नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीला प्रस्तावना लिहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या पुस्तकाला मेलोनींची “मन की बात” असे संबोधले असून त्यांच्या जीवनप्रवासाचे कौतुक केले आहे.
"आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स" या शीर्षकाचे हे आत्मचरित्र रुपा पब्लिकेशन्समार्फत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक मूळतः इटलीमध्ये प्रकाशित झाले असून आता त्याची भारतीय आवृत्ती प्रकाशित होत आहे.
हे केवळ आत्मचरित्र नाही; ही त्यांची ‘मन की बात आहे’,” असे पंतप्रधान मोदींनी प्रस्तावनेत लिहिले आहे. “मला आनंद आहे की पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी य़ांनी आत्मचरित्र लिहिले आहे. गेल्या ११ वर्षांत मला अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याचा सन्मान लाभला. त्यांच्या जीवनप्रवासातील काही कथा वैयक्तिक मर्यादेत न राहता व्यापक मूल्यांना स्पर्श करतात. त्या आपल्याला शतकानुशतक टिकून राहिलेल्या आदर्शांची आठवण करून देतात. मेलोनींच्या उल्लेखनीय आयुष्यातील अनेक प्रसंग असेच आहेत, जे हे पुस्तक खास बनवतात, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे.
हे पुस्तक वाचकांना युरोप आणि जगातील सर्वाधिक गतिमान व ऊर्जावान नेत्यांपैकी एकाच्या मनामनात डोकावण्याची संधी देते. मेलोनींच्या प्रवास आणि नेतृत्व समजून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण त्यात मला ‘नारीशक्ती’ या भारतीय परंपरेतील संकल्पनेशी त्यांचा दुवा दिसतो. हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीत पूजली गेलेली ही संकल्पना मेलोनींच्या जीवन आणि नेतृत्वात प्रकट होते.मेलोनींनी आपल्या मुळांशी घट्ट नाते राखले आहे आणि त्याच वेळी जागतिक पटलावर आत्मविश्वासाने देशाचे नेतृत्व केले आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास भारतातील लोकांच्या मनाला भिडतो, असेही पंतप्रधानांनी लिहिले आहे.
भारत-इटली संबंधांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, आपल्या दोन देशांचे नाते केवळ करार आणि व्यापारापुरते मर्यादित नाही. वारसा जपणे, समुदायाचे बळ आणि स्त्रीत्वाला मार्गदर्शक शक्ती मानणे हे आपल्याला जोडणारे समान प्रवाह आहेत. परंपरेचा आदर करत आधुनिकतेचा स्वीकार करणे हा आपल्या दोन्ही राष्ट्रांचा आत्मा आहे. हेच माझ्या आणि पंतप्रधान मेलोनी यांच्या वैयक्तिक मैत्रीचेही अधिष्ठान आहे.