नवी दिल्ली, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील भारतीय तटरक्षक दल मुख्यालयात सुरू झालेल्या ४२ व्या कमांडर्स परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. या वेळी त्यांनी तटरक्षक दलाच्या व्यावसायिक कार्यक्षमतेची, मानवी सेवा कार्यांची आणि भारताच्या ७,५०० किमी किनारपट्टी तसेच बेटांवरील सुरक्षेतल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली.
ही परिषद २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवस चालणार असून, यात तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी सामरिक, कार्यकारी आणि प्रशासकीय प्राधान्यांवर चर्चा करणार आहेत.
राजनाथ सिंह म्हणाले की, “तटरक्षक दल हे राष्ट्रीय सुरक्षेचे एक महत्त्वाचे स्तंभ असून, १५२ जहाजे व ७८ विमाने यांसह ते आज एक भक्कम शक्ती बनले आहे.” त्यांनी स्पष्ट केले की तटरक्षक दल बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेच्या संगमावर कार्य करते. सागरी सीमा गस्तीद्वारे हे दल केवळ परकीय धोक्यांपासून बचाव करत नाही तर बेकायदेशीर मासेमारी, मादक पदार्थ व शस्त्रांची तस्करी, मानव तस्करी, सागरी प्रदूषण आणि अन्य बेकायदेशीर सागरी क्रियाकलापांवरही अंकुश ठेवते.
संरक्षणमंत्र्यांनी तटरक्षक दलाच्या नौदल, राज्य प्रशासन आणि विविध सुरक्षा यंत्रणांशी असलेल्या समन्वय क्षमतेला त्यांची सर्वात मोठी ताकद असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की जवळपास ९०% भांडवली बजेट हे स्वदेशी साधनांवर खर्च केले जात असून, हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
राजनाथ सिंह यांनी तटरक्षक दलाच्या आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यातील उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला. चक्रीवादळे, तेलगळती, अपघात किंवा परदेशी जहाजांवरील संकट या सर्व प्रसंगी तटरक्षक दलाने जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला उंचावणारे ठरले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरणाच्या बाबतीतही तटरक्षक दलाने मोठी झेप घेतल्याचे सांगत संरक्षणमंत्र्यांनी माहिती दिली की महिला अधिकारी आता केवळ सहाय्यक भूमिका न बजावता पायलट, निरीक्षक, होव्हरक्राफ्ट ऑपरेटर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर अशा अग्रभागी जबाबदाऱ्यांमध्ये कार्यरत आहेत.
तंत्रज्ञानाधारित आव्हानांबाबत इशारा देताना त्यांनी म्हटले की, स्मगलिंग आणि दहशतवादाच्या पद्धती आता ड्रोन, सॅटेलाइट फोन, एन्क्रिप्टेड नेटवर्क्स, डार्क वेब यांसारख्या अत्याधुनिक साधनांनी चालवल्या जात आहेत. त्यामुळे एआय, मशीन लर्निंग, ड्रोन व सायबर सुरक्षा यंत्रणांचा समावेश करणे अपरिहार्य आहे. शेजारी देशांतील अस्थिरतेचा परिणाम सागरी सुरक्षेवरही होतो, असे त्यांनी नमूद केले. विशेषतः बांगलादेश, म्यानमार यांसारख्या देशांमधील परिस्थितीमुळे बेकायदेशीर स्थलांतर, शरणार्थींचा ओघ आणि बेकायदेशीर सागरी हालचालींमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.