सांगलीतील बिरोबा देवाचे बन

    29-Sep-2025
Total Views |

देवराई म्हटले की आपल्या सदाहरित जंगलाची, दाट गर्द राईची कल्पना येते. मात्र, शुष्क वाटणाऱ्या माळावरदेखील काही देवराया वसलेल्या आहेत. त्यांपैकीच सांगलीतील आरेवाडीच्या राईविषयी माहिती देणारा हा लेख...

गली जिल्ह्याचे सदाहरित आणि अवर्षणग्रस्त असे दोन भाग ‌‘एनएच-4‌’ या महामार्गामुळे दुभंगलेले आहेत. यात एक चांदोलीच्या घनदाट जंगलाचा, तर दुसरा पूर्वेकडचा शंभू महादेव उपडोंगररांगेचा भाग आहे. हा दुसरा म्हणजे वर्षाचा 70 टक्के उजाड आणि ओसाड. मात्र, मानवी नजरेतून हा भाग उजाड किंवा ओसाड असला, तरी या जीवसृष्टीचे असंख्य वनस्पती-प्राणी सभासद या ओसाड डोंगररांगांत नांदतात. या अवर्षणी भागात देवराया तशा कमीच. पण, सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातल्या आरेवाडीचे बिरोबाचं बन म्हणजे नितांत सुंदर अवर्षणी भागाचे प्रतिनिधित्व करणारी देवराई.

बिरोबा देव स्वतः येऊन वसले आणि इथल्या कणाकणांवर देवाचा अधिकार स्थापित झाला. इथल्या झाडाची फळं, बिया, काडी तिथून बाहेर नेता येणार नाही, असा कडक दंडक देवाने जनतेला घातला. आजही तो जसाच्या तसा पाळला जातो. बिरोबादेवाचे मंदिर भव्य बांधले आहे. मंदिराच्या पूर्व पश्चिम नितांत सुंदर तरटी म्हणजे ‌’Capparis divaricata' ची दोन जख्ख मात्र खारकेसारखी कठीण झाडे दिमाखात उभी आहेत. लोक त्याची पूजा करतात आणि त्याला जपतात. दक्षिणोत्तर घेरदार डेरेदार असे कृष्णशिरीष म्हणजे 'lbizia amara' या झाडाचे दर्शन होते. चारही झाडांना पार आहे. ही झाडे दुष्काळी वनसृष्टीचे प्रतीक आहेत. ही वनसृष्टी शिकवते संयम, शांतता आणि सातत्य. उन्हाच्या झळांना माळावर सहन करत सावली आणि इथल्या शेळ्या मेंढ्या जनावरांना अन्न उपलब्ध करून देणाऱ्या या सर्वच वनस्पती म्हणजे तप्तपदी खेळणाऱ्या. याच बिरोबाच्या बनाचा 400 एकरांपेक्षा जास्त प्रदेश बघायला कवी ग्रेसांसारखे नागपूरच्या ऊन्हालाही चांदणे म्हणणारे मन हवे.

शिंगासारखा बटबटीत जोडकाटा घेऊन देवबाभूळ सुरेख फूललेली पाहिली की, उन्हाची भूल पडते. या देवबाभळीचा 'cacia horrida' चे हे काटे आतून पोकळ असतात. एक छोटे बीळ त्याला असते. त्यात किडे, मुंग्या वसतिस्थान करतात. ही सहजीवनाची दोन प्रजातींची पद्धत. खडकावर साचलेल्या तुरळक पाण्यात खडकशेपू पिवळी फुले घेऊन फुलतो. ही लोप पावत चाललेली रानभाजी आहे. बाजूला टेफ्रोसियाच्या (शरपुंखा) आणि 'lysicarpus' (शेवरा) गुलबट फुलांचा गालिच्छा अधूनमधून पायघडीसारखा पसरलेला असतो. या सगळ्यात केस पिंजून उभारल्यासारख्या उंचच नेपत्या 'Capparis decidua' दिसतात. नेपतीला पानं नसतात. काटे असतात. पण, ही पानंच फांद्यामध्ये रुपांतरित झालीत किंवा फांद्या पानात असेही म्हणता येईल. पाण्याची बचत करण्यासाठी हा बदल या झाडाने स्वीकारलेला आहे. फार क्वचित पाने काही काळ या झाडाच्या तळाशी दिसतात. लाल गोधडी, पिवळी गोधडी यांनी जमिनीवर आपला गालिचा मनसोक्त सोडलेला असतो. उंटफळाची काटेरी झुडुपे मध्येच तरारून आलेली दिसतात. आटत चाललेला पाण्याचा व्हाळ आता ऑक्टोबर रणरणणार असेच, सांगत असतो. 'Justicia procumbens', 'Justiciarepens' सगळ्या गवतातून पाय उंचावून बघत असल्यासारख्या आपले अधीरपण दाखवत असतात.

