पंडित दीनदयाळजींचे 'विचार' अमर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जयंती समारोह संपन्न

29 Sep 2025 19:57:29

यवतमाळ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी समाजासाठी जे कार्य केले, ते कोणत्या पुरस्कारासाठी नव्हते. त्यांचे 'विचार' अमर आहेत. त्यांचा एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पाहोचविण्यासाठी दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी काढले.

यवतमाळ येथील दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक ऊईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसंराज अहीर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "यवतमाळ येथील दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान ही जवळपास २५ वर्षांपूर्वी सुरू झालेली संस्था आज एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारली असून, ती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला आणि अतिशय मागासलेल्या आदिवासी पारधी समाजाला मदतीचा हात देत आहे. या संस्थेने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदय या विचारांवर आधारित समाज परिवर्तनाचे एक जिवंत उदाहरण तयार केले आहे. पंडीत दीनदयाळ यांनी अत्यंत खडतर जीवनातून मार्गक्रमण करीत कष्टमय जीवन जगून अभ्यासाचा ध्यास धरुन शिक्षण पूर्ण केले. सरकारी नोकरीची संधी असतानासुद्धा त्यांनी ती नाकारली. इंग्रजांची नोकरी करण्याऐवजी त्यांनी आपल्या समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आल्यानंतर ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. नंतर, जनसंघाची स्थापना झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेशचे प्रमुख, अखिल भारतीय महामंत्री आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. एवढ्या मोठ्या पदांवर असतानाही त्यांच्या जीवनशैलीत कोणताही बदल न होता ते त्यागपूर्ण जीवन जगले."

एकात्म मानव दर्शनाचे मूळ तत्त्व अंत्योदय

"पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या काळात जगात भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन विचारसरणींचा बोलबाला होता. या दोन्ही विचारांपेक्षा वेगळा तिसरा विचार त्यांनी मांडला. भारतीय जीवन पद्धतीतच सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उत्तर आहे, असे पंडित दीनदयाळ यांनी सांगितले होते. एकात्म मानव दर्शनाचे मूळ तत्त्व 'अंत्योदय' आहे, ज्याचा अर्थ समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासातूनच राष्ट्राचा विकास करणे होय. समाजातील शेवटचा दुर्बल घटक हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. राष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व सुविधा पोहोचल्या पाहिजे, हा विचार त्यांनी सर्वदूर पोहोचवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच अंत्योदय विचारावर काम करीत असून त्यांनी गरिबांसाठी घरे, शौचालये, गॅस, वीज आणि रोजगार यावर गुंतवणूक केली. या धोरणामुळेच गेल्या १० वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले. यामुळेच भारत जगातील ११ व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे," असे त्यांनी सांगितले.

२५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट


"दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने नैसर्गिक शेतीचा एक आदर्श प्रकल्प सुरू केला असून दीनदयाळजींच्या विचारांवर काम करत शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे मॉडेल तयार केले आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून उत्पादन खर्च कमी करणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे हे या मॉडेलचे उद्दिष्ट आहे. राज्यातही २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १३ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली गेली आहे. दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने पारधी समाजाच्या विकासासाठीही मोठे काम केले आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर काम करून गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समाजात परिवर्तन घडवले आहे. पंडित दीनदयाळजींनी समाजासाठी जे कार्य केले, ते कोणत्या पुरस्कारासाठी नव्हते. त्यांचे विचार अमर आहेत. जरी त्यांची हत्या झाली, तरी त्यांचा विचार अधिक वेगाने पसरला आणि आज तोच विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवला जात आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Powered By Sangraha 9.0