवारी (२७ सप्टेंबर) रात्री अभिनेता ते नेते बनलेला थलापती विजय याची रॅली सुरु होती. मात्र या घटनेनं इतकं भयावह रुप धारण केलं की संपूर्ण देशभरातून यावर शोक व्यक्त केला जात आहे. आपल्या आवडत्या सुपरस्टारला जवळून पाहण्याच्या उत्साहात लोकांमध्ये अशी चढाओढ झाली की गर्दी अनियंत्रित झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यत ४० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

दरम्यान ही इतकी गर्दी का उसळली आणि त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत का झालं याचं खरं कारण समोर आलं आहे. अभिनेता थलापती विजय याच्या या महारॅलीत गर्दी इतकी प्रचंड होती की काही लोक विजय यांची एक झलक पाहण्यासाठी झाडाच्या फांद्यांवर चढले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यापैकी काही लोक झाडाच्या फांदीवरून खाली पडले आणि विजय यांच्या प्रचार व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या लोकांवर कोसळले. तिथूनच अचानक गोंधळ सुरु झाला. गर्दीत काहीतरी मोठा अपघात झाल्याची भीती पसरली आणि लोक इकडे-तिकडे पळू लागले. काही क्षणातच तिथे चेंगराचेंगरी झाली. स्वत:चा जीव मूठीत घेऊन पळताना काही लोक जमिनीवर पडले.

याशिवाय आणखीही गंभीर कारण समोर आलं आहे.

याविषयी तमिळनाडूचे डीजीपी जी. वेंकटरामन यांनी मध्यरात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, रॅलीसाठी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी होती, पण विजय यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर दुपारी १२ वाजता येण्याची घोषणा झाली होती. यामुळे लोक सकाळी ११ वाजल्यापासूनच रॅली स्थळावर जमू लागले होते. मात्र, विजय सायंकाळी ७:४० वाजता पोहोचले.

डीजीपी म्हणाले, ‘लोक तासन्तास ऊनात अन्न-पाण्याशिवाय वाट पाहत होते. यामुळे गर्दी अस्वस्थ झाली. आमचा कोणाला दोष देण्याचा हेतू नाही, पण बराचवेळ प्रतीक्षा आणि गर्दीच्या संख्येमुळे परिस्थिती बिघडली.’ पोलिसांच्या मते, आयोजकांनी १०,००० लोकांची परवानगी घेतली होती, पण सुमारे २७,००० लोक जमले. वाढत्या गर्दीसमोर परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही.

सुपरस्टार विजयची झलक पाहण्याचे स्वप्न पाहणारे हजारो लोक कधीच विचार करू शकले नसते की ही रॅली इतक्या वेदनादायक शोकांतिकेत बदलेल. पोलिसांनी या प्रकरणी विजय यांच्या (TVK) विरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी TVK च्या दोन वरिष्ठ नेत्यांवर, एन. आनंद आणि सीटी निरमल कुमार यांच्यावर गैरहत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कुमार हे TVK च्या करूर जिल्हा युनिटचे सचिव आहेत. या रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याच हातात होती. आतापर्यत ४० लोकांना या दुर्दैवी घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. या मृतांमध्ये १७ महिला, १३ पुरुष, ५ मुले आणि ५ मुलींचा समावेश आहे. तसेच या अपघातात ६० हून अधिक लोक जखमी झाले असून अनेक रुग्णालयात जीवनासाठी झुंज देत आहेत. संपूर्ण देशभरातून घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.


Powered By Sangraha 9.0