तिथेच 'Capparis grandis' ऊर्फ पाचुंदा काटेरी गदेसारखा मध्येच उभा राहतो. आता उन्हात दमून आपण दूर दूर दिसणाऱ्या या माळरानावर सावली शोधतो, तेव्हा हिवराची डेरेदार काटेरी झुडुपे सावलीसाठी खुणावतात. बाभळीच्या सावलीत सावरून टेकावे लागते. एसीला लाजवेल अशी थंड झुळूक तिथे पिंगा घालते. आजूबाजू रटरटणारे ऊन आणि लक्ष्मणाची रेषा घालून हिवर तुमची तृष्णा भागवत असतो. हिवराचे गोंडे बघत छान पाणी प्यावे. फक्त हिवर किंवा बाभळीखाली काटा किंवा किरडू तपासून बसावे लागते. उन्हाच्या चांदण्याची शितलता हिवर बाभळीच्या सावलीत सापडते. मेढशिंगीची पसरी रोपं धूळ खात पहुडलेली असतात.आता परतीचा पाऊस येईल, या आशेने बिरोबाचे हे बन तो साजरा करण्याची तयारी करत असते. अत्यंत खाज आणणारी आग्या पान (Tragia plukenetii) चुकवावी लागतेच. दुधानी, उंदीरकानी तुरळक फुललेल्या दिसतात. या बनात जवळपास सगळे नांद्रुख (Ficus microcarpa) आहेत. फार मोठे मोठे नांद्रुख आहेत. खुरट्या पारंब्या, राखाडी खोड आणि बसकी निमुळती पाने याचे वैशिष्ट्य. मेंढरं यांच्या गार सावलीत विश्रांती घेताना दिसतात. मध्येच Drimia म्हणजे रानकांदा दिसतो. या दिवसात त्याची पाने दिसतात, तर ऊन्हाळ्यात फक्त फुले. आईन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे परमेश्वर कूट आहे, पण कुटिल नाही, या वाक्याची प्रचिती सतत वनस्पती बघताना येते, ती अशी.पसरे रानतीळ, पाताळगारूडी, शालपणच्या वेली पायांतून वाहात असतात.

बिरोबाचे बन तसे माळावर आहे. सध्या तिथे देवराई वसवण्याचे काम मंदिर ट्रस्टने हाती घेतले आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अनेक झाडे लावली गेली. ठिबकची सोय केली आहे. बिरोबाचे मूळ बन आणि नवी झाडे भूमीला देखणं रुप देतील. याच वेळी तरटी (Capparis divaricata), लळी (कृष्नशिरीष) आणि देवबाभूळ यांची 300 रोपे बनवण्याचेही नियोजन ट्रस्टने केलेले आहे. या तिन्ही प्रजाती तिथल्या बनाच्या युगांच्या साक्षीदार आहेत. विशेषतः तरटी व लळी पूजल्या जातात. बिरोबाचे हे बन जरूर बघायला या. ते सदाहरित वनांसारखे हिरवे गार, घनदाट नक्कीच नसेल, मात्र परमेशाच्या अधिष्ठानाने पावन झालेल्या बनातील काटेरी जंगल फिरताना जीवसृष्टीच्या प्रतिभेने आपण स्तिमित होऊन जातो. खरोखर तेव्हा चरचरात व्यापलेल्या ईश्वर आणि विज्ञान यांच्या मैत्रीची प्रचिती येत राहते.

- रोहन पाटील
(लेखक वनस्पती व देवराई अभ्यासक आहेत.)
7387641201