जगण्यात आनंदाचे रंग भरणारी अनोखी ‘थेरपी’

    29-Sep-2025
Total Views |

आजचे धकाधकीचे जीवन, बदललेली जीवनशैली यांमुळे अनेक नव्या आजारांची भर पडली आहे. अनेक मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागत आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकांना ‘म्युझिक थेरपी’ कमालीची उपयुक्त ठरली आहे. भिन्न वयोगटांना ‘म्युझिक थेरपी’ देणाऱ्या संंगीत विशारद सिद्धी पटवर्धन जशा गायिका आहेत, तशाच लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘थेरपी’ने तणाव दूर करून अनेकांच्या जगण्यात आनंदाचे रंग भरले आहेत.


कला आयुष्याला वळण देते, जगण्याला बळ देते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिद्धी पटवर्धन. बालपणीच आजोबांकडून संगीत वारसा लाभलेल्या सिद्धी यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून संगीत साधनेला सुरुवात केली. या संगीत साधनेचा अखंडित झरा ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’तून ‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विशारद पूर्ण’ व ‘एम.ए. मराठी’पर्यंत सिद्धी यांनी वाहता ठेवला. ‘विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान’चा दोन वर्षांचा नाट्यसंगीत पदविका अभ्यासक्रम व ‘नेटभेट पुणे केंद्रा’तून दोन वर्षांचा संपूर्ण संगीतोपचार अभ्यासक्रम (म्युझिक थेरपी सर्टिफिकेट कोर्स) पूर्ण करेपर्यंत सिद्धी थांबल्या नाहीत.

हेे धडे गिरवताना एकीकडे शिक्षण, तर दुसरीकडे संगीत यांचा मेळ घालताना सिद्धी यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यातूनही सिद्धी यांनी आपले ‘एम.ए. मराठी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज त्या लेखिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

संगीत म्हटले की नुसते गाणे आणि प्रसिद्धी मिळवणे, हीच संकल्पना रूढ होताना दिसत आहे. परंतु, संगीत हे प्रसिद्धीचे माध्यम नाही, तर ती एक साधना आहे, हा विचार उराशी बाळगून सिद्धी यांनी लिखाणाचे कार्य हाती घेतलेे. प्रामुख्याने शास्त्रीय संगीताचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्यांंनी लेखनातून केले. त्या संगीत मैफिली तसेच पुस्तकांचे परीक्षण करतात. या शास्त्रीय संगीताचा गाभा उलगडून सांगतात. त्यांना अशा लिखाणाचे बाळकडू महाविद्यालयीन जीवनात साहित्याचा अभ्यास करताना मिळाले. आजतागायत त्यांनी संगीतातील वेगवेगळ्या गायक कलाकारांच्या गायनशैलीवर आधारित पुस्तकांचे परीक्षण केले आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि एका अग्रगण्य दैनिकांत त्यांचे आतापर्यंत २५ लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. अतींद्र सरवडीकर लिखित ‘किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह, सदाशिव बाक्रे लिखित ‘दिनरंग : सूरमयी जीवनगाथा’ व डॉ. शिल्पा बहुलेकर लिखित ‘कुमार गंधर्व : एक सृजनयात्रा’ या तीन पुस्तकांची परीक्षणेसुद्धा सिद्धी यांनी केली आहेत.

लेखन करीत संगीत क्षेत्रातही साधना करताना सिद्धी यांना प्रसिद्ध गायकांबरोबर तानपुरासाथ करण्याचेही भाग्य लाभले. त्यानंतर त्यांनी जवळजवळ ७५ हून अधिक शास्त्रीय गायकांसाठी तानपुरासंगत केली. त्यांत प्रामुख्याने राहुल देशपांडे, सायली तळवलकर, श्रीनिवास जोशी, रजनी रामचंद्रन, पंडित जयतीर्थ मेवूंडी, मिलिंद चित्तल यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांचा समावेश आहे. या दिगज्जांना तानपुरा साथ करण्याचा अनुभव त्यांना मिळाला, हे त्या आवर्जून नमूद करतात. त्या गायिका, लेखिका म्हणून जशा प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे त्या ‘म्युझिक थेरपिस्ट’ म्हणूनही परिचित आहेत. मानसिक ताणतणावातून बाहेर येण्याकरिता शास्त्रशुद्ध संगीत रागांचा वापर करून आनंदी जीवन जगण्यास मदत करणारे माध्यम म्हणजे ‘म्युझिक थेरपी.’ हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीत स्वतःला आनंदी ठेवणे, स्वतःसाठी जगणे कठीण होऊन बसले आहे. त्यातूनच अनेक मानसिक त्रास उद्भवताना दिसतात. त्या त्रासातून बाहेर येण्याकरिता शास्त्रीय संगीत आपल्याला उपयुक्त ठरते, याचा अनुभव म्युझिक थेरपी घेतल्यानंतर येतो, असे सिद्धी ‘म्युझिक थेरपिस्ट’ म्हणून काम करताना आलेल्या अनुभवातून सांगतात.

भिन्न वयोगटांच्या व्यक्तींना या ‘थेरपी’चा फायदा होतो आणि त्यातून संगीत हे फक्त मनोरंजनाचे साधन नाही, तर ते जगण्यास प्रेरणा देणारे माध्यम आहे, हे पटवून देण्याचे कार्य सिद्धी म्युझिक थेरपिस्ट म्हणून करतात. थोडयात सांगायचे झाले, तर मुख्यतः आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्याकरिता शास्त्रीय संगीतातील राग ‘यमन’ ऐकणे, हृदयविकारासंबंधी त्रास असल्यास ‘राग मालकंस’ ऐकणे अशा अनेक तणावांसाठी संगीताच्या रागांचा वापर करून म्युझिक थेरपी दिली जाते.

संगीताची साधना करत ‘म्युझिक थेरपिस्ट’ म्हणूनही काम करताना अनेकांना मानसिक त्रासातून मुक्तता देण्यासाठी सिद्धी या आजतागायत कार्य करीत आहेत आणि यापुढेदेखील ‘म्युझिक थेरपिस्ट’ आणि शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्याचा मानस असल्याचे सिद्धी सांगतात. त्यांच्या या अनेकविध कार्यांसाठी ‘मधु-मालती शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा २०१९ तृतीय क्रमांक पारितोषिक’, ‘विशेष लक्षवेधी गायिका’ व ‘सुररत्न’ पदवी सन्मान, ‘महाराष्ट्र युवा कला गौरव २०२१ पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार’, ‘हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेचा दत्तात्रय रत्नपारखी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. स्त्री ही कधी नदीच्या प्रवाहासारखी अनेक अडीअडचणी पार करत बहुकौशल्य जीवन जगते, तर कधी देवीचा अवतार धारण करून अनेकांची प्रेरणा ठरते, हे सिद्धी यांच्या कार्याकडे पाहून समजते.

संगीत साधक, लेखिका, ‘म्युझिक थेरपिस्ट’ असा प्रवाही प्रवास करत, शास्त्रीय संगीत तळागाळापर्यंत पोहोचवण्यास सदैव तत्पर असलेल्या सिद्धी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेकानेक शुभेच्छा!


- साक्षी राउत